संगीतकार पु. ल.

उद्या पुल ऊर्फ भाई हे व्यक्तिमत्व आपल्यातून जाऊन वीस वर्षे होतील. पण त्यांचं आपल्या हृदयातील स्थान अढळ आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या एका जरा उपेक्षित पैलूवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न
         
             " संगीत हे माझे पहिले प्रेम आहे " असे उद्गार स्वत: पु.ल. यानी अनेक ठिकाणी काढले आहेत आणि सुनीताबाईंनीही आपल्या "आहे मनोहर तरी गमते उदास"या पुस्तकात याचा पुनरुच्चार केला आहे.. लहानपणापासूनच पु.ल.हार्मोनियमवर बोटे फिरवायला लागले आणि हा त्यांचा कल लक्षात घेऊन च त्यांच्या वडिलांनी हौसेने भारीपैकी हार्मोनियम त्याना आणून दिली आणि बाल  पुरुषोत्तमाने बालगंधर्वांसमोर त्यांच्याच नाटकातील पद वाजवून त्यांच्याकडून वाहवा मिळवली. सुरवातीला ते भावगीत गायनाचे कार्यक्रमही करत असत असे त्यानी नमूद करून ठेवले आहे,पण त्यांच्या पेटीवादनाखेरीज त्यांच्या संगीताचा इतरत्र उल्लेख फार कमी आढळतो.अगदी दोन भागात काढलेल्या भाई चित्रपटामध्येही  "कानडा राजा पंढरिचा " या पु.ल. शी काडीमात्रही संबंध नसलेल्या गाण्याला (केवळ त्यापैकी एक गायक पु.लं.चे दोस्त वसंतराव देशपांडे  आहेत म्हणून असावे) पु.लं.ना पेटी वाजवायला लावून त्यांचे संगीतप्रेम दाखवले आहे.
    पु.लं.नी एकूण फार मोठ्या संख्येने गीते संगीतबद्ध केली नाहीत पण प्रत्येक गाण्यात त्यानी आपले वैशिष्ट्य दाखवले आहे."गुळाचा गणपती" व "देवबाप्पा" या दोन्ही चित्रपटातील प्रत्येक गाणे अतिशय बहारदार सुरांनी  नटलेले आहे.विशेष म्हणजे रागदारीवर आधारित  गीते रागाची रुक्षता न येऊ देता त्यांनी स्वरबद्ध केली आहेत. देवबाप्पा चित्रपटातील "करू देत श्रुंगार :हे चंद्रकंस रागावर आधारित आहे पण ते इतके वेगळे वाटते. तोच चंद्रकंस "हसले मनि चांदणे" या माणिक वर्मांनी गायिलेल्या भावगीतात एकदम अवखळ वाटतो. तीच गोष्ट "गुळाचा गणपति"मधी केदार रागातील "ही कुणी छेडिली तार "याशिवाय भीमसेन जोशींचे गाजलेले भजन "इंद्रायणी काठी " चा भीमपलास काही वेगळाच वाटतो.इथेच टाका तंबू या "गुळाच्या गणपति" तील गाण्यातील संगीतात व चालीत अरेबियन पद्धतीचे सूर वापरून वेगळाच ढंग भरला आहे. "नाच रे मोरा " मधील चाल आणि ताल खरोखरच लहान मुलांना वेड लावणारे आहे पण त्याच बरोबर पूर्ण शास्त्रीय संगीताची बैठक असलेले आहे हे वैशिष्ट्य.    "गोरी गोरी पान" या गदिमांच्या गीतास श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले आणि ते खूपच गाजले तेव्हां गदिमानी खळ्यांना शाबासकी देताना "अहो खळे तुम्ही मला सगळ्या महाराष्ट्रात पोचवले" असे उद्गार काढले तेव्हां खळ्यांनी मात्र "नाच रे मोरा"  या गाण्याचा उल्लेख करून ते बालगीत जास्त प्रसिद्ध झाले होते असे उद्गार काढले, असा उल्लेख आढळतो."माझिया माहेरा जा " हे जोत्स्नाबाईंचे गीत त्या काळी प्रत्येक नववधूच्या मनात घोळत असायचे. विशेष म्हणजे पु.ल.तबला व बासरीही उत्तम वाजवायचे असाही उल्लेख आढळतो.
        संगीत दिग्दर्शनाकडे पाठ फिरवल्यावरही पं.जितेन्द्र अभिषेकी यांच्याकडून त्यानी "शब्दावाचुन" व "माझे जीवनगाणे" ही दोन अतिशय हळुवार चालीतील भावगीते म्हणून घेतली. सध्या "शब्दावाचुन " काही इतर गानमहर्षीं  सध्या सच्च्या सुरावाचून आणि कच्च्या शब्दोच्चारांनी वेगळ्या प्रकारे गाजवले आहे ते अलाहिदा !
       "गुळाचा गणपति" व देवबाप्पा" हे दोनच चित्रपट संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्याला चटकन आठवतात पण त्याशिवाय तब्बल आणखी  नऊ चित्रपटांना त्यानी संगीत दिलेले आहे.ते म्हणजे चोखामेळा ,मानाचे पान, मोठी माणसे, नवराबायको, देव पावला, दूधभात, घरधनी, नवे बिऱ्हाड, आणि अंमलदार याशिवाय जोत्स्ना भोळे, माणिक वर्मा अ आशाबाई यांच्याकदून त्यानी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या जेमतेम विशीच्या घरात जाईल.हिंदी चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या "सज्जाद" या संगीत दिग्दर्शकाने फक्त १५ च चित्रपटांना संगीत देऊनही संगीत दिग्दर्शक म्हणुन त्याला खूप नावाजले जाते.अर्थात सज्जादच्या चित्रपटांची संख्या कमी असण्याचे एक कारण त्याच्या स्वभावातील काही दोष कारणीभूत होते.आणि नावाजले जाण्याचेही तेच कारण आहे.मात्र अकरा  चित्रपटांना आणि अनेक भावगीतांना संगीत देऊनही संगीत दिग्दर्शक म्हणून पु.लंना फारसे कोणी नावाजले नाही,त्यात कदाचित त्यांच्या स्वभावातील या क्षेत्राकडे केवळ हौस म्हणून पहाण्याची वृत्ती कारणीभूत असावी.
        पु.लंनी विनोदाने आपल्या घरात आपण देशपांडे आणि सुनीताबाई  म्हणजे  (उप) देशपांडे  म्हटले आहे, "आहे मनोहर तरी"याच पुस्तकात सुनीताबाईंनी "भाई" चित्रपटक्षेत्रात रमले होते हे मान्य केले आहे.आणि त्यांच्या सूचनेवरून त्यानी चित्रपटक्षेत्र सोडले नसते तर " पु,ल.यांची चित्रपट्क्षेत्रातील कामगिरी खूप अधिक झाली असती.गाण्यांना चार चाली अधिक दिल्या असत्या.------- मुख्य म्हणजे काम त्यांच्या आवडीचे होते. + हे सुनीताबाईंचेच उद्गार. तरीही हे क्षेत्र त्यानी सोडावे असे सुनीताबाईंनी सुचविले व ते भाईंनी मान्य केले कारण सुनीताबाईंच्याच शब्दात "नट म्हणून भाईने काही चांगल्या भूमिका केल्या हे खरे पण अगदी पहिल्या प्रतीच्या अभिनेत्यात त्याची गणना करता येईल का?संगीतदिग्दर्शक म्हणून त्याने काही फार चांगल्या चाली दिल्या पण त्याच्याच काळातील मराठीतलाच संगीतदिग्दर्शक म्हणून सुधीर फडके भाईहून कितीतरी वरचढ नव्हता का ?" थोडक्यात विनोदाने म्हणायला गेल्यास (उप) देशपांडे यांनी यानी त्याना मारुनमुटकून लिहायला बसवले नसते तर त्यानी कदाचित संगीत क्षेत्र सोडले नसते आणि कदाचित गाजवलेही असते.  त्या क्षेत्रात भाई रमत असले तरी त्या क्षेत्रातील विपरीत वृत्ती व माणसे यामुळे" यात भाईचे आयुष्य फुकट वाया जात आहे असे मला त्या काळी प्रकर्षाने वाटले. ते सार्थकी लागावे म्हणून धडपड हेच माझे आयुष्य बनले " असेही सुनीताबाई पुढे म्हणतात. आपण हे बरोबर केले का हा प्रश्न त्यांचा त्यानाच पडला आहे असे त्यांच्या पुस्तकातील काही उद्गारावरून वाटते.तरीही आपल्या संगीताने भाईंनी रसिकाना खूप आनंद दिला हे   निश्चित !