डिसेंबर १६ २०१९

आत्मपूजा उपनिषद : ८ - ११ : निश्चलत्व हीच प्रदक्षिणा !

आत्मपूजा उपनिषद्
                                                                                    निश्चलत्वं प्रदक्षिणं  ॥ ११ ॥
                                                                                  निश्चलत्व हीच प्रदक्षिणा!

साधारणता प्रदक्षिणा वर्तुळाकार असते. या मागची मानसिकता अशी  की अस्तित्वाची गती वर्तुलाकार आहे. पृथ्वीचं सूर्याभोवतीचं  परिभ्रमण वर्तुलाकार आहे त्यामुळे पृथ्वीशी निगडित सर्व प्रक्रिया वर्तुलाकार आहेत. रुमी या सूफी सिद्धाची ध्यान पद्धती अनिर्बध होऊन स्वतःभोवती अविरत फिरण्याची आहे.   यामुळे मनाचा निरास होऊन साधक स्वतःचं निराकारत्व जाणतो अशी धारणा आहे. एखादी संकल्पना दिली की तिचा जमेल तितका विपर्यास करणं हा लोकांचा  पूर्वापार छंद आहे. यातून परिक्रमा या जीवाची बेफाम यातायात करणाऱ्या साधनेचा शोध  लोकांनी  लावला. कमालीची पायपीट आणि जीवाचे अतोनात हाल, यापलीकडे अशा परिक्रमेतून काहीही साध्य होत नाही. तरीही परिक्रमेवरची एकसोएक पुस्तकं वाचून लोक एकदा तरी हे साहस करायचंच असं ठरवतात आणि कोणत्याही योगायोगानं घडलेल्या घटनेला चमत्कार समजून त्याचं भन्नाट वर्णन इतरांना करतात; मग ते ऐकून  अचंबित झालेले लोक परिक्रमेचा चंग बांधतात!   वास्तविक आत्मा निश्चल आहे आणि त्याच्याशी समरुपता साधायला आपण वणवण करण्याऐवजी स्थिर व्हायला हवं ही गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही.   जो गतीच करत नाही तो  कुणाभोवती काय,   स्वतःभोवती सुद्धा फिरण्यानं कसा गवसणार?  

निश्चलत्व समजण्यासाठी अद्वैतत्त्व समजून घेऊ. अस्तित्व हे टिवीचा स्क्रीन आणि त्यावर उमटणाऱ्या चित्रांसारखं आहे. चित्रात आणि पडद्यात काहीही अंतर नाही. अर्थात, अस्तित्वाचा पडदा द्विगुणात्मक आहे, एकतर तो हरस्थितीत कायम आहे आणि दुसरं म्हणजे त्यात जाणण्याची क्षमता आहे. टिवी स्क्रीनप्रमाणेच, चालू घटनांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.   अद्वैतवादाच्या बुद्धिमत्तेची कमाल आणि सिद्धांत असा की, सर्व प्रकटीकरण पडद्यापेक्षा भिन्न भासलं तरी ते केवळ पडद्याचंच रुपांतरण आहे. थोडक्यात, आपला देह हा पडद्यापेक्षा वेगळा नाही, तो फक्त रुपांतरित झालेला आणि कालबद्ध भासणारा पडदाच आहे. तद्वत, मनातले सर्व विचार, भाव-भावना, इतकंच काय तर सर्व घटना सुद्धा पडद्याच्याच कालबद्ध प्रतिमा आहेत. तस्मात, सर्व अस्तित्व एकच आहे, इथे द्वैताला स्थानच नाही!       ( इथपर्यंतचा सर्व श्रेयनिर्देश रुपर्ट स्पिरा).  

आपण पडदा आणि पात्र एकाच वेळी आहोत. आपण पडदा आहोत याच्या विस्मरणानं किंवा केवळ पात्रच आहोत या भ्रमानं, पात्राला कमालीचा फरक पडत असला तरी पडदा जसाच्या तसा आहे. पात्र आहोत ही धारणा होणं आणि पात्र होऊन जगणं; हे  कायम देहाच्या आत आहोत, किंबहुना  देहच आहोत असं समजून  जगण्यामुळे होतं.  

१) आपलं विदेहत्व जाणण्यासाठी अष्टावक्र गीतेवरच्या पहिल्या लेखात सांगितलेली साधना, जगातली एकमेव तत्क्षणी अनुभूती देणारी साधना आहे; ती पुनरुधृत करतो.    

पहिल्या अध्यायातला हा चवथा श्लोक केवळ एका वाक्यात सगळं  अध्यात्म  सांगतो.   त्याचा अर्थ असा :

" जर आपण देहापेक्षा वेगळे आहोत हे जाणून तू स्वरूपात स्थिर झालास तर या क्षणी सुखी, शांत आणि बंधमुक्त होशील "

आपण देहापेक्षा वेगळे आहोतच, ती वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती जाणून घेणं ही  क्रिया नाही, तो उलगडा आहे.   तुम्ही आता जिथे असाल तिथे, आपल्या दोन्ही हातांची तर्जनी त्या हाताच्या अंगठ्याला लावा, ते गोल एकमेकात गुंफा आणि  डोळे मिटा.     तत्क्षणी मन थांबेल  आणि  तुम्हाला जाणीव होईल की  देह बसलाय  आणि आपल्याला कळतंय!

एकदा  हा  "  देहं पृथकृत्य  " तुमचा अनुभव झाला की पुढची घटना आपोआप घडते,   "  चित्ती विश्राम्य तिष्ठसी! "  जिथे असाल तिथे तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता; स्वरूपात स्थिर होता. कारण तुम्ही नाही अशी कोणतीही जागा नाही किंवा अशी कुठलीही वेळ नाही.     समय आणि स्थान यात देह बद्ध आहे, आपण नाही. आपण सदैव देहातीत आहोत. देहाच्या आत आणि बाहेर आहोत,   पण  देह झालेलो नाही.

हा निश्चलत्वं  समजण्याचा प्रथम चरण आहे कारण देह हालतो, सर्व हालचाल देहात आणि देहाला आहे; स्वरुप  निश्चल आहे.  

२)  आता मनाकडे वळू कारण मनाची हालचाल अत्यंत सूक्ष्म आहे;   स्वरुपात हालचाल होण्याची संभावनाच नाही.  

आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे मनाची गती कायम क्षैतिजिक आहे आणि  आपल्या निश्चलत्वाचा अनुभव येण्यासाठी काही काळ तरी ती थांबायला हवी; त्यासाठी सांगितलेली साधना पुनरुधृत करतो :

मनाचं चलन  क्षैतिजीक (हॉरिझाँटल)  आहे आणि ते  सतत उजव्या कानाकडून डाव्या कानाकडे प्रवाहित आहे; त्यामुळेच आपल्या डोळ्यांसमोर दृश्य तरळतात आणि कानात वाक्य ऐकू येतात.   त्यामुळे  हा प्रवाह आपल्या जाणिवेचा रोख पण कायम    क्षैतिजीक ठेवतो. जर जाणिवेचा रोख उर्ध्वस्थ (व्हर्टिकल) झाला तर मनाच्या प्रक्रियेचा निरास होईल; म्हणजे मन एक क्षमता म्हणून उपलब्ध राहील; पण त्याचं सतत अनैच्छिक आणि अनिर्बंध वाहणं थांबेल.     अशा प्रकारे जाणीव उर्ध्वस्थ होणं हा अर्घ्य आहे  !

काय आहे ही जाणीव उर्ध्वस्स्थ करण्याची साधना? शांत, निर्वेध मनानं,   पाठ उशीला टेकून    बसा. डोळे बंद करून नजर डाव्या कानाकडून उजव्या कानाकडे फिरवा; मग तोच रोख डोक्याच्या मागच्या बाजूनं पुन्हा डाव्या कानापाशी आणा. अशा प्रकारे, नजरेची डाव्या कानाकडून उजव्या कानाकडे आणि डोक्यामागून पुन्हा डाव्या कानाकडे अशी वर्तुळाकार गती तयार होईल. फक्त दोन-तीन प्रयत्नातच  तुमच्या नजरेची ही डावीकडून उजवीकडे फिरणारी वर्तुळाकार गती सुरू होईल. मन नेमकं विरुद्ध दिशेनं, म्हणजे उजवीकडून डावीकडे आणि एक मार्गी वाहतं. या साधनेची केवळ सात-आठ गोलाकार आवर्तनं झाल्यावर मनाची क्रिया पूर्णपणे थांबेल. तुम्हाला कमालीची शांतता जाणवेल आणि त्या स्थितीत स्थिर राहिल्यावर  अचानक तुमची जाणीव उर्ध्वस्थ होईल, म्हणजे नजरेचा रोख  ब्रह्मरंध्रातून आकाशाकडे रोखला जाईल.   ब्रह्मरंध्र हा देह आणि आकाश यातला सिमांत बिंदू आहे.     या स्थितीत तुम्ही वर्तमानात स्थिर व्हाल; सिद्धत्वाची एक झलक तुम्हाला मिळेल;   तुम्ही व्यक्तिमत्त्वातून मुक्त होऊन, केवळ वर्तमान स्थिती होण्याची शक्यता निर्माण होईल. ही कायम उपस्थित असलेली निराकार वर्तमान स्थिती म्हणजेच सिद्धत्व!


३) मनाच्या हालचालीचं आणखी एक अत्यंत सूक्ष्म कारण आहे, ते म्हणजे मनाला किंवा मनामार्फत आपल्याला  सतत होत असलेली अंतराची जाणीव.   ऑफिसला जाण्याचा विचार एकवेळी तीन गोष्टी जागृत करतो, ऑफिसची प्रतिमा, ऑफिसच्या संदर्भातले संवाद आणि घर आणि ऑफिस यातलं अंतर. ही तिसरी जाणीव अत्यंत सूक्ष्म पण तितकीच भेदक असते कारण ती अंतर आणि पर्यायानं काल यांची जाणीव एकाच वेळी जागृत करते. म्हणजे ऑफिसचा नुसता विचार एकाच वेळी मनात  प्रतिमा, संवाद, काल आणि अंतर यांची जाणीव जागृत  करतो.

काल हा भास आहे; तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं निर्माण होतो कारण सूर्य सदैव प्रकाशमान आहे. थोडक्यात, उजाडलं, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली हे सर्व प्रकाशाचे विभ्रम आहेत. काल ही संकल्पना म्हणून जगायला अत्यंत उपयोगी आहे पण अस्तित्वात काल नाही.

तद्वत, अंतर हा दृष्टी विभ्रम आहे; तो सुद्धा जगायला अत्यंत आवश्यक आहे पण निराकार एकसंध आहे; तो निरंतर आहे आणि निरंतर असल्यामुळेच तो निश्चल आहे!  

अंतराची जाणीव काही काळ तरी अदृश्य झाल्याशिवाय एकसंध निराकाराची अनुभूती येणं अशक्य आहे. काय आहे ही अंतराची जाणीव काही काल निस्सरित करण्याची साधना?  

प्रथम (१) मध्ये सांगितल्याप्रमाणे विदेह व्हा, मग (२) मध्ये सांगितल्याप्रमाणे मनाची क्षैतिजिक गती अवरुद्ध करा. आता तुम्ही अंतराची जाणीव निस्सरित करायला तयार झालात. जोपर्यंत आपण दोन डोळ्यातून बघतोयं तोपर्यंत अंतर दिसणं आणि भासणं अनिवार्य आहे कारण सर्व पाहणं हे देहाच्या परिप्रेक्ष्यातून आहे. त्यामुळे देहापासून असलेल्या अंतराची किंवा दिसणाऱ्या गोष्टीमधल्या अंतराची जाणीव तत्क्षणी होते.  

उशीला पाठ टेकून शांत बसा, डोळे मिटा आणि डाव्या कानापासून उजव्या कानाला जोडणाऱ्या एका आडव्या  रेषेची कल्पना करा. ही कल्पना स्थिर झाल्यावर; ब्रह्मरंध्रातून आणि  दोन  डोळ्यांच्या मधोमध  जाणाऱ्या,   एका उभ्या  रेषेची कल्पना करा.   या दोन रेषा जिथे एकमेकींना छेदतात तो मनाचा  केंद्रबिंदू आहे;   तिथून मन सक्रीय होतं. अर्थात,   आपली जाणीव त्या बिंदूवर स्थिर झाली की मनाच्या दृक, श्राव्य आणि वाक या तिन्ही क्रिया एकाच वेळी थांबतात.   हा बिंदू गवसणं परमभाग्य आहे, जाणीव तिथे स्थिर झाल्यावर शांतपणे डोळे उघडा; तुम्हाला निराकाराच्या निश्चलत्वाचा बोध होईल; किंबहुना आपणच ते निश्चलत्व आहोत हे लक्षात येईल. हे निश्चलत्वंच सर्व देहाला अंतर्बाह्य व्यापून आहे, त्यामुळे देह कितीही हलला, मनाची कितीही गती झाली आणि आयुष्यात काहीही घटना घडल्या तरी आपण कायम स्थिरच असतो. आपल्यात यत्किंचितही गती होत नाही आणि  हा बोध होणं हीच सर्वोच्च प्रदक्षिणा आहे!  

Post to Feed
Typing help hide