बटाट्याच्या चाळीतला 'लॉकडाऊन'

बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली!
चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली.
चाळकऱ्यांचं 'लॉकडाउन' यामुळे होऊ लागलेल्या 'अप-डाउन'मधून मार्गी (?) लागलं. 'निदान गच्चीतली हवा आणि ऊन तरी खायला मिळतील,' अशा समजातून ते मेंढेपाटलांना दुवा देऊ लागले. (अनेक जण भाडं देत नव्हतेच त्यामुळे मेंढेपाटलांना चाळीकडून जी काही नवीन प्राप्ती झाली ती इतकीच.)
'गच्चीत सुरक्षित अंतर ठेवून धान्य-विक्री करता येईल' असा चापशीचा अंतस्थ हेतू होता. तो जाणल्यामुळे किंवा गच्चीमुक्तीच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान न लाभल्यामुळे आचार्य बाबा बर्वे मात्र हिरमुसले. त्यातच चापशीच्या कुलूप उघडण्याचा सोहळा पोंबुर्पेकरानं त्याच्या 'चाळभैरव' या (अ-)नियतकालिकाच्या 'फेसबुक' पानावर 'लाइव्ह' दाखवला!
नागूतात्या आढ्यांचा प्रत्येक गोष्टीलाच विरोध. 'खोलीबाहेरच पडता कामा नये' असं त्यांचं म्हणणं होतं.
'सगळेच लोक जर एकदम गच्चीत जायला लागले तर त्यांच्यांत अंतर राहणार कसं?' असा प्रश्न जोगदंडांनी एकदा जिना चढताना विचारला. त्यावर 'आपण प्रत्येक खोलीसाठी वेळ ठरवली पाहिजे' असं कोचरेकर मास्तरांनी वरच्या दारातून सुचवलं. अर्थात, त्याची अंमलबजावणीही त्यांच्यावरच आली.
दुसऱ्या दिवशी जिन्याखालच्या भिंतीवर एक वेळापत्रक चिकटवलेलं चाळकऱ्यांना दिसलं. सोबत गच्चीचा आराखडा आणि त्यावर आखलेले एक-दिशा मार्ग! 'सुरक्षित अंतर ठेवून वीस मंडळी एका वेळी गच्चीत मावू शकतात. चापशीच्या दुकानाच्या वेळेत ही संख्या दहावर येईल' अशा सूचनेसकट.
वेळापत्रकाची फक्त झलक -
५.५५ ते ६.०० - जिना चढण्याची वेळ.
६.०० ते ६.३० - बर्वे (पहिला क्रमांक मिळाला म्हणून बाबा खूष!), सोमण, पावशे, गुप्ते.
६.३० ते ६.३५ - जिना उतरण्याची वेळ.
६.३५ ते ६.४० - पुढील मंडळींच्या जिना चढण्याची वेळ....
अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या चाळकऱ्यांसाठी स्वतंत्र वेळा होत्या.
काही दिवसांतच 'नळ आणि इतर विधींचा वेळापत्रक?' अशी तळटीप त्यात सामील झाली. मालवणीत 'चे' चा 'चा' होतो हे काहींना माहिती होतं. मग त्यावर 'जनोबा तुझो आणि नळाचो काय संबंध?' अशी अजून एक टिप्पणी आली. हळू हळू या भित्तीपत्रकाशेजारी 'चाळभैरव', कविता (नाही निर्मळ हात? -  करोना करेल घात!), 'आज रात्री नऊ वाजता टाळ्या' (त्यात नागूतात्यांची 'मग शिट्ट्याही का नाहीत?' ही भर) इत्यादी बातम्याही चिकटू लागल्या.
मंगेशराव, वरदाबाई आणि काशिनाथ नाडकर्ण्याचा मुलगा यांची वेळ एकच होती. त्यांनी गच्चीत पेटीवादन, तबलावादन आणि गायन दोन-दोन मीटरचं अंतर ठेवून सुरू केल्यावर आणि त्याला नाट्यभैरव कुशाभाऊंच्या स्वगतांची जोड मिळाल्यावर चाळकऱ्यांनी आपल्या खोलीतच आपल्याला 'विलग' केलं!
चाळीच्या (विशेषतः जिन्याच्या) दीर्घारोग्यासाठी बाबलीबाईंनी मात्र स्वतःच गच्चीप्रयाण करणं टाळलं.
नागूतात्या मोदी-ट्रंप यांच्या निवेदनांपासून बटाट्याच्या चाळीतल्या या संवेदनांचं धावतं वर्णन आपल्या खोलीच्या दारात उभं राहून, जो कोणी जिन्यात दिसेल त्याच्याशी करत होते. प्रत्येक संभाषणाचा शेवट मात्र 'मी हे आधीच ओळखलं होतं' हा असायचा.
एकदा ते दारात दिसले नाहीत तर चाळकऱ्यांनाही चुकल्यासारखं वाटलं.
... त्यांना करोनाची बाधा होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं!
बटाट्याची चाळ अजूनही आत्मनिर्भरपणे का उभी आहे हे तेव्हा जगाला कळलं. त्या बाजूच्या खोल्यांचं विलगीकरण झालं. कुणी त्यांच्यासाठी नाश्ता पाठवला तर कुणी जेवण. डॉ. (कंपाउंडर) हातवळणे, चवाथे नर्सबाई, समेळकाका (न्यू गजकर्ण फार्मसी) यांनी त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारी घेतली. दोन आठवडे, रोज, अण्णा पावशे त्यांची कुंडली मांडत होते आणि आचार्य बाबा बर्वे एका वेळच्या उपोषणावर होते.
अखेर नागूतात्या बरे झाले. ते पुनः दारात आल्यावर अख्ख्या चाळीनं टाळ्या वाजवल्या. 
'मी हे आधीच ओळखलं होतं' एवढंच ते म्हणाले...
- कुमार जावडेकर
आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांनी पु. ल. स्मृतिदिनानिमित्त (१२ जून २०२०) आयोजित केलेल्या 'पुलोत्सव - करोनावरची वरात' या स्पर्धेत निवडली गेलेली कथा.