सिमला ऑफीस

           नुकताच औरंगाबादला गेलो (अर्थात हे कोविद १९ चे आगमन होण्यापूर्वीचे आहे).व १०  जुलै तारखेस परत यायचे ठरवले तर कोणीतरी शंका काढली  नऊ तारखेपासून बारा पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे.  अलीकडे  मी घरच सोडत नसल्यामुळे अश्या इशाऱ्यांची दखल घ्यायचे मला कारण पडत नाही.( त्यामुळे कोविद १९ नंतरच्या इशाऱ्यांमुळेही माझी फारशी कुचंबणा झाली नाही.असो ! ) पण आता मात्र मी विचार करू लागलो  पण शेवटी परत येणॅ आवश्यक असल्यामुळे धाडस करून निघालोच आणि मुसळधारच काय पण एक थेंबही पाऊस न लागता पुण्यास  परतलो.  
         पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर वसतिगृहात राहावे लागले. पहिल्या वर्षासाठी ज्या खोलीत मी प्रथम काही दिवस राहिलो तिच्या खिडकीतून वेधशाळेच्या इमारतीच्या मनोऱ्यावरील घड्याळ दिसायचे इतकेच काय पण तासाचे टोलही पडायचे त्यामुळे आपण वेधशाळेजवळ रहात आहोत याची जाणीव तासातासाला व्हायची.  त्यावेळीही वेधशाळेचे अंदाज बव्हंश चुकीचेच निघायचे. व त्याची यथास्त चेष्टा विनोदी साहित्यात केलेली असायची . आमच्या वसतिगृहाच्याजवळ जो बसस्टॉप होता त्याचे नामकरण मात्र सिमला ऑफिस ऑब्झर्वेटरी असे होते. हे सिमला ऑफिस काय प्रकरण आहे बरेच दिवस मला कळले नव्हते पण नंतर हवामानखात्याचे हे कार्यालय ब्रिटिशांच्या काळात प्रथम सिमला येथे होते व नंतर ते पुण्यास स्थलांतरित झाले असे कळले पण ते सिमल्यासारख्या साहेबपुरस्कृत हवेशीर जागेतून एक्दम पुण्यात का आले याचा मात्र उलगडा बरेच दिवस म्हणजे अगदी अभियांत्रिकी पदवी घेऊन नोकरीत शिरेपर्यंत कळले नव्हते.
            पुण्यातील सिमला ऑफीस हे नाव कसे पडले याविषयी मला एकाने सांगितलेला किस्सा नंतर कळला अर्थात त्याच्या सत्यतेविषयी काही सांगता येत नाही..पुण्यातील वेधशाळेचे कार्यालय साहेबाच्या काळात  सिमल्यासच होते .त्यावेळी जो व्हाइसरॉय होता त्याला एकदा त्याच्या खास दोस्ताना पार्टी द्यायची होती आणि ती त्याच्या बंगल्याच्या पटांगणात ! त्यामुळे वेधशाळाप्रमुखाला फोन करून त्याने पार्टीच्या  दिवशी संध्याकाळी हवा कशी असेल याविषयी विचारणा केली त्यावर त्याने साहेबांचे काम म्हणून जरा पहाणी करून सांगतो असे सांगितले.थोड्या वेळाने त्याने साहेबांना फोन करून "काही काळजीचे कारण नाही हवा एकदम स्वच्छ राहणार आहे पाऊस पडणार नाही "असे सांगितले‌‌. साहेबानी मग पार्टीचे निश्चित करून मित्रांना आमंत्रणे दिली.पार्टीच्यादिवशी सकाळी साहेब फिरायला बाहेर पडले असता  त्यांना एक लमाण आपली गाढवे हाकीत रस्त्यावरून जाताना दिसला.त्याने साहेबाच्या बंगल्यासमोरील गडबड पाहिली होती.आणि उत्सुकतेने दरवानाला त्यामागचे कारणही विचारले होते.त्यामुळे साहेबाला पाहून आदबीने नमस्कार करून तो लमाण म्हणाला,"साहेब आज संध्याकाळी पाऊस येणार आहे.""तुला कसे कळले?" साहेबाने विचारले.यावर "साहेब मला कळत नाही पण  माझ्या या गाढवाला बरोबर कळते पाऊस येणार असेल तर." त्याचे उत्तर ऐकून साहेबाला हंसू आवरेना तरीही घरी परत आल्यावर त्याने वेधशाळाप्रमुखास फोन करून खरच पाऊस येणार नाही ना याची चौकशी केली.आणि त्याने पुन्हा ठामपणे पाऊस निश्चित येणार नाही अशी ग्वाही दिली.त्यामुळे साहेब निश्चिंत झाले.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळी पार्टी रंगात आल्यावर अगदी धोधो पाऊस आला आणि पार्टीच्या रंगाचा नेरंग झाला‌. साहेब एकदम संतापले आणि त्यानी वेधशाळेचे ते ओफिसच तेथून उचलून पार पुण्यात नेऊन टाका असा हुकुम दिला.तेव्हापासून म्हणे वेधशाळा पुण्यात आली सिमला ऑफिस या नावामागचा इतिहास असा आहे म्हणे ! 
         आंतरजालावर पाहता खरोखरच १९२८ मध्ये शिमला ऑफिस पुण्यात स्थलांतरित झाल्याचा उल्लेख वाचून कदाचित गोष्ट खरीही असेल असे वाटले आणि अजूनही त्यांनी आपली चुकीचे भाकित करण्याची परंपरा मात्र सोडली नाही हे लक्षात आले..त्यामुळे वेधशाळेने पाऊस पडणार नाही असा हवाला दिला की लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतात.  पण अश्याच प्रकारची गोष्ट सांगून  अब्राहाम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर यानी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत व्हाइटहाउअसमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या आपल्या काही अतिशहाण्या दोस्तांना गप्प बसवले होते.हे त्याचे दोस्त आपला दोस्त अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर आपल्यालाही काही मानाची पदे मिळावीत या अपेक्षेने लिंकनकडे आले. त्यांच्या येण्याचे कारण लिंकनला माहीत होते त्यामुळे त्याना गप्पात रंगवून लिंकनने वरील कथा त्याना सांगितली.अर्थात ती जरा वेगळ्या प्रकारे सांगितली कारण तेव्हां सिमला हाउस पुण्यात हलायचे होते.लिंकनने व्हाइसराय ऐवजी राजाकडे मेजवानी होती असे सांगितले आणि त्या कथेचा शेवट  पटांगणात मेजवानी करण्याचा सल्ला त्याला  ज्या प्रधानाने दिला होता त्याला त्याने गचांडी  दिली आणि मग त्या गाढवासच प्रधान करून टाकले असा केला होता. .ते मित्रही लमाणाच्या गाढवाइतकेच हुषार असल्याने ती गोष्ट लिंकनने आपल्याला का सांगितली याविषयी बुचकळ्यात पडले पण ती गोष्ट सांगून थोडा वेळ थांबून लिंकनने त्यावर शेरा मारला"त्यावेळपासून प्रत्येक गाढवाला आपणही प्रधान व्हावे असे वाटू लागले  " लिंकनचे दोस्त इतकेही काही अडाणी नव्हते की या शेऱ्याचा अर्थ समजू नये पण त्याचबरोबर एवढेही (आजच्या राजकारण्यांसारखे) निर्लज्ज नव्हते की इतके ऐकूनही आपला आग्रह चालूच ठेवतील त्यामुळे या पेचप्रसंगातून  लिंकनची सुटका झाली.
(पुणे वेधशाळेची स्थापना जुलै १९२८ मध्ये झाली.)