वाड्याच्या जीवनी

वाडा हा चोसोपी

ओटीवर झोपाळा
माजघरात बैठक
पान तंबाखूची
दगडी जिन्यांचे
सापासारखे विळखे
वरचे मजले आता 
रिकामे झाले
केव्हातरी पूर्वी
कणखर आवाज
आणि भेदक नजर
असणारच
केव्हातरी पूर्वी
सोवळ्यात स्वयंपाक
पंगतीच्या पंगती
उठल्या दिनराती
केव्हातरी पूर्वी
चुलीजवळ कांकणे
असतील वाजली
अन केव्हाच मोडली...असतीलही
केव्हातरी पूर्वी
बाळंतिणीच्या खोलीतून
टँ टँ .......
झाला असेलच
केव्हातरी पूर्वी
सोनपाऊले बाळाची
माजघरातील बैठक
विस्कटली
केव्हातरी पूर्वी
आजोबांच्या आवाजात
मंत्र तंत्र पूजा 
झाली असेलच
आता ती बाळे
विखुरली देशोदेशी
रडणारी माऊली
एकटी पडली
पत्र नाही,फोन नाही
क्वचितच येणं
मड्डम घेऊनी
बाळ आला
असेल म्हणाला
" धिस इज एन्शंट इंडिया
माय डियर
यू मे नॉट लाइक
बट आय हँव मेमरीज " 
एवढेच राहिले
जुन्याशी संबंधित
घुसमट जन्माची 
जीवघेणी
कर्ज, जप्ती 
वीक टीक
रिते वाड्याचे 
अंतर
सोने चांदी
लुप्त सारे
गहाण बुद्धी 
गहाण सारे
सावकारे
लुबाडले
वाडा 
रिकामा पडला
शेवटचा दिवस
वाड्यातून मिळाला 
पैसा हा अमाप
विकता गुजराथ्याला
वाडा हा चौसोपी 
ओटीवर झोपाळा
माजघरामधे नाही बैठक 
आता पान तंबाखूची.