मार्च १७ २०२०

डुप्लिकेट किल्ली!

"किल्ल्या हरवणे" 
मला यथेच्छ बोलायला 
घरच्यांना जणू कमीच विषय होते 
म्हणून परमेश्वराने मला दिलेला हा अजून एक व्यक्तिमत्त्व गुणधर्म!

हल्ली आणि ती लॅच नावाची नवी भानगड अजूनच अवघड आहे! 
खड्डे खड्डे असलेली चावी,
कुलुपात कोणतीही बाजू 
वर किंवा खाली 
ठेवून घातली 
तरी ते उघडते! 

पण माझ्यासारख्या नेहमी किल्ल्या हरवणाऱ्याला,
कुलुपासोबत येणारी किल्ली बाळगायचे भाग्य 
फार दिवस नाही मिळत,
आणि ह्या डुप्लिकेट किल्ल्या शक्यतो एकाच बाजूने घातल्या की लॅच उघडते! 

घराची अशीच एक किल्ली गेले काही दिवस माझ्याकडे होती! 
डुप्लिकेट असल्यामुळे 
एका विशिष्ट बाजूने वापरली 
तरच लॅच उघडणार 
हे मनाशी नक्की होतं माझ्या,
आणि स्वतःच्या नशिबावर पण थोर विश्वास, 
त्यामुळे पहिल्या फटक्यामध्ये 
मी योग्य बाजूच वरती ठेवेन 
ह्याची शक्यता अगदीच नगण्य...! 

माझं आपलं सवयीचं झालं होतं! 
पहिल्यांदा एका बाजूने घालायची, 
ती फिरणार नाही!
मग वैतागत दुसऱ्या बाजूने! 
ती फिरणार! 
मी आत! 

पण ८-१० दिवसात 
एकदाही ती पहिल्या फटक्यात उघडत नाही, 
म्हटल्यावर मग मात्र मी थांबून थोडा विचार केला!  
चुकून सुद्धा मी योग्य बाजू पहिल्यांदा कशी नाही टाकत बरं? 

मग परत एकदा 
चावी आत टाकली,
आणि एरवी सारखं, 
नाहीच उघडणार! 
असे स्वतःला न सांगता म्हटलो, 
बघूच आता कशी नाही उघडत ते! 

पहिल्या प्रयत्नातच उघडली! 

चमकून दुसऱ्या बाजूने प्रयत्न केला, त्याच निर्धाराने,
अगदी सहज उघडली! 

प्रयत्न करण्यापूर्वीच ते अयशस्वीच होणार असा विचार केला, 
तर ते नक्कीच फसतात! किल्ली नव्हे माझे प्रयत्न सदोष होते! 

डोक्याला हात लावला, पण म्हटले ह्या बद्दल मस्त राईट-अप लिहावा आता,
सकारात्मक विचारवाला,

इतक्यात बायको आतून जवळ जवळ धावत बाहेर आली,
"खबरदार! 
माझी ओरिजिनल किल्ली नाही बरं का घ्यायची!
ती पण हरवशील!
ही घे तुझीवाली
डुप्लिकेट!"

Post to Feed
Typing help hide