दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा (१)

आजकाल सणांचे घरगुती स्वरूप बदलून ते
सार्वजनिक झाले आहे. घरोघरी सण साजरे होतातच,  परंतु सार्वजनिकरीत्या
मोठ्या प्रमाणावर सण साजरे करण्याची प्रथा रूढ झाली आहे. आधुनिक जीवनपद्धती
अनुसरणारी  नवीन पिढी, मोठ्या हौसेने या उत्सवांमध्ये सामील होताना दिसतात.
या निमित्ताने सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून काही कार्य करण्याची सवय
होते. समाज आणि संस्कृतीच्या दृष्टीने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण,
सांस्कृतिक उत्सव म्हणजे  पक्वान्ने, सजावटी, नवनवीन  वस्त्रप्रावरणे आणि
मनोरंजन इतकेच मर्यादित नाहीत. ते सण का साजरे केले जातात. प्रथा, परंपरा
कशा रूढ झाल्या आणि रुळल्या? हे माहिती करून घेणे सुद्धा जरूरीचे आहे.  सण
साजरा का केला जातो? तो दिवस शुभ आहे असे का समजले जाते? त्याच्या मागचा
उद्देश काय हे समजले, की सणासुदीची गोडी आणखी वाढेल असे वाटते.  
गौरी
गणपतींना निरोप दिला की नवरात्रीचे वेध लागतात. नवरात्री म्हणजे
दुर्गापूजा,  नवरात्री म्हणजे गरबा असे काहीसे समीकरणच तयार झालेले दिसते.
नवरात्रीनंतर येणारा दहावा दिवस म्हणजे दसरा..  विजयादशमी. दसरा हा शुभ
दिवस आहे असे मानले जाते. दसऱ्याचा  मुहूर्त सर्वांनाच लाभदायक असतो. त्या
साठी पंचांग पाहण्याची जरूर नसते. दसऱ्याच्या  दिवशी  सीमोल्लंघन  करण्याची
प्रथा आहे. याचा अर्थ जुने आहे ते मागे सोडून नवीन कार्यास आरंभ करणे.
पूर्वी युद्धाच्या मोहिमेची  सुरुवात त्या दिवशी करण्याची प्रथा होती.
 अजूनही नवीन खरेदी, गृहप्रवेश, अथवा नवीन उद्योगांची, कार्याची सुरुवात
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केली जाते. दसऱ्याला सोने लुटण्याची प्रथा आहे.
सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने दिली जातात. कनिष्ठांनी  त्यांच्या
गुणांचे,  कर्तृत्वाचे सोने ज्येष्ठांना द्यायचे, अशी त्या पाठीमागची
संकल्पना. या सर्व प्रथा अजूनही प्रचलित आहे.
या प्रथांची सुरवात कशी झाली?
याच्या किमान तीन तरी कथा  सांगितल्या जातात.  
कथा :-   (१)  महाभारतकालीन
कथा 

कौरव  आणि पांडवांचे वैर सर्वांनाच माहिती आहे. एकाच कुळातील राजकुमार.
सम्राट धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी यांचे शंभर पुत्र म्हणजे कौरव. सम्राट धृतराष्ट्राचे कनिष्ठ बंधू पंडुराजा आणि त्यांच्या दोघी  राण्या कुंती आणि
माद्री यांचे पाच पुत्र म्हणजे पांडव. पाचही पांडव सद्गुणी, पराक्रमी आणि
चारित्र्यसंपन्न होते. कौरवापैकी ज्येष्ठ दुर्योधन दीर्घद्वेषी होता.
पांडवांची लोकप्रियता त्याला सहन होत नसे. पांडवांचे नुकसान व्हावे यासाठी
तो सदोदित काही ना काही कारस्थाने रचत असे. एक दोन वेळा तर पांडवांच्या
हत्येची योजना देखिल त्याने आखली. परंतु ती असफल झाली होती.
धृतराष्ट्र
हा जन्मांध असल्याने, तो ज्येष्ठ असूनही पंडुराजाला हस्तिनापुराचा सम्राट
करण्यात आले होते. तो पराक्रमी होता. परंतु दुर्दैवाने त्याला असाध्य असा
आजार जडला. म्हणून राज्यत्याग करून तो वनवासी झाला. वनवासात कुंतीला
प्राप्त असलेल्या वराच्या योगाने त्याला पुत्रप्राप्ती झाली होती.
युधिष्ठिर हा ज्येष्ठ पांडव होता. तो दुर्योधनापेक्षाही वयाने थोर होता.
परंपरा आणि जनरीतीनुसार सिंहासनावर त्याचाच हक्क होता. परंतु दुर्योधनास ते
मान्य नव्हते. हस्तिनापुराचे सिंहासन त्याला हवे होते.
गृहकलहापायी
जीवित आणि वित्त हानी होऊ नये म्हणून पांडवांनी दुय्यम स्थान स्वीकारले.
पाच पांडवांनी धृतराष्ट्राकडे अर्ध्या राज्याची वाटणी मागितली.
पुत्रप्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राला, खरे तर पांडवांना काहीच द्यायची
इच्छा नव्हती. परंतु राज्यसभेतील ज्येष्ठांचे मत होते, की पांडवांना
राज्यातील हिस्सा द्यायला हवा. ज्येष्ठांचे मत डावलणे, सम्राट
धृतराष्ट्राला शक्य झाले नाही. त्याने पांडवांना राज्यातील हिस्सा देण्याचे
मान्य केले. परंतु हिस्सा देताना न्यायबुद्धीला तिलांजली दिली होती.
खांडववना सारखा, मानवी वस्तीस सर्वस्वी प्रतिकूल असलेला विभाग पांडवांना
दिला.  धर्मराजा म्हणजेच युधिष्ठिराने तो विना तक्रार स्वीकारला. त्याचा
स्वतःवर आणि कनिष्ठ बंधूंवर पूर्ण भरवसा होता. आणि तो अनाठायी नव्हता.
बघता
बघता खांडववनाचे, स्वर्गीय इंद्रप्रस्थ नगरीमध्ये रूपंतर झाले. मयासुर
सारख्या कुशल नगर रचनाकाराने, एक अद्वितीय नगरी साकारली होती.
युधिष्ठिराने
अश्वमेध यज्ञ केला. आता युधिष्ठिर फक्त राजा नाही, तर चक्रवर्ती सम्राट
होता. भारत भूमीतील सर्व राजे, महाराजांनी त्याचे श्रेष्ठत्व मान्य केले.
यज्ञस्थळी सर्व कौरव उपस्थित होते. वरकरणी आनंदाचे नाटक करताना, अंतर्यामी
मात्र दुर्योधन द्वेषाने जळत होता.
हस्तिनापुराला
परतल्यावर, दुर्योधन, कर्ण आणि शकुनी मामाने कारस्थानास सुरुवात केली.
त्यांनी धर्मराजाला द्यूतक्रीडेचे आमंत्रण दिले. धर्मराजानेही ते
स्वीकारले. दुर्योधनाचे मामा शकुनी द्यूतक्रीडेमध्ये पारंगत होते. त्यातही
ते कपटविद्येचा प्रयोग करण्याकरिता  प्रसिद्ध होते. धर्मराजाला त्यांनी
द्युतामध्ये पराभूत केले. धर्मराजाने त्याचे  राज्य, धनदौलत, दासदासी,
पशुधन सारे काही पणाला लावले, आणि गमावले. शेवटी त्याने त्याचे बंधू आणि
पत्नी द्रौपदी  समवेत बारा वर्षे वनवासात राहण्याचे मान्य केले. परंतु
तितकेच पुरेसे नव्हते,  तर वनवासाची बारा वर्षे संपल्यानंतर, एक वर्ष त्या
सर्वांना छद्मवेष धारण करून अज्ञातवासी व्हायचे होते. त्या काळात जर
त्यांना कुणी ओळखले, तर परत बारा वर्षाचा वनवास भोगायचा अशी अट होती.
धर्मराजा शब्दाचा पक्का होता. आणि त्याचे चारही बंधू त्याच्या शब्दाबाहेर
 कधीच जात नसत.   
अशा
तऱ्हेने, पांडवांनी स्वपराक्रमाने मिळविलेले इंद्रप्रस्थाचे साम्राज्य,
दुर्योधनाने कपटाने हिरावले. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि
द्रौपदी वनवासी निघाले. त्यांनी अनेक जंगलांमध्ये वास्तव्य केले. विविध
भूभाग माहिती करून घेतला. जनसामान्याबरोबरच ऋषी मुनींचे आदरातिथ्य केले.
त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. निरनिराळ्या विद्या प्राप्त केल्या.
अर्जुनाने त्या काळात निरनिराळी अस्त्रे आणि शस्त्रे प्राप्त केली. त्या करिता कठोर
परिश्रम केले. अशा तऱ्हेने बारा वर्षे संपली.
आता
 सगळ्यात कठीण काळ होता. एक वर्ष अज्ञातवासात राहायचे. होते. पाच पांडवांनी
वेष बदलले. ते विराट नगरी मध्ये आले. युधिष्ठिराने कंक नाव धारण केले.
राजाच्या राजसभेत त्याला स्थान मिळाले. भीम राजाच्या पाकशाळेतील बल्लव झाला
होता. त्याचे नाव होते वल्लभ. नकुल ग्रंथिक नावाने अश्वपरीक्षकाचे काम करू
लागला. सहदेवाने तंतीपाल नाव धारण करून गोधन पालनाचे काम स्वीकारले होते.
द्रौपदी,  सैरंध्री नावाने राणीच्या
अंतःपुरात दासीच्या स्वरूपात राहू लागली. अर्जुनाने स्त्रीरूप घेऊन
बृहन्नडा असे नाव धारण केले. राजकन्या उत्तरेच्या नृत्यशिक्षिकेचे काम
त्याला मिळाले. अश्या तऱ्हेने पाच पांडव आणि द्रौपदी छद्मवेष धारण करून
विराट नगरीमध्ये राहू लागले. त्यांचे वेषांतर आणि रूपांतर इतके बेमालूम
वठले होते, की कोणाला कधी संशय देखिल आला नाही. सारे काही सुरळीत चालू
होते. परंतु अचानक एक संकट उत्पन्न झाले.
महाराणी
सुदेष्णाचा बंधू कीचक काही निमित्ताने विराटनगरीमध्ये वास्तव्यासाठी  आला
होता. महाराणींच्या भेटीसाठी आलेला असताना त्याची नजर सैरंध्रीवर
गेली. तिच्या सौदर्याने तो मोहीत झाला होता. त्याने त्याच्या भगिनीकडे
म्हणजेच राणी सुदेष्णाकडे, तिच्याविषयी चौकशी केली. राणी सुदेष्णा कीचकाला
चांगल्याच जाणून होत्या. त्यांनी कीचकाला सांगितले, की सैरंध्री दासी असली
तरी विवाहित आहे. तिचा पती एक यक्ष आहे. म्हणून तिच्यासाठी कीचकाने कसलेही
साहस करू नये. अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असे सुचवले. परंतु
कीचकाने त्याच्या भगिनीने दिलेल्या सावधगिरीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष
केले. सैरंध्रीच्या आसक्तीने त्याच्या विवेकबुद्धीचा तोल ढळला होता. कीचकाचा
विराटनगरीतील मुक्काम वाढला. दिवसेंदिवस तो महाराणींच्या अंतःपुरातच
घुटमळत राही. सैरंध्रीचा पाठलाग करत राही. तिच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न
करत राही.  
सैरंध्रीपुढे मोठाच
पेचप्रसंग आला होता. दुसरे कुणी असते, तर तिने महाराणींकडे तक्रार केली
असती. त्यांच्याकडून संरक्षण मिळविले असते. परंतु कीचक हा तर महाराणींचा
बंधू. त्याच्याविषयीची तक्रार त्या कशी ऐकून घेतील? आणि एका दासीवर विश्वास
ठेवून, खुद्द  स्वतःच्या बंधूला त्या समज तरी कशा देतील. सैरंध्रीला
समजेना काय करावे? तिचे पाचही पती त्याच नगरीत असले, तरी त्यांच्याकडे
 तक्रार करणे धोक्याचे होते. त्यांचे हे अज्ञातवासाचे वर्ष होते. ते
संपण्यासाठी फार थोडा काळ शिल्लक राहिलेला होता. त्या आधी त्यांची ओळख
उघडकीस येणे धोक्याचे होते. कारण  तसे झाल्यास  परत बारा वर्षाचा वनवास
भोगणे प्राप्तं होते.
कीचकाची
धिटाई दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्याला वाटत होते, सैरंध्री प्रतिकार
करीत नाही, याचा अर्थ तिची मूकसंमती आहे. आता तिला तो छळ असह्य झाला होता.
शेवटी तिने धाडस करून पाकशाळेत बल्लवाचे काम करणाऱ्या भीमाला सारे काही
सांगितले. भीमाचा स्वभाव संतापी. तो लगेच कीचकाला द्वंद्वाचे आव्हान
देण्यास निघाला. परंतु सैरंध्रीने त्याला शांत राहण्यास सांगितले. ती
म्हणाली, उघडपणे काही करणे धोक्याचे आहे. कारण त्यामुळे त्यांचे खरे स्वरूप
लोकांसमोर येण्याचा धोका आहे. तिचा भीमाच्या पराक्रमावर विश्वास होता.
त्यांमुळेच मोठा पेच उद्भवला होता. कीचक हा देखिल नावाजलेला योद्धा होता.
 आजवर द्वंद्व युद्धात त्याला कुणीच पराजित करू शकले नव्हते. परंतु
भीमासमोर त्याचा टिकाव लागणे शक्यच नव्हते. सारे लोक  या वास्तवाशी परिचित
होते. कीचकाचा वध झाल्यास भीमाचे अस्तित्व जगासमोर आले असते आणि अर्थात इतर
पांडव आणि सैरंंध्रीचे देखिल.  
सैरंध्री आणि वल्लभाने (म्हणजेच द्रौपदी आणि भीमाने ) एक नाटक करण्याचे योजले.  
त्यानंतर
जेव्हा कीचक तिच्या आसपास येई, सैरंध्री त्याला न टाळता त्याच्या  संवादास
प्रतिसाद देऊ लागली. कीचकाच्या आनंदाला आता पारावारच उरला नव्हता. त्याला
वाटले. की त्याची मनोकामना आता पूर्ण होणार. सैरंध्री त्याला आता पुरती वश
झाली आहे. असे अजून काही दिवस लोटले. एक दिवस कीचकाने सैरंध्रीला एकांतात
भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सैरंध्रीनेही त्याला अनुकूलता दर्शवली. परंतु
ती त्याला म्हणाली, की तिचा यक्ष असलेला पती कधी कधी अचानक तिथे अवतरतो.
त्याला हे सारे समजले तर मोठेच संकट येईल. परंतु कीचकाने तिला आश्वस्त
केले. तो म्हणाला तिच्या यक्ष पतीचा त्याच्यासमोर निभाव लागणे कठीण आहे.
तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नाही. मग त्यांनी स्थळ आणि काळाची निश्चिती
केली. भेटीचा संकेत ठरविला. सैरंध्रीने सारे काही भीमाला सांगितले.
ठरल्याप्रमाणे
कीचक सैरंध्रीला  भेटायला म्हणून आला. परंतु तिथे त्याची भीमाशीच गाठ
पडली. दोघांमध्ये अटीतटीचे द्वंद्व झाले आणि अखेर कीचकाचा वध झाला.
दूसऱ्या
दिवशी महालातील कर्मचाऱ्यांना कीचकाचा निष्प्राण देह सापडला. सगळीकडे
हाहाःकार झाला. महाराणी सुदेष्णा अतिशय दुःखी झाल्या होत्या. परंतु हे असेच
काही घडणार ही त्यांना अपेक्षा होतीच. कीचकवधाची बातमी वाऱ्याच्या वेगाने
सर्वत्र पसरली. हस्तिनापुरामध्येही पोहोचली. कर्ण, दुर्योधन, शकुनी मामा
यांनीही ती ऐकली. ऐकताक्षणीच त्यांना खात्री पटली, हे नक्कीच भीमाचे काम
आहे. कारण कीचकासारख्या अजेय योद्ध्याला मात देण्याची क्षमता भीमाखेरीज
अन्य कुणातही नाही.
दुर्योधनाची
कारस्थानी बुद्धी जाळे विणू लागली. कर्ण आणि शकुनीमामांची साथही होतीच.
त्यांनी ठरविले विराटराजाच्या साम्राज्यावर आक्रमण करायचे. विराट राजाकडे
अपार पशुधन होते. त्याचीच चोरी करायची. विराटराजा प्रतिकार करेलच, परंतु
कौरव सेनेसमोर त्याचे काहीच चालणार नाही. त्याची हार होईल. जर पांडवांनी
त्याच्या नगरीत आश्रय घेतला असेल तर ते नक्कीच त्याच्या मदतीला येतील. कारण
पांडव क्षत्रिय आहेत. आश्रयदात्याला संकटात एकाकी सोडणे हा क्षात्र धर्म
नाही. पांडव तर धर्मनिष्ठा आणि कर्तव्यपालन या साठी प्रसिद्ध आहेत. ते कधीच
त्यात कसूर होऊ देणार नाहीत. आणि अज्ञातवासाचे वर्ष संपण्याच्या आधीच
प्रकट होतील. असे झाल्यावर ठरल्याप्रमाणे त्यांना परत बारा वर्षे वनवासात
जावेच लागेल. दुर्योधनाचा सिंहासनाकडे जाणारा मार्ग निष्कंटक होईल.
दुर्योधनाच्या
या कपटनीतीला पितामह भीष्म, आचार्य द्रोण आणि महामंत्री विदुराने विरोध
दर्शवला. परंतु सम्राट धृतराष्ट्राने त्यांना दुर्योधनाला मदत करण्याची
आज्ञा केली. राजाज्ञेपुढे त्यांचाही नाईलाज होता. बलाढ्य कौरव सेना पूर्ण
तयारीने मोहिमेवर निघाली. विराटनगरीजवळ कौरवसेना पोहोचली. तिथे सर्व
सेनानायकांना युद्धाची व्यूहरचना सांगण्यात आली. एका बाजूने निम्मे सैन्य
विराटनगरीमध्ये जाऊन त्याचे सर्व पशुधन ताब्यात घेणार, आणि नगरीच्या
सीमेकडे परतणार असे ठरले होते. पशुधन आणि राज्याच्या रक्षणार्थ महाराज
विराट सैन्यानिशी त्यांचा पाठलाग करणार हे निश्चित. विराटसेना पुरेशी दूरवर
आली, की दुसऱ्या बाजूने उरलेली सेना आक्रमण करणार अशी योजना होती.
त्यांचा
अंदाज बरोबर होता. विराटराजा स्वतः  ससैन्य कौरवसेनेचा पाठलाग करीत दूरवर
पोहोचला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूने उरलेल्या सेनेने आक्रमण सुरू केले.
 नगरजन सारे भयभीत झाले होते.  महाराज तर दूर युद्धात गुंतलेले. आणि आता हे
संकट.  
पांडवांना
आता ते सारे नुसते बघत बसणे शक्य नव्हते. युधिष्ठिराने भीम आणि अर्जुनाला
आज्ञा केली. इकडे राजवाड्यात राजपुत्र उत्तर त्याच्या सेवक आणि
सेविकांसमवेत वल्गना करण्यात मश्गुल होता. तो म्हणाला, "खरे तर मी एकटा या
सैन्याला सामोरा गेलो असतो. परंतु माझ्याकडे चांगला निष्णात सारथी नाही.
नाहीतर माझा पराक्रम सर्व जगाने पाहिला असता. "
बोलाफुलाची
गाठ पडावी तसा नेमका त्याचवेळी बृहन्नडेचा रूपातील अर्जुनाने तेथे प्रवेश
केला. त्याने नम्रमपणे उत्तराला म्हटले, "राजकुमार मी नर्तकी असले तरी
उत्तम सारथी देखिल आहे. तुम्ही तुमच्या दरबारातील कंक महाराजांना विचारून
खात्री करून घेऊ शकता. मी तुमच्या रथाचे सारथ्य करेन. आपण शत्रू सैन्याचा
प्रतिकार करूयात आणि राज्याचे रक्षणही. "
राजकुमाराला
काही सुचेना. हे भलतेच झाले. युद्धावर जाण्याच्या कल्पनेने त्याचे हातपाय
कापत होते. परंतु तिथे जमलेल्या जनसमुदायाने आनंदाने घोषणा द्यायला सुरवात
केली, मग त्याचा नाईलाज झाला.  
राजकुमार
उत्तर रथावर आरूढ झाला. बृहन्नडा सारथ्य करत होती. जसजसे शत्रूचे सैन्य
दृष्टिपथात येऊ  लागले, तशी उत्तराची भीतीने गाळण उडाली. दासदासीसमोर
मोठ्या बढाया मारणारा राजपुत्र उत्तर, प्रत्यक्ष रणभूमीच्या दर्शनाने अगदी
केविलवाणा होऊन गेला. त्याच्या हातातील धनुष्य गळून पडले. रथातील आसनावर
बसून तो बृहन्नडेला रथ माघारी फिरविण्याची विनंती करू लागला. बृहन्नडेने
रथाची दिशा बदलली, परंतु रोख विराटनगरीकडे नव्हता तर सीमेवर असणाऱ्या
जंगलाकडे होता. बरेच अंतर पार केल्यानंतर रथ एका विशाल शमीच्या वृक्षाखाली
थांबला. रथामधून उतरून बृहन्नडा त्या वृक्षाच्या बुंध्याजवळ गेली.
बुंध्यावर थोड्या उंचीवर एक, कोरल्यासारखा वर्तुळाकार आणि आत जरासा खोल
असलेला भाग होता. बृहन्नडेने  तिथे हाताने चाचपडले. राजपुत्र उत्तर
कुतूहलाने बघत होता. झाडाच्या त्या ढोलीतून, बृहन्नडेने काही वस्तू बाहेर
काढल्या. त्या वस्तू  हातामध्ये सांभाळत ती वृक्षाच्या मागील भागात
दिसेनाशी झाली. राजपुत्र उत्तर अस्वस्थ होऊन तिथे थांबला होता. त्याच्या
मनात विचारांचे आवर्त उठत होते. त्याला वाटले, बृहन्नडा त्याला तिथे एकटाच
सोडून गेली की काय? तसे झाल्यास त्याला माघारी कोण नेणार? त्यालाच रथाचे
सारथ्य करावे लागणार. परंतु असा विचार करीत असतानाच वृक्षापाठीमागून एक
व्यक्ती अवतीर्ण झाली. ती बृहन्नडा नव्हती. एक अत्यंत तेजःपुंज असा पुरूष
त्याच्यासमोर उभा होता. त्यांच्या हातात धनुष्य होते. पाठीला बाणांचा भाता
लावलेला होता.
" कोण आहेस तू? " उत्तराने आश्चर्यचकित होत विचारले.  
"मी बृहन्नडा.. " 
तो
पुरूष बोलला. राजपुत्र उत्तर भयचकित झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव
बघून त्या व्यक्तीला गंमत वाटली. परंतु लगेच गंभीर चेहरा करत तो म्हणाला,
 "मी तुला सारे सविस्तर सांगेन..  पण नंतर. आता आधी कौरवसेनेला रोखायला
हवे, नाहीतर ते राजवाड्यापर्यंत पोहोचतील. "
उत्तर
सावध झाला. परिस्थितीची जाणीव  होऊन गंभीर झाला. तो दिव्यपुरुष म्हणाला,
रथाचे सारथ्य तू कर आणि निर्धास्त राहा. तुझे रक्षण अर्जुन करतो आहे हे
लक्षात ठेव. उत्तर न बोलता रथाकडे वळला. रथ वेगाने रणभूमीकडे धावत होता.
कौरवसैन्य सामोरे येताच उत्तराने रथ थांबवला. अर्जुनाने धनुष्याची
प्रत्यंचा ताणून एका दिव्य अस्त्राचा प्रयोग केला. सारे सैनिक मूर्च्छित
होऊन  निपचीत पडले. त्यात वीर कर्ण, दुर्योधन, दुःशासन, भीष्म, द्रोण आदी
अतिरथी, महारथी होते. अर्जुन आणि उत्तराने सर्वांची शस्त्रास्त्रे काढून
घेतली. त्यांचीच वस्त्रे घेऊन त्यांना बांधून ठेवले. दुर्योधनाची चांगलीच
फजिती झाली होती. तो पांडवाचा रहस्यभेद करण्यासाठी आला होता. आता
त्याच्यावरच प्राणांसाठी दयेची याचना करण्याची वेळ आली होती.
युधिष्ठिराने
उदारपणे सर्वांची सुटका केली. तरी दुर्योधन त्याचा कपटीपणा सोडण्यास तयार
नव्हता. तो म्हणाला, "पांडवांचे रहस्य सगळ्यांना कळले आहे. आता अटीप्रमाणे
त्यांनी परत बारा वर्षांसाठी वनात जायला हवे. "
परंतु
भीष्म, द्रोण, विदुर इ. ज्येष्ठांनी त्याला स्मरण करून दिले, की
अज्ञातवासाचे वर्ष तर युद्धाच्या आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे पांडवांना
सन्मानाने बोलावून, कपटाने हिरावलेले राज्य परत देण्यात शहाणपणा आहे.  
अशा
प्रकारे सत्याने असत्य पराभूत केले. धर्माचा विजय होऊन अधर्माचा नाश झाला.
ज्या दिवशी अर्जुनाने शमी वृक्षाच्या ढोलीमध्ये लपविलेली शस्त्रे बाहेर
काढली. बृहन्नडेच्या रूपाचा  त्याग करून तो स्वस्वरूपात प्रकट झाला.
विराटदेशीच्या सीमेवर आक्रमण करणाऱ्या बलाढ्य कौरवांचा पराभव केला. तो दिवस
सीमोल्लंघनाचा, पराक्रमाचा दिवस  विजयादशमी म्हणून साजरा करण्याची प्रथा
आहे. त्या दिवशी शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते. नव्या योजनांची सुरुवात
केली जाते. कर्तृत्वाचे सोने लुटून सीमोल्लंघन केले जाते. असा हा
सद्गुणांची, पराक्रमाची परंपरा जोपासणारा सण दसरा.
म्हणूनच म्हणतात,  "दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा".