दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा (३)

नवरात्री उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक प्रांताच्या आगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. परंतु मूळ उद्देश एकच आहे. तो म्हणजे दुर्गादेवीची उपासना, म्हणजेच शक्तीची उपासना. हिंदुधर्मीयासाठी हा उत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा नावाने हा उत्सव साजरा करतात. गुजराथ मध्ये नवरात्री उत्सवात गरबानृत्य करतात. परंतु नवरात्री म्हणजे प्रसादासाठी केलेली पक्वान्ने, नवी, रेशमी आणि जरतारी वस्त्रप्रावरणे, किंमती अलंकार आणि रासदांडीया इतकेच नाही. नवरात्रीचे महत्त्व समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोमलांगी, अबला नारी प्रसंगी उग्र रूप धारण करून शत्रूचा संहार करते, याची द्वाही फिरविणारा हा उत्सव आहे. स्त्रीला एका विशिष्ट चौकटीतच पाहू इच्छिणाऱ्यांना नवरात्र उत्सवाचे महत्त्व विशद करून सांगणे अतिशय गरजेचे आहे.  
 
संपूर्ण भारतात दुर्गादेवीची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. तिला दुर्गामाता असे संबोधिले जाते. दुर्गादेवी,जगतजननी देवी पार्वतीचेच रूप आहे असेही समजले जाते. दुर्गादेवी युद्ध करणारी, हाती शस्त्र धारण करणारी, आणि शत्रूचा संहार करताना महाभयंकर रूप धारण करणारी देवता आहे. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची उपासना केलीजाते. देवीला आठ हात असतात, म्हणून तिला अष्टभुजा असेही संबोधतात. देवीच्या प्रत्येक हातात शस्त्र असते. दुर्गादेवी संकटातून तारणारी, सर्व दुःखितांना दिलासा देणारी रक्षणकर्ती माता आहे. म्हणून दुर्गादेवीची शक्तीच्या रूपात उपासना केली जाते. 
 
नवरात्रीनंतर येणारा दहावा दिवस दसरा म्हणजेच विजयादशमी. या दिवसाचे देखिल अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुर्गादेवीने महिषासुरावर मिळविलेला विजय साजरा करण्याचा हा दिवस. दसरा म्हणजे पराक्रमाचे गुणगान करण्याचा दिवस.   
दुर्गादेवीच्या अवताराचे प्रयोजन काय होते. नवरात्री मध्ये देवीची पूजाअर्चा, उपासना  करण्याची प्रथा कशी रूढ   झाली?  
 
कथा :- ३   पौराणिक कथा 
 
त्रिलोकामध्ये हाहाःकार माजला होता. सारी जीवसृष्टी भीतीच्या कृष्णछायेखाली जगत होती. पृथ्वी भयकंपित झाली होती. स्वर्गलोकीचे सिंहासन डळमळीत झाले होते. सर्वजण त्यांच्या इष्टदेवतेचे स्मरण करून, मदतीसाठी साकडे घालीत होते. देवाधिदेव इंद्र चिंताग्रस्त होते. 
या साऱ्याचे कारण होता, एक महाभयंकर, महाबली राक्षसराजा महिषासुर. त्याच्या अत्याचारांनी तिन्हीलोक त्रस्त झाले होते. क्रूरकर्मा महिषासुराला रोखू शकेल असा कुणीही वीर अस्तित्वातच नव्हता. ब्रम्हदेवाकडून प्राप्तं केलेल्या वरामुळे तो अवध्य आणि अजिंक्य झाला होता. सर्व राक्षसी विद्यांमध्ये तो पारंगत होता. निरनिराळी रूपे धारण करणे त्याला सहजच शक्य होत असे. अत्यंत महत्त्वाकांक्षी महिषासुराला त्रैलोक्याचे राज्य प्राप्तं करायचे होते. विश्वातील सर्व सत्ताधीशांपेक्षा श्रेष्ठ अशी त्याची ओळख असावी, अशी त्याची मनोकामना होती. ब्रम्हदेवाकडून प्राप्त केलेल्या वरामुळे ती सफल झालेली होती. 
 
महिषासुर हा असुरांचा राजा होता. महाप्रतापी असा त्याचा लौकिक होता. त्याने उग्र तपश्चर्या करून ब्रम्हदेवांना प्रसन्न केले होते. त्यांच्याकडे महिषासुराने अमरत्वाचे वरदान मागितले. परंतु ब्रम्हदेवाने ते अमान्य केले. त्या ऐवजी तो देव, दानव अथवा मानवाकडून अवध्य असेल असा वर दिला. वर मागताना त्याने स्त्री जातीचा उल्लेख केला नाही. कारण अबला स्त्रीकडून त्याला कसलाच धोका संभवत नव्हता.  
आधीच स्वबळाच्या गर्वाने धुंद  असलेला महिषासुर, मिळालेल्या वराने अधिकच उन्मत्त झाला होता.  
 
इंद्रादी देवांनी ब्रम्हा, विष्णू, महेश्वराचा मदतीसाठी धावा केला. सर्वजण हवालदिल झालेले होते. ब्रम्हा, विष्णू महेश्वर देखिल महिषासुरापुढे निष्प्रभच ठरणार होते. अनेकानेक दिवसांच्या विचारमंथनातून त्यांना अखेर एक उपाय सूचला होता. महाभयंकर अशा संकटातून त्रैलोक्याला मुक्त करण्याचा मार्ग त्यांना गवसला होता. 
 
ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वरांनी त्यांच्या साऱ्या दिव्य शक्ती एकवटल्या. त्या शक्तींच्या संयोगातून एक दिव्य स्त्रीरूप अवतरले. ती होती अष्टभुजा आदीमाया दुर्गादेवी.त्रिशूळ, खड्ग, परशु, सुदर्शन चक्र आदी शस्त्रे तिने धारण केली होती.अक्राळ विक्राळ रूप असलेल्या वनराज सिंहावर ती आरूढ झालेली होती. रक्तवर्ण वस्त्रे परिधान केलेली, अनेक किंमती अलंकाराने युक्त असलेली ती कोमलांगी, दिव्य तेजाने झळाळत होती. तिला पाहताच तिथे जमलेल्या देवी देवतांनी शिर झुकवून अभिवादन केले. इंद्रादी  देवांनी देखिल त्यांच्या शक्ती आणि अस्त्रे दुर्गेला अर्पण केली. दुर्गादेवीचे जीवितकार्य होते, महिषासुराचा विनाश. तिचा अवतारच त्या साठी झालेला होता.  
 
तिच्यासमोर नतमस्तक  झालेल्या देवीदेवतांकडे पाहून तिने मंदस्मित केले, आशीर्वाद देण्यासाठी हात उंचावत सगळ्यांचा निरोप घेतला. देवीचे दिव्य, तेजस्वी रूप पाहताच, महिषासुराच्या अत्याचारांनी भयभीत झालेले देवलोकातील प्रजाजन आश्वस्त झाले. महिषासुराचा शेवट समीप आला होता. 
 
दुर्गादेवी सिंहावर आरूढ होऊन पृथ्वीवर निघाली. नगराच्या तटाबाहेर येऊन थांबली. तिने महिषासुराला युद्धाचे आव्हान दिले. महिषासुराला आश्चर्य वाटले, की एक स्त्री त्याच्यासारख्या अजिंक्य राजाला आव्हान देते आहे. परंतु त्याने ते आव्हान स्वीकारले. त्याचा समज होता की थोड्याच वेळात, सहजतेने तो त्या स्त्रीचा पराभव करेल, आणि  ती त्याची दासी होऊन राहील. त्याने दुर्गादेवीला ओळखलेच नव्हते. 
 
महिषासुराला युद्धात पराजित करणे सोपे नव्हते. तो एक युद्धकला निपुण असा अजिंक्य योद्धा होता. स्वतःचे रूप बदलून दुसऱ्या प्राण्याच्या रूपात युद्ध करण्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याच्या सतत बदलणाऱ्या रूपामुळे शत्रू गोंधळून जात असे आणि पराभूत होत असे. अष्टभुजा दुर्गादेवीने आता रौद्ररूप धारण केले होते. तिच्याकडील शस्त्रांचा वापर करून ती महिषासुराच्या सैन्याला बेजार करीत होती. तिच्यासमोर कुणाचाच निभाव लागेना. पराभूत होऊन सारे माघारी फिरले होते. आता महिषासुर स्वतः रणांगणावर आला होता. सुरूवातीला वाटले तितके या स्त्रीला पराभूत करणे सोपे नव्हते. परंतु अजूनही स्वबळाविषयीचा त्याचा गर्व तसूभरही कमी झालेला नव्हता. घनघोर युद्धास प्रारंभ झाला. शस्त्र अस्त्रांच्या वापराने आसमंतात विजा चमकल्याचा भास होत होता. शस्त्रांच्या भयंकर नादाने, उडत असलेल्या धुरळ्याने आणि देवीचे वाहन सिंहाच्या गर्जनांनी परिसर कोंदून गेला होता. सर्वजण मोठ्या उत्कंठेने ते महायुद्ध बघत होते. अनेक दिवस आणि अनेक रात्री ते युद्ध चालू होते. महिषासुराने अनेक रूपे बदलली. निरनिराळ्या प्राण्यांच्या रूपात तो चाल करून जात होता आणि देवीच्या पराक्रमा पुढे  माघार घेत होता. 
 
अखेर त्याने महिषाचे रूप धारण केले. शिंगे रोखून, मोठ्याने हुंकारत तो दुर्गादेवीचे वाहन सिंहावर चाल करून आला. तो जवळ येताक्षणी देवीने हातातील त्रिशूळ सावरला, आणि मोठ्या ताकदीने त्या उन्मत्त महिषाच्या मानेवर वार केला. महिषाच्या रूपातील महिषासुर धरतीवर कोसळला. देवीने परत एकदा त्याच्या मानेवर वार केला. क्षणात रक्ताचे कारंजेच उसळले, आणि दुष्ट, अत्याचारी महिषासुर गतप्राण झाला. 
 
ते भयंकर युद्ध बघत असलेल्या देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली, महिषासुराच्या अन्यायी राजवटीत भयभीत होऊन जगणारे प्रजाजन मुक्त झाले होते. त्यांनी घरावर मंगल तोरणे बांधली. रस्ते सडा रांगोळ्यांनी सजवले, फुलांच्या पायघड्यांवरून त्यांनी देवीला नगरात प्रवेशण्याची विनंती केली. सुवासिनींनी आरती ओवाळली, गायक, नर्तकांनी आनंदोत्सव साजरा केला. दुर्गादेवीने महिषासुराबरोबर युद्ध करून त्याचा वध केला.
दुष्ट शक्तीचा नाश झाला. सभ्यता आणि पावित्र्याचे मंगलमय युग अवतरले. त्याचे स्मरण म्हणून नवरात्री उत्सव साजरा केला जातो. 
 
नवरात्री उत्सवात देवीची नऊ रूपात पुजा केली जाते.  
 
नवदुर्गेची रूपे  
 
पहिला दिवस - हा देवी शैलपुत्रीचा दिवस आहे. शैलपुत्री म्हणजे पर्वतकन्या म्हणजेच पार्वती. शैलपुत्री ही महाकालीचा अवतार असल्याचे समजले जाते. तिच्या एका हातात. त्रिशूळ आणि एका हातात कमळ असते. तिचे वाहन नंदी असून, शुभरंग राखाडी आहे. रक्षेचा रंग जोष, जोम आणि उत्साहाचे प्रतीक आहे. 
 
दुसरा दिवस (द्वितीया) - ब्रम्हचारिणी देवीचा. मोक्षप्राप्ती साठी या देवीची उपासना केली जाते. देवीच्या एका हातात. कमंडलू तर दुसऱ्या हातात जपमाळ असते. देवीचे कुठलेही वाहन नाही. ती अनवाणी पायाने सर्वत्र संचार करते असे मानतात. शुभरंग निळा आहे, जो  सुख आणि शांतीचे प्रतीक आहे. 
 
तिसऱ्या दिवशी (तृतीया) - देवी चंद्रघंटेचे पूजन केले जाते. तिला चंद्रिका अथवा चंद्रगंधा असेही संबोधितात. ही देवी पार्वतीचेच रूप आहे. विवाहापश्चात पार्वती देवीने, शिवशंकरांच्या भालावर असलेली अर्धचंद्रकोर स्वतःच्या ललाटी धारण केली अशी कथा सांगितली जाते. चंद्रघंटा देवी सौंदर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे. शुभरंग शुभ्रपांढरा आहे, जो जीवनाचे प्रतीक आहे. 
 
चौथा दिवस (चतुर्थी) - कूष्मांडा देवीचा आहे. सृष्टीच्या सृजनाची ही देवता. पृथ्वीवरील वृक्ष, वेली, वनस्पतींच्या निर्मितीची ती प्रेरणा आहे. तिला आठ हात असून व्याघ्र वाहनावर ती आरूढ झालेली आहे. शुभरंग लाल आहे, जो सृजनाचे प्रतीक आहे.  
 
पाचव्या दिवशी (पंचमी) - स्कंधमातेचे पूजन केले जाते. नावाप्रमाणेच ती स्कंधाची, म्हणजेच कार्तिकेयाची माता आहे. तिला चार हात असून सिंह तिचे वाहन आहे. गहिरा निळा रंग तिचा शुभरंग आहे. पुत्र संकटात असेल, त्यावेळी त्याच्या रक्षणासाठी मातेच्या शक्ती जागृत होऊन त्याची मदत करतात. त्या रक्षणकर्त्या शक्तींचे प्रतिनिधित्व, गहिरा निळा रंग करतो. 
 
सहावा दिवस (षष्ठी) - देवी कात्यायनीचा आहे. कात्यायन ऋषींची ही कन्या. तिला चार भुजा असून ती सिंहावर आरूढ असते. कात्यायनी हा दुर्गेचाच अवतार असून ती महालक्ष्मीचे रूप आहे असे समजले जाते. देवीच्या सर्व अवतारातील कात्यायनी हे तिचे सर्वात संहारक रूप आहे. शुभरंग पिवळा आहे,   जो साहसाचे प्रतीक आहे.  
 
सातवा दिवस (सप्तमी) - या दिवशी देवी कालरात्री चे पूजन करतात. देवीच्या सर्व रूपातीला महाभयंकर असे हे रूप आहे. शुंभ आणि निशुंभ राक्षसांना मारण्यासाठी देवी पार्वतीने तिच्या गौरवर्णाचा त्याग केला अशी कथा आहे. कालरात्री देवीचा रंग काळा आहे. तिच्या क्रुद्ध नेत्रामधून आगीच्या ज्वाळा येत आहेत असा भास होत असतो. देवीची वस्त्रे शुभ्र रंगाची असतात, जो शांततेचे प्रतीक आहे. शुभ्ररंग देवीच्या भक्तांना शांती प्रदान करतो आणि देवी त्यांचे रक्षण करेल याची ग्वाही देतो. सप्तमीचा शुभरंग हिरवा आहे.  
 
आठवा दिवस (अष्टमी) - या दिवशी महागौरीच्या रूपात देवीची पुजा केली जाते. महागौरी शांती आणि बुद्धिमत्तेची देवता मानली जाते. शुभरंग मोरपंखी हिरवा आहे, जो आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे.  
 
नववा दिवस (नवमी) - सिद्धीदात्री देवीच्या पूजनाचा हा दिवस आहे. देवी कमळामध्ये विराजमान झालेली आहे. तिला सर्व सिद्धी अवगत असतात. तिची उपासना करणाऱ्या भक्तांना त्या सिद्धी ती प्रदान करते.  
शुभरंग जांभळा आहे जो निसर्गसौदर्याचे प्रतीक आहे.  
 
(माहितीस्त्रोत : - विकिपीडिया )  
नवरात्री उत्सवात देवीची पूजाअर्चा, उपासना केली जाते. दुर्गादेवी सर्व हिंदुधर्मीयासाठी पूजनीय आणि वंदनीय आहे. ती सुखदायीनी, दुःखविनाशिनी आहे. भवसागर पार करून संकटग्रस्त भक्तांना तारणारी आहे. असुरीशक्तीचा विनाश करून, जगामध्ये सभ्यता, सुख आणि शांतीची पुनर्स्थापना करणारी आहे. दिव्य तेजाने ओतप्रोत, अनेक आभूषणे आणि रक्तवर्णी वस्त्रे धारण करणारी, दिव्यस्वरूपिणी आहे. जगतजननी दुर्गा, भक्तांची रक्षणकर्ती देवता आहे. देवीला शक्तीचे रूप  मानून पुजणाऱ्या, तिला सिद्धीदात्री मानून उपासना करणाऱ्या भारत देशात, आजही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, हा मात्र एक मोठा विरोधाभास आहे.