आनंदाचे डोह

आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदचि अंग आनंदाचे

राग-लोभ, आनंद-दुःख, यश-अपयश ह्या सगळ्या अनुभवातून निर्माण होणारी व्यक्तिमत्त्वे ही खरे म्हणजे आपल्या आतील एक चैतन्य निर्विकारपणे पाहत असते. ते ना दुःखाने व्यथित होते ना आनंदाने उल्हसित. आपण स्वतःला जो "मी" समजत असतो तो खरा मी नसतोच मुळी!
ज्याप्रमाणे समोर दिसणारी चित्रे आणि त्यांना पाहणारे डोळे ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, अगदी तसेच सभोवती घडणाऱ्या घटनांनी विचलित होणारे, आपल्याला आपणच वाटणारे आपण वेगळे आणि त्यांस पाहणारे खरेखुरे आपण वेगळे!
त्याचे असे स्थिर अविचलीत असणे आणि ते तसे असल्याची आपणाला आलेली अनुभूती म्हणजे "आनंद" 
आपण सारेच ह्या आनंदाचा एक भाग असतो. सगळे विश्र्वच जर ह्या आनंदाचा एक डोह मानावा, तर त्यात उमटणारे तरंग म्हणजे अनुभव, घटना इत्यादींना वेगळे असे काय स्वरूप असेल?

म्हणजे मग जर अखंड विश्र्वरुपी डोह हा आनंदाचा असेल तर त्यातील तरंग हे ही साहजिकच आनंदाचेच असणार ना! 

कारण जसे पाण्याच्या डोहात उमटलेले तरंग हे पाणीच असतात, अगदी तसेच आनंदरूप दोहांत उमटलेल्या तरंगांचे अंग हे आनंदाचेच, त्यात चांगले वाईट असे काही नाही!

तुकाराम महाराजांनी सगळा वेदांत दोन ओळींतील आणि त्यात देखील फक्त ४ शब्द वापरून मांडला, जवळ जवळ प्रत्येक वेळी ऐकताना नवा अर्थ देणाऱ्या ह्या दोन ओळी, अजून किती अर्थ देत यापुढे भेटतील ह्याचा काही नेम नाही!