माझी गाडी आणि मूर्तिपुजा!

मूर्तिपूजा आणि माझी गाडी!
मला मारुती ८०० मिळाली होती जुन्या कंपनीकडून भेट म्हणून! पहिली गाडी, ती सुद्धा अशी कामाच्या पावती स्वरूपात मिळालेली!
काही कारणांमुळे ती माझ्या नावावर नाही होऊ शकली म्हणून मग परत केली काल! मलाही  नकळत ओले झालेले डोळे पुसत अजागळपणे ती सुपूर्त करून सटकलो तिथून!
तिच्यासोबतचा पहिला दिवस आठवला. 
त्या काळी पौड रोड वर टोल नाका असायचा. 
गाडी घेऊन दिमाखाने रांगेतून पुढे-पुढे सरकत होतो. बाइकवाले उगीच फार हॉर्न वाजवतात असे चार चाकीत बसल्यावर कळायला लागले होते मला! 
पुढे येत येत अगदी जवळ आलो तर ध्यानात आले की वाहनांच्यासाठी दिलेली जागा पुरेशी नाहीये. जाग्यावर आलो तेव्हा लक्षात आले किती मी सवयीनुसार टू-व्हीलर च्या लेन  घातली होती तिला. 
"कर्म-दाळीद्रय" म्हणतात ते काय हे तिला तोंड असतं तर ते वर करून सांगितलं असतं तिने मला त्याच दिवशी! 
एक तो दिवस आणि एक कालचा. 
पाहायला गेलं तर एक यंत्र ते! विज्ञानाच्या भाषेत बोलावं तर "निर्जीव"; त्याचंही असं जाणं इतकं चटका लावून का जावं बरं मला?
१० दिवस मनापासून आरत्या म्हटल्यावर, मनापासून मनातले सगळे सगळे (रोज वेगवेगळे) मागितल्यावर गणपती बाप्पाची मूर्ती कुठल्याश्या नगरसेवकाने 'सोय' करून दिलेल्या हौदात सोडून देताना बसणारा चटका ह्याहून वेगळा नाही!
स्वामी विवेकानंदांनी मूर्तिपूजेमागील लॉजिक समजावून देताना एका राजाला त्याच्या आजोबांच्या फोटोवर थुंकायला सांगितले होते. चमकलेल्या राजाला तेव्हा तसे काही करण्याच्या नुसत्या कल्पनेने बसलेला चटका काल प्रत्यक्ष अनुभवला मी! 
असो! 
योग्य वेळी "गोष्टी जाऊ द्याव्यात!" हे जेव्हा आपलेच मन आपल्याला समजावते तोवर किराणामालाच्या दुकानातून जेल घ्यायचे दिवस जाऊन डाय घ्यायचे दिवस आलेले असतात!