त्रैलोक्य प्रदक्षिणा

(एक पौराणिक कथा) 
" नाही नाही नाही , मीच श्रेष्ठ आहे. अधिक वेगवान आहे. माझ्या वेगाची  बरोबरी कुणीच करू शकत नाही . "
कर्तिकस्वामींचा  आवाज चढला होतो.  अती संतापाने डोळे विस्फारले होते, आणि मूळचा गौरवर्णी चेहरा लालबुंद झाला होता. 
कारणही तसेच घडले होते. त्यांचे कनिष्ठ बंधू श्री गणेश यांना गणाधिपती, गुणाधिपती अशा उपाध्या बहाल करण्यात आल्या होत्या. आणि असे करणारे साक्षात त्रिदेव  ब्रम्हा, विष्णू आणि महेश होते. आदिमाया पार्वती देवींची देखील यांस मूकसंमती प्रतीत होत होती. ज्येठपुत्र असूनही मातापिता त्यांच्यापेक्षा गणेशाचे जास्त कौतुक करतात असाच कार्तिक स्वामी चा ग्रह झाला होता. 
पार्वतीमाता आपले आसन सोडून बालकार्तिकाच्या जवळ आल्या. त्याच्या मस्तकावर मोठ्या मायेने आपला हात ठेवून बोलल्या, 
"असा गैरसमज करून घेऊ नका कुमार.  तुम्ही दोघे आमचे पुत्र आहात. आणि दोघेही तितकेच प्रिय आहात. त्यात कमी जास्त काहीच नाही."

परंतु कार्तिक स्वामींची समजूत काही पटेना. आता काय करावे? माता पार्वतीसमोर मोठाच पेच उद्भवला.  
त्यांनी मदतीसाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली. 
"साक्षात आदिमायेला उकलता येत नाही ,  असे कोणते कोडे आहे? "
सस्मित मुद्रेने श्री शंकारांनी विचारले. 
पार्वतीमातेने साऱ्या कलहाचे वर्णन केले. त्यांनी महादेवांना विनंती केली की  या कलहाचे निवारण करावे. महादेव काही काळ विचाराधीन झाले. प्रसंग चिंताजनक होता खरा. त्यांच्या कुमारवयीन पुत्राची समजूत काढणे जरूरीचे होते, आणि तेसुद्धा त्यांना न दुखावता. 
पण हे कसे साध्य करावे? 

असाच काही कालावधी सरला. काही घटिका आणि काही पळे  फक्त. परंतु देवी पार्वतींना अनेक युगे लोटली असेच प्रतीत होत होते. 
अखेर महादेवांना काही सुचले. त्यांनी बालगणेशांना बोलावून धेतले . कार्तिकस्वामी आणि गणेश त्यांच्यासमोर उभे होते.  त्या दोघांकडे पाहताना त्यांच्या मनात अभिमान दाटून आला. 
"किती गुणी आहेत माझे दोन्ही पुत्र? माझे  दोन नेत्रच जणु.   दोघेही मला प्रिय आहेत.  पण त्यांच्यात हा गैरसमजाचा कली  कसा आणि का प्रवेशला आहे?  त्या कलीला सर्वप्रथम बाहेर काढायला पाहिजे.  मग सारे काही पूर्वी होते तसेच होईल ..  शुद्धं, शांत, आनंदी.. " 

महादेवांनी दोन्ही पुत्रांस जवळ बोलावले आणि बोलले...  
"मी एक कार्य तुम्हा दोघांना देणार आहे. पैजच समजा ना. . 
ते कार्य जो कुणी सर्वप्रथम पूर्ण करील तो  जिंकला.  हा श्रेष्ठत्वाचा  निवाडा नाही हे लक्षात असू द्या. कारण तुम्ही दोघे आम्हा मातापित्यांसाठी  एक समानच आहात. हा फक्त एक खेळ आहे,  एक स्पर्धा. आणि त्याचे महत्त्व तितकेच मर्यादित आहे. " 
बाल गणेश आणि कुमार स्वामींनी सहमती दर्शविली. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. काहीतरी नवीन करायच्या विचाराने त्यांच्या मुद्रा आनंदीत दिसत होत्या. 

महादेवाने  आता उत्सुकता ताणून धरणे उचित समजले नाही. ते म्हणाले.... 
"पैज तशी साधीसुधीच आहे. आणि त्याचा निवाडा करण्यासाठी मी नारदमुनींना आमंत्रित करणार आहे. "
त्यांचे वाक्य संपताक्षणीच चिपळयांचा नाद कानी आला. तंबोरीच्या तारांचा निनाद आसमंतात भरला जाऊ लागला . 
आणि "नारायण नारायण"  असे प्रसन्न  स्वरात केलेले नामस्मरण उमटले. 

"तर आता नारदमुनी देखिल  उपस्थित आहेत. कार्य असे आहे की तिन्हीलोकीची  म्हणजे आकाश,  पाताळ आणि  पृथ्वी यांची प्रदक्षिणा करून कैलास पर्वतावर परत यायचे. आहे. बोला आहे तुमची सहमती? "
"हो हो आहे नक्कीच आहे. "
कुमार कार्तिकाचा आनंद जणू उतू जात होता. बाल गणेश मात्र शांत होते. 
"मला मान्यं आहे"  त्यांनी आपली अनुमती दर्शविली. 
स्पर्धेची रूपरेखा कळल्यावर पार्वती माता चिंतीत झाल्या. स्पर्धा फारच एकांगी आहे असे त्यांना वाटले. 
असा त्यांचा समज  व्हावा असे कारणही होते. कार्तिक स्वामींचे वाहन मयूर आणि श्री गणेशांचे वाहन मूषक. कोण आधी प्रदक्षिणा पूर्ण करेल हे सर्वं विदीतच होत. पण त्या काही बोलल्या नाहीत. त्यांचा त्यांच्या पतिवर पूर्ण विश्वास होता. ते योग्यं तेच करतील ही खात्री  होती.
दोन्ही  स्पर्धकांनी माता पिता आणि नारदमुनींचा  आशीर्वाद घेतला. स्पर्धेस प्रारंभ झाला. कार्तिकस्वामी मयूर वाहनावर आरूढ होऊन निघाले.  
श्री गणेशांनी मात्र पुनश्च एकवार माता पित्यांना वंदन करून त्यांच्या भवताली प्रदक्षिणा करण्यास प्रारंभ केला. 
नारदमुनी कौतुकाने बाल गणेशांची लीला न्याहाळीत होते. 
तिन्ही लोकीचे भ्रमण करून कार्तिकस्वामी कैलास पर्वतावर आले.  तेथे श्री गणेशांना पाहून आचंभित झाले. 
"तू माझ्या  आधी प्रदक्षिणा पूर्ण केलीस? " 
त्यांचा विश्वासच बसत नव्हता. 
" पण हे कसे शक्यं आहे. मी तर तुला संपूर्ण भ्रमण मार्गावर पाहिलेच नाही. " 
गणेशांनी उत्तर दिले, 
"मी माता पार्वती आणि पिता महादेव यांचीच प्रदक्षिणा केली. कारण माझे माता पिता माझ्यासाठी त्रैलोक्य मोलाचे आहेत. 
माझ्यासाठी तिन्ही लोक म्हणजे तेच आहेत. " 
कार्तिकस्वामींचा चेहरा उतरला होता. त्रैलोक्याच्या  प्रदक्षिणेचा आनंद मावळला होता. 
त्यांनी नारदमुनींकडे पाहिले. हातातील चिपळ्या वाजवीत त्यांनी विचारले... 
"नारायण... नारायण ,  कुमार मी अजून काही बोलायला हवे का? "
कार्तिकस्वामींनी श्री गणेशांचे हात हाती घेत म्हणाले,
" नाही  मुनीवर , मला सारे काही समजले आहे.  माझा कनिष्ठ बंधू खरोखरीच गुणाधिपती आहे, आणि गणांचा अधिपती होण्यास योग्यं आहे."
माता पार्वती आणि पिता महादेव मोठ्या समाधानाने आपल्या पुत्रांचे बंधुप्रेम अवलोकीत होते.