गोळी कशी गिळू मी ?

   प्रत्येक शास्त्रात गेल्या काही शतकातच अतिशय नेत्रदीपक प्रगति झाली आहे.संगणकामुळे तर काही प्रकारचे काम करण्याच्या पद्धति इतक्या बदलल्या आहेत की पूर्वीचे कारखाने ,कार्यालये जशी दिसत तशी आता मुळीच दिसत नाहीत.वैद्यकशास्त्रातही प्रशंसनीय प्रगति झाली असली आणि दवाखाना या संस्थेचे स्वरूप मात्र  बदलले तरी त्यातील सुटसुटीतपणा जाऊन त्याला अधिकच गुंतागुंतीचे स्वरुप आले आहे.  आमच्या लहानपणी गावातला दवाखाना घरापासून फार दूर नव्ह्ता तरी क्षुल्लक दुखण्यासाठी तेथपर्यंत जाण्याचेही कष्ट न घेता घरात आज्जी किंवा आणखी कॉणी वडिलधारे माणूस कसला तरी पाला किंवा चाटण यांचा प्रयोग आमच्यावर करायचा व बहुधा त्याने आजार पळायचा.मी स्वत: व माझ्य़ा लहान भावंडांनी बऱ्याच उंचावरून पडण्याचे प्रकार करून  किंवा एकमेकाना ठोसाठोषी करून रक्तपात घडवून आणले असताना आमची सगळ्यात मोठी बहीण कोठूनतरी दगडीचा पाला नावाची वनस्पलि शोधून आणायची व ती ठेचून जखमेवर तिचा रस पिळून ती बांधून टाकायची व चार पाच दिवसात जखम अगदी पूर्ण बरी झालेली असायची 
          ताप फारच वाढला तर मात्र आम्हाला दवाखान्यात नेले जायचे.आमच्यासारखे काही बळीचे बकरे तेथे बसलेले असायचे .आपला नंबर आला की डॉक्टर जवळ बोलावून प्रथम ताप मोजायची नळी प्रथम जोराने झटकून माझ्या तोंडात घालून थोडा वेळ ठेवायचे व त्या काळात पुढच्या रोग्याला काहीतरी प्रश्न विचारायचे.त्याचे उत्तर ऐकून माझ्या तोंडातील नळी काढून ताप पाहून गळ्यातला स्टेथो छातीवर टेकवायचे व एकादा दुसरा प्रश्न आमच्या बरोबर आलेल्या वडीलधाऱ्या माणसास विचारायचे व तेवढ्यावरच बहुधा आमच्या रोगाचे निदान होऊन समोरच्या टेबलावरील कागदावर आम्हाला वाचता न येणाऱ्या अक्षरात काहीतरी फर्कटून तो कागद त्यांच्याकडे द्यायचे व तो घेऊन दवाखान्याच्या एका कोपऱ्यातील खोलीच्या खिडकीतून ज्याचा फक्त चेहरा दिसत असे अश्या कंपाउंडर म्हणविआऱ्या व्यक्तीकडे तो कागद दिला जायचा त्यावरचे अगम्य लिखाण वाचून त्या व्यक्तीच्या खोलीतील टेबलावरील अनेक बाटल्यापैकी लाल किंवा पिवळा किंवा हिरवा द्रव आम्ही नेलेल्या बाटलीत भरून ती बाटली व त्याचबरोबर एकादा छोटा चमचा भरेल एवढे पांढऱ्या रंगाचे चूर्ण पांढऱ्या रंगाच्या  छोट्या कागदावर टाकून अगदी यांत्रिक पद्धतीने त्याच्या पुड्या करून ते द्रव औषध व पुड्या  ते कितीवेळा कसे घ्यायचे याच्या सूचनांसह आमच्या बरोबर आलेल्या वडीलधाऱ्या माणसाला दिले जायचे व तेथून आमची रवानगी घरी व्हायची.
             आता दवाखाना हा प्रकार थोडासाच सुधारला आहे म्हणजे आता त्याला कन्सल्टिंग रूम म्हणतात आणि तेथे गेल्यावर  डॉक्टर औषध देण्याच्या भानगडीत पडत नाही तर तपासणी करून गोळ्या अथवा द्रव औषधाचे नाव एका चिठ्ठीवर लिहून देतात व ते आपल्याला दवाखान्याच्या शेजारीच असणाऱ्या औषधाच्या दुकानातून घ्यावे लागते.जर तुमचा आजार ठरवण्यासाठी डॉक्टरला काही तपासण्या कराव्या लागणार असतील तेथून आपली रवानगी पॅथॉलॉजिस्टकडे  किंवा न्युरॉलॉजिस्ट किंवा अश्याच कुठल्यातरी तज्ञाकडे होते.तशी शक्यताच जास्त असते कारण रोग्याकडे  पाहून किंवा त्याचे नाडीचे ठोके व ताप पाहून लगेच निर्णय घेणे ही गोष्ट कमीपणाची समजली जाते.        .  
        अमेरिकेत तर त्यासाठी प्रथम तुमचा विमा उतरवला असायला हवा तरच डॉक्टराची भेट ठरवली जाणे शक्य असते तीही लगेच मिळेल असे नाही कधी कधी रोगी शेवटच्या घटका मोजत असला तरी डॉक्टर उपलब्ध होईलच याची खात्री नसते.त्यामुळे आम्ही जितक्या वेळा मुलाकडे गेलो त्या प्रत्येक वेळी पाच ते दहा लाखाचा(डॉलरचा रुपयांचा नव्हे) विमा उतरून मगच विमानात पाऊल ठेवतो आणि पुन्हा तरीही तेथे आजारी न पडण्याची दक्षता घेतो.आणि अश्या प्रकारे तो विमा काढण्यासाठी  घालवलेले पन्नास साठ हजार रुपये वाया घालवतो आणि तरीही त्याबद्दल देवाचे (आणि त्या देशाचेही)आभार मानूनच परत येतो.आमच्या परिचितापैखी एकाचे वडील तेथे जाऊन आजारी पडले आणि त्यांना कृत्रिम श्वसन यंत्र(पेसमेकर) बसवावे लागले तर त्यांच्या उपचाराचे हप्ते त्यांच्या दुसऱ्या अमेरिका भेटीपर्यंत तो भरतच होता.
         अमेरिकेत जाताना आमच्या नेहमीच्या आजाराच्या म्हणजे माझा उच्च रक्तदाब आणि सौ. चा डायबेटिस व शिवाय इतरही किरकोळ दुखणी अश्या गोळ्यांचा मोठा साठाच घेऊन जातो.पण कधी कधी साध्या दुखण्यासाठी औषधाच्या दुकानात सरळ सरळ नाव सांगितले की विकत मिळणाऱ्याही गोळ्या तिथल्या औषधांच्या दुकानात मिळतात किंवा त्या ग्राहकाला स्वत:च निवडून घेता येईल अश्या पद्धतीने ठेवलेल्या असतात अश्या पद्धतीने घेतलेल्या टायनेलॉन या वेदनाशामकाच्या पाचशे गोळ्यांचे डबडे माझ्या मुलाकडे पडलेले असते..
         सर्व प्रकारच्या दक्षता घेऊनही अमेरिकेत असताना एकदा मला सर्दी झालीच   मला सर्दी झाली असे समजताच लगेच मुलाने ऒफिसमधून येतानाच सर्दीवरील अमेरिकेतील रामबाण इलाज असणाऱ्या गोळ्या आणल्या,व त्याने त्या काढून मला दिल्या त्या दिवसा वेगळ्या व रात्री वेगळ्या अश्या स्वरूपाच्या होत्या.दिवसाच्या डेक्विल व रात्रीच्या नाइक्विल.त्या गोळ्यांचा आकार पाहून मी एकदम सटपटलोच खरे तर गोळ्या सटकन गिळण्यात माझा हातखंडा आहे अशी माझी समजूत होती.नाहीतर बऱ्याच लोकांना गोळ्या गिळताच येत नाहीत आणि मग त्याना गोळीचे चूर्णच करून घ्यावे लागते श्या लोकांना डेक्विल व नायक्विल म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर म्हणावा लागेल कारण मीसुद्धा  डेक्विल  कशी बशी गिळली . त्या गोळ्या तुकडे करून किंवा भुकटी करून घेणेही शक्य नव्हते कारण पारदर्शक आवरणात द्रव औषध (लिक्विकॅप्सूल)असा त्या गोळ्यांचा प्रकार होता,त्यामुळे पूर्ण गोळी गिळणे हीच एक पद्धत वापरणे शक्य होते.रात्रीची गोळी नाइक्विल तर डॅक्विलपेक्षाही मोठी म्हणजे एकाद्या छोट्या पक्षाचे अंडे असावी तशी ! तरी बराच मोठा घसा ताणून मी ती तोंडात सारली व पाण्याच्या घोटाबरोबर गिळण्याचा प्रयत्न केला पण गोळीचे आवरण गुळगुळीत असून व त्यावर पाण्याचा मोठा घोट घेऊनही गोळी घशातून खाली उतरायला तयार नाही अशी परिस्थिती झाली बरं ती घश्याच्या इतकी आत गेलेली की बाहेर काढावी म्हटले तर तेही शक्य नाही अश्या प्रकारे गोळीने श्वास कोंडून मृत्यू पावणारा  जगातील  पहिला रुग्ण होण्याचा मान मला मिळून शिवाय ही गोष्ट अमेरिकेत घडल्याने हौडी मोदीसारखीच त्याला प्रसिद्धी मिळणार ( आणि मरणोत्तर प्रसिद्धी मिळून मला त्याचा काय उपयोग हे आणखी वर दु:ख) की काय अशी भीती वाटू लागली.  खरे म्हणजे बऱ्याच मोठ्या आकाराच्या कॅप्सूल घेण्याचा मला सराव होता तरीही ही कॅप्सूल मात्र रोगहारक न ठरता रुग्णसंहारक ठरणार की काय अशी भीती वाटू लागली.पण बऱ्याच प्रयत्नानंतर कशी बशी ती घश्यातून आत न जाता (कारण ती आशा मी सोडूनच दिली होती)बाहेर पडली व गोळीपेक्षा सर्दी परवडली असा विचार करून मी ती गोळी घ्यायची नाही असे ठरवले व गोळीच्या तावडीतून माझी सुटका करून घेतली.
           ,नंतर जालावर शोध घेतला असता नाइक्विल आणि तत्त्सम कॅप्सूल्स गिळण्याविषयी अनेक लोकांनी आपले अनुभव नॉंदवलेले दिसले. त्यात एका प्रकारात गोळी मान वर करून कशी घ्यावी; अगदी ती गोळी ओठावर कोठे ठेवावी व मानेचा कोन कसा करून पाण्याची बाटलीच तोंडाला लावून  घोट कसा घ्यावा इतक्या बारिकसारिक सूचनाही त्यात होत्या तर दुसऱ्या प्रकारात मान खाली करूनही अशीच अगदी सुलभतेने गोळी कशी गिळली जाते याचे आकृतीसह वर्णन केलेले आढळले . यावरून ही समस्या केवळ माझ्यापुरतीच मर्यादित नसून त्याला जागतिक परिमाण आहे हे ध्यानात आले.इतक्या मोठ्या आकाराची लिक्विकॅप्सूल केल्याबद्दल बऱ्याच लोकांनी खास अमेरिकन थाटात कंपनीला शिव्या मोजल्या आहेत असेही दिसले (एका गृहस्थाने तर अगदी वैतागून ही गोळी (शरीराच्या वरील द्वारातून  न घेता खालील द्वारातून  घ्यावी की काय असाही प्रश्न केला आहे ) तरी कंपनीने एक मोठी गोळी करण्या ऐवजी छोट्या दोन गोळ्या का केल्या नाहीत समजत नाहीत. या गोष्टीला दोन वर्षे झाली आता कंपनीने कॅप्सूलच्या ऐवजी साध्या गोळ्या ज्यांचे तुकडे करता येतील किंवा चूर्ण करता येईल अश्या तयार करायला सुरवात केली असून. तेच औषध द्र्वरूपातही उपलब्ध केले आहे असे समजते .