सेल्स आणि मार्केटिंग!

सेल्स आणि मार्केटिंग! 
आपल्या देशामधल्या सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वार्षिक संमेलन 
म्हणजे दिवसभर देशांमधल्या सर्वोत्तम लोकांसोबत  
सेल्स आणि मार्केटिंग strategies वरती केलेल्या गहन चर्चा...
मार्केटिंग वर खर्च करायचा कुठून?, 
आधी विका, पैसे मिळवा 
मग अभिमानाने, हक्काने मागता येईल.. 
साहेबाचे हे धोरण सगळ्यांनीच उचलून धरल्यामुळे 
काहीसं वैतागून परत निघताना माझी गाडी हाय वे वर आली! 
उद्या काय बोलायचे, 
खरंच कसा वाढवायचा सेल्स? 
ह्या विचारात जवळ जवळ ८० चा वेग पकडला! 
त्या वेगातसुद्धा, 
एका हातात तीन सफरचंदे घेऊन, 
घशाची शीर फुगवून, 
एक माणूस ओरडताना दिसला! 
काचा वर होत्या, 
त्यामुळे तो काय म्हणत होता ते नाही कळलं! 
पण पुढे अगदी ५०० मीटरवर 
एक माणूस गाडीभरून सफरचंद विकताना 
आणि त्याच्या जवळ २-३ चार चाकी उभ्या दिसल्या! 
विचारात पडलो, 
$$Customer$$
वाहत्या रस्त्यावरून काहीही विकत घेण्यासाठी बाहेर न पडलेली माणसं
$$वस्तू$$
सफरचंद! 
अगदी कोपऱ्या कोपऱ्यावरल्या दुकानातच काय 
तर ऑनलाईन मुळे 
अगदी घरी पण येऊ शकतात अशी 
- सफरचंद. 
$$विक्रेत्याची/मालाची शाश्वती$$ 
- शून्य! उद्या इथे असेलच असे काही नाही! 
जवळ जवळ सगळं business module गंडलेलं! 
पण,
$$मार्केटिंग टीम$$ 
वाहत्या गाड्यांना थांबता येणार नाही अगदी इच्छा असली तरी, 
मग त्यांना आधीच कळायला हवं की पुढे सफरचंद विकली जात आहेत. 
म्हणून मग,
एकाला उभे केलेले! 
त्याचं दिवसभराचं काम एकच, 
उभं राहून ओरडायचं, 
प्रॉडक्ट awareness! 
बाकी काही टार्गेट नाही आणि बजेट नाही! 
लोकं थांबली तरी ठीक नाही थांबली तरी ठीक. 
पण थांबतील ती 
त्याला बघूनच थांबतील! 
आज नाही थांबली तर उद्या थांबतील. 
त्याला पगार देत राहायचा! 
मी थांबलो नाही. 
पण त्या वेगात सुद्धा, 
तो ओरडणारा इसम 
मला जे दिवसभर संमेलनात हुशार लोकांकडून न शिकता आलेले शिकवून गेला!