स्पिनोझाचा देव

    अमेरिकेतील अनेक विद्यापीठात भरणाऱ्या वैज्ञानिक सम्मेलनात हजर रहाताना आइनस्टाइनला एका प्रश्नास हटकून तोंड द्यावे लागे आणि तो म्हणजे "तुमचा देवावर विश्वास आहे का? Do you believe in God ?" आणि तो नेहमी उत्तर द्यायचा "हो,स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे,"स्पिनोझा हा एक डच तत्त्वज्ञ धर्माने ज्यू होता,त्याकाळात रेने देकार्त या फ्रेन्च तत्त्वज्ञाबरोबर त्याचाही एक विवेकवादी तत्वज्ञ म्हणून  बोलबाला होता..सतराव्या शतकात  ऍमस्टरडॅम येथील एका यशस्वी पण फार श्रीमन्त नसणाऱ्या उद्योजकाचा हा मुलगा ! स्पिनोझाच्या मते देवाची कल्पना अशी होती.
     देव असे म्हणत असणार,"उगीचच आपले उर बडवीत माझी प्रार्थना व पूजा करू नका. उलट जरा बाहेर नजर टाका आणि मी तुमच्यासाठी काय काय केले आहे त्याचा उपभोग घ्या.तुम्ही मौज करावी,गाणी म्हणावीत मी तुमच्यासाठी जे निर्माण केले आहे त्याचा उपभोग घ्या आणि त्याची मजा लुटा.त्या अंधुक प्रकाशाने भरलेल्या ,थंड ,उदास देवळात (चर्च) ज्याला तुम्ही माझे घर समजता; जायचा विचारही करू नका.माझे घर आहे मोठमोठ्या पर्वतशिखरात,झुळझुळ वाहाणाऱ्या नद्यांत,सरोवरात, अफाट पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर.या जागा आहेत जेथे माझे वास्तव्य आहे आणि तेथेच माझे तुमच्यावरील प्रेम मी व्यक्त करत असतो.आपले  आयुष्य जर दुःखी असेल तर त्याबद्दल  मला दोष देणे बंद करा,तुम्ही पापी आहात असे मी कधीच म्हणत नाही. उगीचच मनात भीती बाळगू नका.मी काही तुमच्या कृत्यांचा जाब विचारायला बसलो नाही.त्यामुळे  तुमच्यावर टीका करायचा किंवा तुमच्यावर रागावण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही.मला कशाचेच सोयर सुतक नाही ,तुम्हाला शिक्षा करायला मी बसलो नाही. मी म्हणजे केवळ प्रेमाचा सागर आहे,  
      उगीचच माझ्याकडून क्षमायाचना करू नका.क्षमा करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो ? .तुमच्या भावना,आकांक्षा ,आनंद. गरजा,मर्यादा ,वर्तनातील विसंगती  या सर्व तुमच्या ठायी मीच निर्माण केलेल्या असताना त्याबद्दल मी तुम्हाला कसा दोष देणार आणि कशी तुम्हाला शिक्षा करणार ?.माझी सर्व लेकरे तुम्हीआहात. जी अयोग्य वागतील त्याना पुढील अनंत काळापर्यंत उकळत्या तेलात किंवा धगधगत्या ज्वालात टाकण्याची शिक्षा देण्यासाठी एकादी जागा मी तयार केली आहे असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.
       माझ्या काही आज्ञा किंवा कायदे आहेत असे मुळीच समजू नका. तुमच्या मनात उगीचच अपराधीपणाची जाणीव त्यामुळे निर्माण होते.आपल्या वडीलधाऱ्यांचा मान राखा आणि आपल्याला त्रास होऊ नये असे तुम्हास वाटते तो उपद्रव आपल्यामुळेही इतरांना होणार नाही याची कालजी घ्या.फक्त एकच गोष्ट मला अपेक्षित आहे ती म्हणजे केवळ आपल्या आयुष्याविषयी दक्ष रहा,ही दक्षताच तुमचा मार्गदर्शक आहे.हे आयुष्य म्हणजेच सर्व काही आहे आणि तेवढेच तुम्हाला आवश्यक आहे.मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे .त्यात तुम्हाला काही बक्षीस मिळणार नाही की शिक्षाही होणार नाही. पाप किंवा पुण्य असे काही नसते,तुमच जीवन हेच स्वर्ग किंवा नरक बनवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
     या आयुष्यानंतर पुढे काही आहे की नाही हे मी सांगणार नाही पण यानंतर असे काही नाही असे समजूनच चाला जे काही आनंद उपभोगणे ,प्रेम करणे  करायचे आहे त्यासाठी हीच एक संधी आहे. तुमची काही तक्रार नसेल तर मी दिलेल्या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घेतलात असे मी समजेन. आणि काही असेलच तरी मी काही तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही चांगले वागलात  किंवा नाही.मी फक्त विचारेन की तुम्ही आयुष्याचा आनंद लुटलात की नाही?तुम्हाला ते आवडले की नाही.मजा आली का  तुम्हाला.त्यात जास्त मौज कशात आली.तुम्ही काय शिकलात?
    माझ्यावर विश्वास ( टाकून निष्क्रीय राहणे) टाकणे सोडा.कारण तसे करणे म्हणजे काहीतरी अध्याहृत धरणे,कल्पना करणे .जेव्हां आपल्या प्रिय व्यक्तीचे चुंबन घ्याल तेव्हां माझी जाणीव तुम्हाला व्हावी.आपल्या छोट्या मुलीबरोबर तुम्ही खेळत असाल,किंवा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळत असाल किंवा समुद्रात स्नान करत असाल  तेव्हां माझी जाणीव तुम्हास व्हावी.
   माझी स्तुती करण्याचे कारण नाही.स्वत:ला कुणीतरी मोठा समजणारा प्राणी मी आहे असे का वाटते तुम्हाला ? तुमच्या स्तुतिस्तोत्रांनी मला अगदी कंटाळा येतो.खरच माझ्याविषयी इतक वाटतं ना ? तर ते प्रत्यक्ष स्वत:ची,सभोवतालच्या जगाची काळजी घेऊन व्यक्त करा.तुमचा आनंद व्यक्त करा ती माझी खरी स्तुति ठरेल.एकच सत्य आहे ते म्हणजे तुम्ही येथे आहात,आणि हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. आणखी मग काय हवं तुम्हाला आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकताच काय ?मी कोठेतरी बाहेर आहे असे समजून मला शोधू नका तुमच्या आत मी आहे हे निश्चित समजा.तुमच्या हृदयाच्या ठोक्यात मी आहे.
बरुच डी स्पिनोझा   
----------------------------------------------------------------------------------------------------------------------- तुकोबानी तरी दुसरे काय सांगितले आहे ? देह देवाचे मंदीर । आत आत्मा परमेश्वर॥
मूळ लेख इंग्रजीत आहे त्याचा हा शब्दशः अनुवाद आहे.