दसरा सण मोठा .. नाही आनंदा तोटा (२)

नवरात्रीनंतर येणारा दिवस म्हणजेच दसरा. या दिवसाला विजयादशमी असेही संबोधिले जाते. हिंदू पंचांगामधे दसरा हा अतिशय महत्त्वाचा मुहूर्त आहे. दसऱ्याचा मुहूर्त सर्वानाच लाभदायक असतो असे म्हणतात. म्हणूनच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवी सुरूवात करण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी कनिष्ठांनी ज्येष्ठांना सोने देण्याची प्रथा आहे. दसरा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. प्रत्येक प्रांतांच्या काही विशिष्ट पद्धती असतात. महाराष्ट्रात दसऱ्याचा आधीचा दिवस खंडेनवमी म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी अस्त्र,  शस्त्रांची पूजा केली जाते. आधुनिक काळात तलवारी धनुष्यबाण, भाले इ. ची जागा नवीन यंत्रे,  तंत्रज्ञानाने घेतली आहे. विद्या आणि कलेची देवता देवी सरस्वतीचे पूजन देखिल या दिवशी केले जाते. दसऱ्याच्या दिवशी घरोघरी केशरी, पिवळ्या झेंडूच्या फुलाच्या माळा घराच्या दारावर लावतात. रांगोळ्या आणि तोरणांनी प्रवेशद्वार सुशोभित केले जाते. पक्वान्नाचे भोजन केलेले असते. एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना आपट्याची पाने, सोन्याचे प्रतीक म्हणून दिली जातात. या सगळ्या सण साजरा करण्याच्या पद्धती. परंतु दसऱ्याला हिंदू संस्कृतीमध्ये इतके का महत्त्व प्राप्त झाले आहे, त्याच्या काही कथा सांगितल्या जातात.  
कथा :-  २  रामायणातील कथा 
अयोध्येमध्ये श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी चाललेली होती. सारी अयोध्या नगरी, गुढ्या, तोरणे, फुलांच्या माळांनी सुशोभित केलेली होती. रस्तोरस्ती सडे शिंपलेले होते. त्यावर सुरेख रांगोळ्यांची सजावट केलेली होती. नवीन वस्त्रे परिधान करून, त्यावर किंमती आभूषणांचा शृंगार केलेले अयोध्येचे नागरिक राजवाड्याचा दिशेने जात होते. त्याचवेळी आकाशातून वीज कोसळावी, तद्वत एक अशुभ बातमी येऊन पोहोचली. श्रीरामांना राज्याभिषेक केला जाणार नाही. श्रीराम, पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणासह, चौदा वर्षांसाठी वनवासात जाणार, ही ती बातमी. कुणालाच कळेना की नक्की झाले तरी काय? 
अयोध्येचे महाराज दशरथ यांनी ज्येष्ठपुत्र श्रीरामास राज्याभिषेक करण्याचे योजले होते. त्यांच्या तीन राण्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी यांची त्यास संमती होती. सारे काही निर्विघ्नपणे चालू असताना दासी मंथरेच्या रूपाने अशुभाने तिथे प्रवेश केला होता. मंथरा ही राणी कैकयी ची दासी होती. तिच्या माहेराहून आलेली अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ दासी होती. मंथरेला श्रीरामास राज्याभिषेक होणे फारसे रूचले नव्हते. कैकयी रामाची सावत्र आई होती, आणि राजपुत्र भरत सावत्र बंधू. राज्यारोहणा नंतर रामाचे वागणे बदलेल. सावत्र माता आणि सावत्र बंधूला सन्मानाची वागणूक दिली जाणार नाही, असे मंथरेला वाटत होते. मंथरेची कपट बुद्धी, कारस्थान करण्यात मग्न होती. तिने कैकयीचे कान भरण्यास सुरूवात केली. सुरूवातीला कैकयीला मंथरेचे म्हणणे मान्य होत नव्हते. तिचा श्रीरामांवर विश्वास होता. ती सावत्र आई असली, तरी त्यांच्या नात्यात तोपर्यंत कधीच सापत्नभाव नव्हता. तिच्यासाठी राम आणि भरत एकसमान होते, तिचे पुत्र होते.  
परंतु मंथरेच्या सततच्या विषारी बोलण्याचा परिणाम व्हायला लागला. मंथरेने भविष्यकाळाचे जे विकृत चित्रण कैकयीपुढे चितारले  होते, त्यात तिला तथ्य वाटू लागले. कैकयीला, तिच्या पुत्राची, भरताची चिंता वाटू लागली. त्याचा भविष्यकाळ सुरक्षित करणे जरूरीचे आहे असे तिला वाटत होते. पण ते कसे करावे हे काही तिला समजत नव्हते. मंथरेने तिची मन:स्थिती अचूक ओळखली आणि  दशरथ राजाने तिला दिलेल्या दोन वरांची आठवण करून दिली. पूर्वी एका युद्धप्रसंगी, महाराज दशरथ जखमी झाले असताना, शत्रू सैन्याच्या वेढ्यात अडकले होते. त्यावेळी त्यांच्या रथाचे सारथ्य महाराणी कैकयीच्या हाती होते. त्यांनी कुशलतेने रथाचे सारथ्य करीत रथ शत्रूच्या वेढ्यातून दूर नेला आणि महाराजांचे प्राण वाचवले. त्यांच्या कर्तृत्वावर प्रसन्न होऊन महाराजांनी त्यांना दोन वर मागण्यास सांगितले. परंतु राणी कैकयीने त्या वेळेस त्यांना काहीच मागितले नव्हते. मंथरेने त्यांना त्या प्रसंगाची आठवण करून दिली. परंतु कैकयीचे मन शंकित होते. भूतकाळातील त्या घटनेचे स्मरण  महाराजांना असेल का? 
मंथरेने सांगितले, की महाराज दशरथ हे महान अशा सूर्यकुळातील  राजे होते. स्वतःच्या प्राणांहूनही त्यांना दिलेल्या शब्दाचे मोल अधिक होते. ते नक्कीच कैकयीला दिलेल्या वचनाची पूर्तता करतील. 
महाराणी कैकयीने आपले मागणे महाराज दशरथापुढे ठेवले. तिने महाराजांना त्या दोन वरांची आठवण दिली. कैकयीने त्या वरांची पूर्तता करण्याचा आग्रह धरला. एका वरानुसार अयोध्येचे राजसिंहासन तिचा पुत्र भरत यांस देण्यात यावे असे सूचवले. दुसऱ्या वरानुसार श्रीरामांनी चौदा वर्षे वनवासात राहावे असे सांगितले.  महाराजांचा विश्वासच बसत नव्हत की कैकयी असे काही मागेल म्हणून, पण ते सत्य होते.  आणि म्हणून, पितृवचनाचा मान राखण्याकरिता, श्रीराम वनवासाला जाणार होते. उत्सवाची जागा दुःखाने घेतली. शृंगारलेल्या अयोध्येवर शोककळा पसरली होती. राम, लक्ष्मण आणि सीतेने अयोध्येचा निरोप घेतला. महाराज दशरथांचा, पुत्रशोकाने मृत्यू झाला. त्यांच्या तिन्ही राण्या विधवा झाल्या, आणि अयोध्येचे साम्राज्य अनाथ झाले होते. हा सर्व अनर्थ ओढवला होता, तो एका दासीच्या, मंथरेच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे. नांदत्या जागत्या राजगृहावर स्मशान शांतता पसरली होती. या सर्व घडामोडीत आनंदी झालेली एकच व्यक्ती होती...  ती म्हणजे मंथरा दासी. तिचे कपट कारस्थान यशस्वी झाले होते.  
राम, लक्ष्मण आणि सीता वनवासी झाले होते. जंगल, अरण्ये हेच त्यांचे निवासस्थान होते. त्या काळात त्यांनी विविध प्रदेशांमध्ये भ्रमण केले. अनेक ऋषिमुनींच्या आश्रमांना भेट दिली. त्यांना त्रासदायक ठरणाऱ्या असुरांचा वध करून, आश्रमवासियाचे जगणे सुसह्य केले. अशी अनेक वर्षे लोटली. दंडकारण्यातील आश्रमात तिघांचे वास्तव्य होते. रानावनातील आयुष्य तसे कष्टप्रद असते. तिघेही राजमहालात राहिलेले, जिथे त्यांच्या सेवेसाठी अनेक दासदासी तत्पर असत. परंतु तरीही त्यांनी हे नवे आयुष्य आत्मसात केले होते. त्यांच्या आनंदात मिठाचा खडा पडलाच.  
लंकापती रावणाची भगिनी शूर्पणखा तेथे आली होती. ती एक मायावी राक्षसी होती. तिने एका रूपसुंदर तरूणीचे रूप धारण केले. श्रीरामाच्या आश्रमात ती आली. तिने श्रीरामांना विनंती केली, की त्यांनी तिच्याशी विवाह करावा. त्या मायावी राक्षसीचे खरे रूप राम,  लक्ष्मणांनी  ओळखले नव्हते. श्रीराम म्हणाले, "माझी पत्नी येथे आहे, म्हणून मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. "  त्यानंतर तिने लक्ष्मणाला तशीच विनंती केली. त्याने पण तिला नकार दिला.  शूर्पणखेला कोणाकडून नकार ऐकण्याची सवय नव्हती. तिला भयंकर राग आला. तिने पाहिले, सीता तेथेच हे सारे पाहत, ऐकत उभी होती. शूर्पणखेने तिच्यावर हल्ला केला. ते पाहून लक्ष्मणाने पुढे होऊन तिच्यावर वार केला. तिचा चेहरा विद्रूप झाला. ती मोठ्याने रडत, ओरडत तिथून निघून गेली. श्रीराम आता चिंतीत झाले होते. ती एक मायावी राक्षसी होती हे त्यांच्या लक्षात आले. भविष्यात येणाऱ्या संकटाची ती चाहूल होती. 
शूर्पणखा लंकेमध्ये पोहोचली. सर्वसत्ताधीश, महाबली, महापराक्रमी रावणासमोर तिने तिची व्यथा मांडली. तिची झालेली अवस्था तर दृष्टीसमोरच होती. संतापाने रावणाच्या मुठी वळल्या, नेत्रांमध्ये अंगार उतरला होता. अती संतापाने कापणाऱ्या आवाजात तो म्हणाला, 
 "दुःखी होऊ नकोस शूर्पणखे. तुझ्या अपमानाचा मी सूड घेईन. " 
रावणाकडून शूर्पणखेची हीच अपेक्षा होती.  
रावण त्याच्या पुष्पक विमानावर आरूढ होऊन दंडकारण्याकडे जाण्यास सिद्ध झाला. त्याचे हे आकाशगामी वाहन, त्याला अगदी थोड्या वेळात समुद्र पार करून इष्ट स्थळी पोहोचविणार होते. स्वभगिनीच्या अपमानाने तो अतिक्रोधित झाला होता. याशिवाय एका जुन्या अपमानाचा बदला त्याला घ्यायचा होता.  सीतेच्या स्वयंवर प्रसंगी,   झालेला अपमान तो विसरलेला नव्हता.
रावण आकाशमार्गे अरण्यामध्ये प्रवेशला. त्याने त्याचे वाहन जरा दूर ठेवले. त्याने आता वेषांतर केले होते. एका ब्राम्हण अतिथीचे रूप त्याने धारण केले होते. रावणाने  त्याच्या सोबत मारीच राक्षसाला पाचारण केले. मारीच हा मायावी,  इच्छाधारी राक्षस होता. त्याने एका सोनेरी मृगाचे रूप घेतले होते. तो राम सीतेच्या आश्रमाच्या आसपास रेंगाळू लागला. गवत खाण्याच्या बहाण्याने तो बराच काळ तिथेच थांबलेला होता. सीतेची दृष्टी त्या सुवर्ण मृगावर गेली. तिने श्रीरामांना तो मृग दाखवीत म्हणले,
"मला तो मृग आणून द्या".
श्रीरामांनी तो मृग पाहिला होता. त्यांना तो मायावी असावा असा संशय आला. त्यांनी तसे म्हणताच सीतेला राग आला.
"तो मृग तुम्हाला आणून देता येणार नाही असे सांगा, उगीच खोटे बहाणे कशाला? " 
सीता रागाने म्हणाली. आता रामाचा नाईलाज झाला. परंतु लक्ष्मणाला दक्ष राहून आश्रम आणि सीतेचे रक्षण करण्यास सांगितले. कुठल्याही परिस्थितीत आश्रमापासून दूर जाऊ नको असे बजावले.
सुवर्ण मृग रामाला हुलकावणी देत दूरवर घेऊन गेला. अखेर रामाने धनुष्यावर बाण चढवला. रामाचा बाण, निशाणा चुकणे शक्यच नव्हते. बाणाने अचूकपणे मृगाचा वेध घेतला. बाण लागताच मृगाच्या रूपातील मारीच जमिनीवर कोसळला, त्याचवेळेस त्याचे सत्यस्वरूप सामोरे आले. जमिनीवर पडताना देखिल त्याने त्याचे स्वामीकार्य चोख पार पाडले होते.  हुबेहुब रामाच्या आवाजात तो ओरडला,
"लक्ष्मणा धाव, मला वाचव".
श्रीराम सावध झाले. त्यांच्या लक्षात सारा प्रकार आला होता. ते त्वरेने आश्रमाकडे निघाले, तर वाटेतच लक्ष्मण दिसला. रामाला सुखरूप पाहून आनंदला, परंतु त्यांना आता सीतेची काळजी वाटत होती.

दोघेजण आश्रमात पोहोचले, परंतु सीता तेथे नव्हती. रावणाने भिक्षा मागण्याच्या बहाण्याने सीतेला आश्रमाबाहेर येण्यास भाग पाडले. आणि तिला बळजबरीने स्वतःबरोबर पुष्ष्पक विमानाकडे नेले. विमान आकाशमार्गे लंकेला निघाले. सीतेच्या दुःखाला पारावार राहिला नाही. परंतु त्या दुःखातही तिची बुद्धी सावध होती. रावण तिला आकाशमार्गाने नेत होता. जमिनीवर तिचा शोध घेणाऱ्या राम, लक्ष्मणांना तिचा माग लागणे शक्य नव्हते. तिने एक एक करून सर्व अलंकार मार्गावर विखरून टाकण्यास सुरुवात केली. आशा होती, की त्यातला एखादा तरी कुणाला सापडेल. तिचा शोध घेणाऱ्या राम लक्ष्मणा पर्यंत पोहोचेल. त्यावरून सीता कोणत्या दिशेने गेली असावी याचा अंदाज लागेल.
आणि झालेही तसेच. दुःखवेगाने वेडापिसा झालेला राम, सीतेला शोधीत चालला होता. आसपासच्या गुहा, कपारी,  वृक्ष, वेली साऱ्या जागा ते दोघेजण धुंडाळत होते. आणि खरेच त्यांच्या नजरेस सीतेचा एक दागिना दिसला. सीतेच्या पायातील पैंजण होते ते. त्यांनी ते अचूक ओळखले. त्या दिशेनेच मग ते पुढे निघाले. वाटेत त्यांना एक जखमी झालेला पक्षी दिसला. तो जटायू होता. रावण आकाशमार्गे सीतेला घेऊन जात असताना, त्याला अडविण्याचा जटायुने मोठ्या शर्थीने प्रयत्न केला होता. परंतु रावणाने त्याचा एक पंख कापला आणि तो खाली कोसळला. जटायूची मरणघटिका समीप  आली होती. परंतु श्रीरामांना सीतेचा ठावठिकाणा सांगण्यासाठी त्याने तग धरला होता.
जटायूने सांगितलेली माहिती महत्त्वाची होती आणि चिंताजनक होती. त्यांचा शत्रू बलशाली होता. त्याने सीतेला आकाशमार्गाने नेले होते. याचा अर्थ तो कुणी सामान्य राजा नव्हता. सीतेला सोडविण्यासाठी युद्ध अपरिहार्य होते. परंतु त्याकरिता त्यांना मदतीची आवश्यकता होती.
रानावनातून मार्गक्रमणा करीत ते किष्कींधा नगरीजवळ येऊन पोहोचले.  तेथील अरण्यातून जात आसताना एकेजागी ध्यानस्थ होऊन जप करणाऱ्या हनुमानाशी त्यांची भेट झाली.  राम लक्ष्मणांची सारी कथा ऐकल्यावर, हनुमानास त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली.  त्याने राम आणि लक्ष्मण यांना महाराज सुग्रीवांची भेट घेण्याची विनंती केली.  त्याने सांगितले,
"महाराज सुग्रीवांनी तुम्हाला नक्कीच मदत केली असती. परंतु सध्या तेच अतिशय संकटात आहेत. त्यांचे राज्य आणि त्यांची पत्नी देखील वालीने हिरावले आहे. त्यांच्यावर जंगलात लपुनछपून जगण्याची वेळ आली आहे. " 
हे ऐकल्यावर राम लक्ष्मणांना आश्चर्य वाटले. दोन सख्ख्या भावांमध्ये इतके वैर? त्यांनी सुग्रीवाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 
सुग्रीवाने रामाला सांगितले की, जर त्याचे राज्य मिळवून देण्यास श्रीरामांनी साहाय्य केले, तर तो सीतेला सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करेल. रामाने ते मान्य केले.
सुग्रीवाने वालीला द्वंद्व युद्ध करण्याचे आव्हान दिले. वालीने ते अर्थात स्वीकारले. वाली महापराक्रमी होता. सुग्रीवापेक्षा युद्धकलेत कैकपटीने श्रेष्ठ होता. त्याला सरळ युद्धात हरविणे सुग्रीवाला कधीच शक्य नव्हते. म्हणून त्याने कपट योजले. त्यात सहभागी होण्याचे श्रीरामांनी मान्य केले. सुग्रीव आणि वालीचे द्वद्वयुद्ध चालू असताना रामाने वालीचा बाणाने वेध घेतला. एका पराक्रमी राजाचा आपल्या हातून असा शेवट व्हावा, याचे श्रीरामांना अतोनात दुःख झाले होते. परंतु नाईलाज होता. सीतेचा शोध घेण्याकरिता आणि तिची सुटका करण्याकरता त्यांना मदत आवश्यक होती.
त्यानंतरच्या घटना वेगाने घडू लागल्या. सुग्रीवाने सीतेच्या शोधार्थ अष्टदिशांना दूत पाठवले. हनुमानाने लंकेच्या दिशेने उड्डाण केले होते. अनेक अडथळे पार करून  हनुमानाने लंकाप्रवेश केला. अशोकवनात राक्षसींच्या पहाऱ्यामध्ये असलेल्या सीतेला, श्रीरामाची मुद्रिका देऊन सांगितले, लवकरच श्रीराम तिची सुटका करतील. 
हनुमान किष्किंधेला परतला ते एक चांगली, आशादायक बातमी घेऊनच. आता त्यांची दिशा तर निश्चित झालेली होती. परंतु सैन्यासह लंकेमध्ये कसे पोहोचायचे हा प्रश्न होता. तरीही सर्वांनी लंकेच्या दिशेने प्रयाण केले.
श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव  समुद्राच्या किनाऱ्यावर ससैन्य येऊन थांबले.  श्रीरामांनी  किनाऱ्यावर वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची पुजा केली. ते स्थान आज भारतामध्ये रामेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. सुग्रीव सेनेतील नल, नील, जांबुवंत, अंगद इ. सारे समुद्र उल्लंघनाचा मार्ग शोधत होते. परंतु कुणालाच यश मिळेना.
एक दिवस मात्र श्रीरामांचा संयमाचा बांध कोसळला. धनुष्यावर बाण चढवून त्यांनी सागराच्या दिशेने नेम धरला. रामबाण कधीच विफल होणार नाही. समुद्रातील जीवसृष्टी भयभीत झाली. आता प्रलय होणार निश्चित. श्रीराम बाण सोडणार, इतक्यात स्वतः समुद्र देव तिथे अवतीर्ण  झाले. रामापुढे हात जोडीत ते म्हणाले,
"हे राम, आपण क्रोधित का आहात. माझा अपराध काय आहे ते सांगावे. " 
श्रीरामांनी त्यांची व्यथा कथन केली.  ते म्हणाले, 
"हे सागरराज, आम्हा सर्वांना लंकेमध्ये जाण्यास मार्ग द्या, बाकी काहीच मागणे नाही. " 
समुद्र देवांनी त्यांना वचन दिले, की तुम्ही लंकेपर्यंत पाण्यातून रस्ता तयार करा. तुम्ही ज्या शिळा पाण्यात टाकाल त्या बुडणार नाहीत, पाण्यावर तरंगतील. रामाचे समाधान झाले परंतु त्यांनी  धनुष्यावर बाण चढवलेला होता, तो परत कसा घेणार?  मग समुद्र देवाने सांगितले, की तो बाण जिथे पडेल, तिथपर्यंत समुद्राची सीमा  मागे हटेल.
समुद्र देवाच्या आश्वासनाने, सेनेत उत्साह संचारला होता. सेनेतील वास्तुविद्येच्या माहितगारांनी आराखडे आखले. आणि सेतूच्या बांधणीचे काम सुरू झाले. मोठ्या मोठ्या शिळा आणवल्या होत्या.  त्या प्रचंड आकारमान आणि वस्तुमान असलेल्या शिळा, समुद्राच्या पाण्यावर सहजतेने तरंगत होत्या. बघता बघता रामसेतू लंकेपर्यंत पोहोचला. त्यावरून श्रीराम आणि त्यांची सेना लंकेमध्ये पोहोचले. 
सर्वप्रथम राजशिष्टाचाराचे पालन करून श्रीरामाने त्यांचा दूत रावणाकडे पाठवला होता. त्याने रावणासमोर सामोपचाराचा प्रस्ताव ठेवला. परंतु रावणाने  तो सपशेल धुडकावला.  स्वबळाच्या  गर्वाने तो उन्मत्त झालेला होता. युद्ध झाल्यास,  वानरसेना त्याच्यासमोर एकदिवस सुद्धा टिकणार नाही अशी त्याची धारणा होती.  त्याला कारणही होते. रावणाने अनेक वर्षे तप करून श्री शंकराकडून वरदान मिळवले होते. रावणाला अमरत्व प्राप्त करायचे होते. परंतु भगवान शिवशंकरांनी सांगितले, की पृथ्वीवरील सर्व जीव मर्त्य आहेत.  अमरत्वाचा वर देणे,  सृष्टी नियमांच्या विरुद्ध आहे. त्यावर रावणाने दुसरे मागणे मांडले. तो म्हणाला त्याला देव अथवा दानवांकडून मृत्यू येऊ नये. यात त्याने मानवाचा  मुद्दामच उल्लेख केला नाही. तो समस्त मानव जातीला तुच्छ लेखत असे. दुबळ्या मानवाकडून त्याचा मृत्यू होणे त्याला असंभव वाटत होते. देवेश्वरांनी त्याला वरदान दिले. त्यामुळे तो अहंकारी झाला होता. त्याला कुणाचेच भय नव्हते.  
 
श्रीरामाचा दूत अंगद,  याची शिष्टाई असफल झाली. आता युद्धास पर्यायच नव्हता. दोन्ही सेना सज्ज झाल्या होत्या. त्याच वेळी रावणाचा कनिष्ठ भ्राता विभिषण, श्रीरामांच्या सेनेत सामील झाला होता. त्याला रावण करीत असलेला दुराचार मान्य नव्हता. एका विवाहित स्त्रीची विटंबना करणे त्याला अधर्माचे  आणि अन्यायाचे वाटत होते. आणि त्या पापात सहभागी होण्यास त्याने नकार दिला.  
लंकाधिपती रावणाची पत्नी, महासती मंदोदरीने घडत असलेल्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. ती रावणास म्हणाली, "राम कुणी सामान्य मानव नाहीत. एकबाणी, एकवचनी आणि एकपत्नी असा त्यांचा लौकिक आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूचाच ते अवतार आहेत, असे सर्वलोक समजतात. आजवर युद्धात त्यांना कुणीच पराभूत करू शकले नाही. सीतेला मानसन्मानाने श्रीरामांकडे सुपूर्द करावी, अन्यथा अनर्थ निश्चित आहे. ’ 
रावणाने, पत्नीच्या सल्ल्याकडे दुर्लक्षच केले.  
 
रावणाची राक्षससेना आणि रामाची वानरसेना यात घनघोर युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूचे अनेक शूरवीर योद्धे धारातीर्थी पडले. रावणाचा प्रिय पुत्र,  इंद्रजीत मेघनाद देखील मारला गेला. कनिष्ठ भ्राता कुंभकर्णाचा मृत्यू झाला. रावणाचे अनेक पुत्र, पौत्र, सेनानी मरण पावले. परंतु रावण नरमाईची भाषा बोलण्यास तयार नव्हता. त्याचा स्वबळाविषयीचा  अविचारी दुराभिमान, दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होता. आता परिस्थिती अशी होती, की सेनेचे नेतृत्व करण्यास कुणी नेताच नव्हता.  
रावण स्वतः युध्धभूमीवर जाण्यास सज्ज झाला. रावण त्याच्या दिव्य रथावर आरूढ झाला. त्याचा रथ अस्त्र, शस्त्रांनी सुसज्ज होता. जल, स्थल आणि वायूमंडळाचे भ्रमण करण्यास समर्थ असा होता. परंतु श्रीराम मात्र पदाती होते. हत्ती, घोडे अथवा अन्य कोणतेही वाहन त्यांच्याकडे नव्हते. युद्ध प्रारंभ झाले. रावण त्याच्याकडील दिव्यास्त्रांचा प्रयोग करून वानरसेनेचे अतोनात नुकसान करीत होता. तसेच तो मायावी युद्धात प्रवीण होता. त्यामुळे त्याला प्रतिकार करणे अशक्य झाले होते. युद्ध विराम झाला. श्रीरामाच्या सेनेत चिंतेचे वातावरण होते.  
 
राम आणि रावणाचे युद्ध अनेकजण अवलोकीत होते. काहीश्या आशेने,  थोड्याफार अपेक्षेने. रामाचा विजय व्हावा असे सर्वांनाच वाटत होते. पण परिस्थिती अवघड होती. दोघे प्रतिस्पर्धी तुल्यबळ होते. परंतु श्रीरामांकडे साधनांची कमतरता होती. स्वर्गलोकीचा राजा इंद्र याने परिस्थिती जाणली. तो त्याच्या दिव्य रथासह युध्धभूमीवर अवतरला. त्याने रामाला त्याचा रथ स्वीकारण्याची विनंती केली. नंतर ब्रम्हा, विष्णू, महेश आदींनी  रामाला अनेक दिव्यास्त्रे प्रदान केली. अनेकानेक शुभाशिर्वाद  देऊन यशाची कामना केली.  
 
दुसऱ्या दिवशी घनघोर युद्ध झाले. श्रीरामांच्या बाणाने अनेकवार रावणाचा वेध घेतला,  परंतु रावणावर त्याचा काहीच परिणाम होत नसे. दोघेही महावीर, कुणीही माघार घेत नव्हते. सारेजण आचंभित होऊन तो महाभयंकर संग्राम बघत होते. अखेर रावणाचा अचूक वेध घेण्यात श्रीरामांना यश आले. वर्षानुवर्षे स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वीतलावर अनिर्बंध अत्याचार करणारा,  स्वसामर्थ्याच्या गर्वाने बेबंद झालेला महाप्रतापी रावण, रणांगणावर धारातीर्थी पडला होता. महाराणी मंदोदरी शोकमग्न झाल्या. परंतु कर्तव्याचे स्मरण ठेवून त्यांनी मोठ्या सन्मानाने सीतेची रवानगी केली. सुग्रीव, हनुमान आणि सारी वानरसेना आनंदली होती.
  
ज्या दिवशी श्रीरामांनी, अत्याचारी रावणाचा वध केला, लंकेच्या राक्षस सेनेचा पराभव केला आणि रावणाच्या कैदेत असलेल्या सीतेला मुक्त केले, तो दिवस म्हणजे विजयदशमी. न्यायाची जीत होऊन अन्यायी, अत्याचारी सत्ताधारी पराभूत झाला. एका स्त्री ची मर्यादा भंग करणारा दूराचारी नामशेष झाला. तो पवित्र दिवस म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी हा पराक्रमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कर्तव्यनिष्ठा, मान-मर्यादा आणि निर्भयपणा या सद्गुणांना आदर्श मानण्याची शिकवण दिली जाते. सुग्रीवाचे मित्रकर्तव्य, हनुमानाची रामभक्ती आणि सीतेचे पातिव्रत्य यांचे आदरपूर्वक स्मरण केले जाते.

श्रीरामांनी पितृवचनासाठी राजसिंहासनाकडे पाठ फिरवली. सीतेच्या रक्षणार्थ, समुद्रपार करून लंकेच्या महाबलाढ्य राजाला युद्धात पराभूत केले, "मरणांती वैराणी... " हे वचन प्रमाण मानून, युद्धात मरण पावलेल्या शत्रुचा सन्मानाने अंत्यसंस्कार केला. शत्रूपत्नीची अवहेलना केली नाही. जिंकलेले लंकेचे राज्य, कसलाही मोह न ठेवता विभिषणाच्या हाती सुपूर्त केले. असे अलौकीक गुण असलेल्या श्रीरामांना मर्यादा पुरूषोत्तम समजले जाते. त्याचे सद्गुण आदर्श मानून ते आत्मसात करण्याचा  प्रयत्न करण्याचा निश्चय करण्याचा, 
श्रीराम आणि वानरसेना यांनी पराक्रमाने मिळविलेला विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजेच विजयादशमी.