बायकोची अम्माजान!

बायकोची अम्माजान!  

उद्या आईचा वाढदिवस!
फोन केला,
गयावया केल्या, 
की "या पुण्यात! "
पण बाबा नाही म्हणजे नाहीच तयार होत!  
त्यात आता ह्या साथीचा मजबूत बहाणा मिळाला आहे त्यांना!  
मी अपेक्षा करणे सोडून दिले होते.  
इतक्यात सकाळी इंटरकॉम खणाणला.  
इंटरकॉम हे प्रकरण आता गेटवरच्या सेक्युरिटीसाठीची हॉट लाईन झाले होते.  
म्हणजे त्यावर फक्त सेक्युरीटीचाच फोन येतो.  
त्यामुळे संभाषणाच्या उत्सुकतेने नाही तर तो आवाज बंद व्हावा ह्या हेतूने मी पटकन उचलला!  
पलीकडून, "साहब जी, आप का अम्माजान आया हैं! "
इकडून "काय? ????????????????????"
(सिक्युरिटी सोबत कितीही हिंदी बोलायची हौस असली तरी भावनांचा उद्रेक तोंडातून निघताना आईच्या भाषेचाच पदर पकडतो! )
श्वास ही न घेता मी पुढे म्हणालो, "अरे भेज दो अंदर! "
त्यावर तो उत्तरला, "नहीं भेज सकते, आप को लेने को आना पड़ेगा! "
नवे नियम असणार म्हटलं,  
मनाचा एक भाग तिथून पुढे गेट जवळ पोहोचण्या पर्यंत 'आपली सोसायटी आणि त्यातील रोज बदलणारे नियम' 
ह्यावर आंतरिक संवाद सुरू करू इच्छित होता,
पण दुसऱ्या एका भागाने त्याला गप्प केलं.  
"आई आलीये राव आपली....! " 
हा विषय जास्त प्रिय होता.
पटापट बाहेर निघालो. लिफ्ट बाराव्या मजल्यावरून तिच्या वेगाने खाली घसरत होती.  
"कसे आले असतील?  
आत्ता पोहोचले म्हणजे नक्कीच भल्या पहाटे निघाले असतील!
खरंच आई - बाबा म्हणजे ग्रेट च!  
खरं प्रेम ह्याला म्हणतात. मी नुसतं म्हटलं आणि आले सुद्धा!  
असं बाबांना त्यांचं तिथलं जग सोडून इकडे यायला सांगणं म्हणजे आपण किती वाईट!  
पण आई महान आहे. बरोबर पटवते ती बाबांना!  
तिला तरी सोप्पं असतं का इकडे येणं..
वगैरे विचारांत तळ मजला आला!  
भावनांना सावरत गेट जवळ पोहोचलो!  
.
.
.
.
खांदे पाडून परत वर आलो.  
कुरिअरने आलेला डबा वैतागून सोफ्यावर टाकला...
आतून बाहेर येताना डब्याकडे लक्ष जाताच
ही जवळ जवळ किंचाळलीच 
"ओह वाऊ! आले का माझे पडदे!  
ऍमेझॉन (म्हणजे त्या सिक्युरिटीवाल्याचे अम्माजान) ग्रेटच!"