कोकणातील घर

कोंकणातील घर

मी आजवर माझ्या गावी गेलो नव्हतो. मला फक्त ऐकून माहिती होते की माझ्या गावाचे नाव मठ बुद्रुक आहे आणि ते कोंकणात कणकवली जवळपास कोठे तरी आहे. 
यापेक्षा जास्त जर मला कोणी माझ्या गावाची माहिती विचारली असती तर मी काहीही सांगू शकलो नसतो. मी काय माझ्या आईने सुद्धा तिचे लग्न झाल्यापासून बाबांचं गाव बघितले नव्हते. हां बाबा क्वचित प्रसंगी एक दोनदा तिथे गेले होते. तिथे आजोबा आणि त्यांच्या बाकी भावांनी मिळून बांधलेले एक मोठे घर अजूनही आहे असे ते सांगत. आता त्या घरात कोणीच राहत नाही. कामा निमित्त सगळीच भावंडं पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई मध्ये कायमची स्थायिक झाली आहेत. आणि पाठी राहिलं आहे ते गावातील ओसाड घर, कायम आम्हा सर्वांची वाट पाहत. 
त्या दिवशी आमचा सहजच घरात विषय निघाला, "एकदा तरी गावी जाऊन यायला हवं. नुसते बघून तर येऊ काय आहे ते." 
आईची गावी जायची खूप इच्छा होती. बाबांनी सांगितले, "तिथे आता कोणी राहत नाही. घराची चावी तिथेच शेजारी परब म्हणून राहतात त्यांच्या कडे असते. आणि आता लगेचच आपल्याला ट्रेनची तिकिटे देखील मिळणार नाहीत." 
मी म्हटलं, "मग गाडी करून जाऊ आजकाल ओला कॅबची आऊट स्टेशन म्हणून एक सुविधा उपलब्ध आहे." 
आई लगेच म्हणाली, "हो काही हरकत नाही.. आपण गाडी करूनच जाऊया. एकदाच जाणार नंतर काय माहीत.. मिळेल नाही मिळेल जायला. इतके वर्षात ते कधी जाणं झालं नाही." शेवटचं वाक्य बाबांकडे बघून मारलेला टोमणा होता. 
मी म्हणालो, "मी कणकवली मध्ये राहायला हाॅटेल बुक करतो. उगीच तिथे जाऊन गैरसोय नको." 
आणि त्यात आई, बाबा दोघांना डायबिटीस असल्यामुळे मला त्यांच्या तब्येतीला घेऊन कसलाही धोका पत्करायचा नव्हता.
 आम्ही जायचा दिवस ठरवला मी, आई आणि बाबा जाणार होतो. चार दिवसांसाठी मी कणकवली मध्ये हाॅटेल निलम कंट्री साइड म्हणून एक हाॅटेल होते तेथे आमचे बुकिंग केले, ओला आऊट स्टेशन कॅब बुक केली. ठरलेल्या दिवशी सकाळी आम्ही तिघे गाडीने जायला निघालो. प्रथम आईच्या गावी नेरुरला जाणार होतो, तिथून परुळ्याला आदिनारायण आणि मग मठ बुद्रुक असा कार्यक्रम ठरला. 
सप्टेंबर महिना होता... जाताना  आम्हाला पाऊस लागला. पावसाळ्यात कोंकणात स्वतःची गाडी घेऊन जाण्यात मजाच वेगळी. घाटातील निसर्ग सौंदर्य आम्ही जागोजागी थांबून थांबून बघितले. मध्ये एक दोनदा चहा घेतला. त्यामुळे हाॅटेलवर पोहचायला आम्हाला उशीर झाला. पण आम्हाला कुठली घाई होती. 
आई तर खूप उत्सुक होती. 
लग्नानंतर ती आज पहिल्यांदाच गावी जात होती आणि ह्या निमित्ताने तिला तीच्या गावी नेरुरला सुद्धा खूप वर्षांनी जायची संधी मिळाली होती. तिने मला आधीच तिथे कलेश्वराचं दर्शन घ्यायला थांबायचे हे बजावले होते. मी ही तिला "हो" म्हणालो होतो.
हाॅटेलवर पोहचल्यावर आम्ही त्या दिवशी आराम केला आणि पुढील दोन दिवसांत ठरवलेल्या प्रमाणे नेरुर, कलेश्वर मंदिर, परुळ्याचा आदिनारायणाला जाऊन आलो.  
गाडी बरोबर असल्या कारणाने प्रवास आणि भेटी मनाजोग्या झाल्या. आपली माणसे भेटल्यामुळे आई खूप आनंदी होती. प्रत्येकाच्या घरी जाताना तिने न विसरता खाऊ वगैरे घेतला होता. आईच्या नातेवाइकांनी सुद्धा कोणी नारळाची कापं कोणी कडकडे लाडू पिशवी भरून आईला भेट दिले. न थकता ती सगळ्यांशी गप्पा मारत होती. मी आणि बाबा फक्त खुर्चीत बसून तिचा उत्साह पाहत होतो. रात्री हाॅटेलवर पोहचल्यावर देखील ती, किती तरी वेळ अजूनही मनाने आजोळच्या त्या मोठ्या तुळशी वृंदावनापाशी घुटमळत होती.
 मी तिला उद्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली. सकाळी उठून आम्ही मठ बुद्रुक ला जाणार होतो आणि तिथे जाताना वाटेत बाबांच्या गावातील बहिणीला भेटून जाणार होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही प्रथम आत्येच्या घरी गेलो तिने जेवायलाच थांबवून घेतले. आम्हाला तो आग्रह मोडता आला नाही. पण लवकरात लवकर मठ बुद्रुक ला पोहचायचे होते. आत्ये म्हणाली, "अरे तिथे कुठे जाताय आता. कोणी नाही तिथे. कंबरे इतक्या उंचीचे गवत माजले आहे. आणि घरभर वटवाघळे आहेत. मागे मी गेले होते तेव्हा दरवाजा उघडला आणि समोरच घुबड."
 हा सगळा प्रकार ऐकून माझ्यातील शहरी इसमाने कच खाल्ली. आई म्हणाली, "तरी इथवर आलो आहोत तर बघून जाऊ घर." 
आत्ये म्हणाली, "अगं पण खूप वेळ लागेल तेथे जायला. रस्ता सुद्धा खराब आहे आणि गाडी पोहचत नाही घरापर्यंत, चालत जावे लागेल त्या कंबरे एवढ्या गवतातून." 
आई म्हणाली, "हो तुम्ही बरोबर बोलताय, जाऊ दे नाहीतरी कोण आहे तिथे आता." 
मी समजलो नाही, म्हणजे आईने इतका मोठा यू टर्न कसा काय घेतला.
आई म्हणाली, "पण आता निघायला हवं आम्हाला, हाॅटेलवर पोहचायचे आहे."
आम्ही निरोप घेतला, गाडीत बसल्यावर मी ड्रायव्हरला गाडी हाॅटेलवर न्यायला सांगितले. तर आई म्हणाली, "थांब.. पहिले मठ बुद्रुक मग हाॅटेल." 
मला कळेच ना.. "म्हणजे?, अगं आता तू म्हणालीस की तिथे कोणी नाही.. कशाला जायचं, त्यापेक्षा हाॅटेलवर जाऊ."
आई म्हणाली, "तू गप बस. तुला काही कळत नाही. ठरल्याप्रमाणे मठ बुद्रुक म्हणजे मठ बुद्रुक." 
मी बाबांकडे बघितले तर त्यांनी दुसरीकडे तोंड फिरवले. मी ड्रायव्हरला सांगणार तेवढ्यात तोच गाडी चालवत हसत बोलला, "मठ बुद्रुक ना?" 
मी "हो" म्हणालो.
दोन तासांनी आम्ही मठ बुद्रुक ला पोहचलो. रस्ता माहीत नसल्याने आधी पुढे गेलो मग एकाने सांगितले पाठीच राहिले गाव. मग पाठी आलो. तिथे  एक दुकान दिसले. तिथे मी पत्ता विचारला. त्या दुकानदाराने विचारले, "तुम्ही कोण?" 
मी त्यांना परिचय सांगितला वडील, आजोबा, आजी यांची नावं सांगितली. ते म्हणाले, "अच्छा अच्छा सामंत होय, मी ओळखतो तुमच्या सगळ्या काकांना आणि मी पण सामंतच, चला मी दाखवतो रस्ता." 
आणि दुकान सोडून ते आमच्या सोबत यायला निघाले. त्यांना मी विचारले, "गाडी जाईल का हो तिथवर?" 
ते ओरडून म्हणाले, "हो.. का नाही? अरे दारापर्यंत जाते." 
मग मी त्यांना गाडीत पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसायला सांगून मी स्वतः पाठच्या सीटवर बसलो. 
त्यांनी ड्रायव्हरला रस्ता दाखवला. पाच मिनिटांत एका घरासमोर येऊन पोहोचलो. वाटेत मी बाबांना विचारले, "तुम्ही इथे येऊन गेलाय आणि तुम्हाला माहिती नाही घर कुठे आहे? कोणता रस्ता आहे ते? तुमचं गाव ना?"
 बाबा म्हणाले, "अरे खूप वर्षांनी येतोय. बदललं आहे सगळं. नाही ओळखता येत आता."
घरासमोर गाडी थांबली, त्या दुकानदार सामंताने सांगितले, "आलं घर" आम्ही गाडीतून उतरलो. 
बाबा म्हणाले, "हो बरोबर.. हेच घर." 
बाबा आणि ते सामंत शेजारच्या त्या परबांकडे चावी आणायला गेले. 
मी आणि आई घरासमोर उभे होतो. मी आईला म्हणालो, "आई.. इथे कुठे आहे कंबरे एवढं गवत आणि रस्ता ही ठीक होता." 
आई माझ्या कडे न बघता म्हणाली, "हँ..चल अजून वटवाघळे आणि घुबड पण बघायचे राहिले आहे." 
मला समजले नाही. 
शेजारचे परब चावी घेऊन आले आम्ही कुलूप उघडून घरात गेलो. मी विचारले, "वटवाघळे नाहीत ना हो आत." 
परब म्हणाले, "अहो कोणी नाही त्या घरात पाखं तर होणारच ना. पण आताच साफ केलंय मुंबई वरून तुमचे कोणी भाऊ येऊन गेले होते मागे तेव्हा." 
आम्ही आतून घर बघितले. किती जुनं आणि मोठं घर. मी या आधी कधीच एवढं मोठं गावचं घर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले नव्हतं. घराला सागवान लाकूड वापरले होते आणि घर कौलारू होते. सात मोठ्या खोल्या होत्या घराला. इलेक्ट्रिसिटी सप्लाय पण चालू होता घरातील. आमचेच एक काका या घराकडे स्वतःहून लक्ष घालत म्हणून घर अजूनही व्यवस्थित होते.
घर बघून झाल्यावर बाबांनी बाजूचे पिंपळाचे झाड दाखविले. ते म्हणाले रात्री इथे देवचर येतो. त्यांचे काका असेपर्यंत तिथे दिवा लावायचे. आता अधूनमधून कोणी गावी आले की लावतं दिवा झाडापाशी. 
त्यांनी डोंगराखाली कसायला दिलेली आमची भात शेती, सागाची, रक्तचंदन, आंब्याची, फणसाची झाडे दाखवली. 
परब काका म्हणाले, "एवढं सगळं फुकट जाईल कोणी तरी राहा येथे, लक्ष घाला." 
मी म्हणालो, "काका आम्ही एका दिवसाकरिता फक्त बघायला आलोय. मला तरी स्वतःचं काम सोडून इथे येता येणार नाही. आई वडिलांची तब्येत बरी नसते आणि इतकी वर्षे शहरात काढल्यावर हे गावच एकलकोंडं आयुष्य जमणार आहे का आम्हाला?" 
 मी आई कडे बघून म्हणालो, "चला झाले घर बघून. निघायचे आता?
 हाॅटेलवर पोहचायला उशीर होईल. उद्या सकाळी परत लवकर उठून निघायचं आहे आपल्याला घरी जायला." 
आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. तिने घर, बाग, शेती, पिंपळ सगळं पुन्हा एकदा डोळे भरून बघून घेतलं. आणि "चल निघूया" म्हणाली.
निघताना पिंपळाला परब काकांनी नमस्कार करायला सांगितला. "तुमचा मूळ पुरुष आहे तो. १५० वर्षे जुना असेल कमीत कमी." 
आईने पदर खांद्यावर घेऊन वाकून नमस्कार केला, मग बाबांनी आणि मग मी. परब काका आणि दुकानदार सांमताचा निरोप घेऊन आम्ही निघालो. ड्रायव्हरला मी गाडी हाॅटेलवर घ्यायला सांगितले. 
गाडीतून जाताना पाठी ते गावातील घर पुन्हा एकटं पडलेलं दिसत होते. हाॅटेलवर जाईपर्यंत कोणीही कोणाशी बोलले नाही. 
रात्री हाॅटेलवर जेवण करून आम्ही लवकर झोपलो आणि पहाटे पहाटे अंघोळ करून आम्ही हॉटेल वरून चेक आऊट करून निघालो. ड्रायव्हरला सांगितले त्याप्रमाणे तो आधीच गाडी घेऊन तयार हॉटेलच्या गेट पाशी उभा होता. सामान गाडीत भरून आमचा परतीचा प्रवास चालू झाला. 
येतानाच्या आमच्या चेहऱ्यावरील उत्साहाची जागा आता समाधानाने घेतली होती.

- निलेश शशिकांत सामंत