झटपट घटवा, लाइफ़स्टाइल बदला !! (तुम्हीही हलके आणि तुमचे पाकिटही :-) )

तुम्ही सिग्नल ला उभे असता, अचानक कोणीतरी मध्यमवयीन माणूस किंवा किशोरवयीन मुले/मुली पटकन समोर येतात आणि एक व्हिजिटिंग कार्डाच्या आकाराचे पैंप्लेट आपल्या हातात सरकवतात....त्यावर काय असते ?, तर BEFORE आणि AFTER चे २ फोटो आणि  एका बाजूला वजन वाढवा दुसरीकडे वजन घटवा चे १००% रिझल्ट देण्याचे वादे !

तुम्ही टेकडीवर फिरायला जाता किंवा जॉगिंग ट्रॅक वर जाता तेव्हा तिथेही असेच (बहुतांश) किशोरवयीन मुली मुले, एक वजनकाट्यासारखे काहीतरी घेऊन बसलेले दिसतात. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारत असतात - बॉडी अनलिसिस केलंय का सर, फ्री कंसल्टेशन आहे एक १० मिनिट लागतील फक्त.... झालं, त्यानंतर काय होत ? --> चपला बूट काढून तुम्हाला   BMI MACHINE वर उभे करतात, एलेट्रॉनिक सिग्नल तुमच्या बॉडीतून पास होऊन मशीन वर रिडिंग्स येतात ति लिहून घेतली जातात आणि तुम्हाला दुसऱ्या टेबल वर पाठवतात (बहुतेक वेळा शेजारीच असते ते... तिथे तुमच्या रिडींग्स वर डिटेल चर्चा होते, तुम्ही कसे ओव्हरवेट आहात आणि तुमचे आयडिअल वजन किती पाहिजे किंवा नेहमीची ट्रिक म्हणजे तुमचे आताचे वय आणि मशीन ने काढलेलं वय ह्यांतला फरक दाखवला जातो आणि तुम्ही अवाक होता !
अरे मी तर ३० वर्षांचा आहे आणि वय ४८ का दाखवत आहेत -- हिच गेम तुम्ही ओर्थोपेडिक कडे गेलात तरी असते बरं का !! तुमचे वय क्ष आहे आणि तुमच्या हाडांचे वर क्ष्क्ष आहे वगैरे वगैरे !!
असो आता मूळ मुद्द्याकडे येतो, तर झालं असं की मी देखिल अश्याच एका समोरून चालून आलेल्या "फ्री" STUFF मध्ये ट्राय केले, आणि मग हळू हळू त्यातली गंमत माझ्या लक्षात यायला लागली :०  मी फोफश्या, ढेरपोट्या, पेटलु, मोटु, गोलु, ह्या कोणत्याच विशेषणात चपखल बसणारा नाही परंतु तरीही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला मला आवडते, एकतर खाण्यावर प्रचंड प्रेम, त्यामुळे मधून मधून हे असे खाल्लेले दिसायला लागले की मी माझे फंडे सुरू करतो, कधी फेसबुक बंद कर, कधी चहा बंद कर, कधी फक्त आणि फक्त सायकलनेच प्रवास कर(अगदी बार्बेक्यू नेशन च्या पार्टीला सुद्धा मी सायकल ने गेलेलो होतो बरं का) 
 
आणि त्यामुळेच हे असले कात्रणं किंवा चिठ्ठ्या चिटोऱ्या कधी पाहिल्या नव्हता, पण सध्या गेल्या वर्षीपासून नवीन नवीन हॉटेल्स चे पदार्थ ट्राय करणे, त्यात भरपूर आणि लहरी पाऊस,  मग आलेले लॉकडाउन, आणि अता पुन्हा पाऊस ह्यामुळे व्यायाम कमी आणि खाणे जास्त मग वाढता वाढता वाढे च्या हिशेबाने भेदिले शुन्यमंडळा होण्याअगोदरच आम्ही परत लाइनवर यायला तयार... ह्यावेळी मात्र वेगळ्या पद्धतीने अगदी ठरवून सगळे प्रकार समजून घेण्याच्या उद्देशाने आणि फिटनेस मंत्रा च्या ह्या गमती  जमती अजमावण्यासाठीच माझा कार्यक्रम मी सुरू केला आणि मग त्या मोटरसायकल सारखे हैंडल पकडा म्हणणाऱ्या मशीनवर चढलो, वजन ७६ किलो, उंची १६८ सेमी, म्हणजे तुमचे वजन किमान १० ते १४ किलो जास्त आहे ! ( आता हेच वजन मी मागच्या वेळी ७७ वरून ६८ केले होते फक्त थोडे मुखनियंत्रण आणि रोज ५ किलोमीटर पळून पण म्हटलं जुनी रेकॉर्ड कशाला लावा...ऐकूया काय होतं) मग एक मोठा तक्ता माझ्यासमोर नाचवला गेला ज्यात २ मानवी आकृती होत्या, एकात प्रचंड प्रमाणात मेद/फॅट्स आणि दुसऱ्यात एकदम सामान्य बीना प्रॉब्लेम चा इसम होता, कोणत्या कोणत्या भागात चरबी जास्त आहे, कुठे कमी करणे आवश्यक आहे, काय धोकादायक आहे, काय सर्वाधिक धोकादायक आहे त्याचे तोटे वगैरे वगैरे, म्हणजे इन-शॉर्ट "सारी तो खराबीयां है बेटा विरू तुम में फीर भी तुम जिंदा कैसे हो... कुछ करना चाहते हो या नही ? " एवढे मानसिक दडपण आणि हॅमरिंग झाल्यावर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण आपसूकच "हां भाई हां" असे देतो ! आणि मग सुरू होतो खरा खेळ. तुमचा आहार कसा चुकीचा आहे, तुमच्या खाण्याच्या वेळा किती जास्त आहेत, खाण्याची पद्धत कशी बदलली जाईल वगैरे वगैरे. व्यायाम २०% आणि आहात ८०% हे अनेक वर्ष घोटलेले तत्त्वज्ञान पुन्हा घोटून घेतले जाते, आणि सगळ्यात पहिले कात्री लावली जाते ती तुमच्या साखरेवर -- साखर हि कशी अपायकारक आहे हे सर्वांना माहीत आहे तरीही आपण मुलगा पास झाला/मूल झालं/लग्न ठरलं/नोकरी लागली इ इ अनेक सणावारांना साखरेचेच पदार्थ खातो !! अर्थात ते सगळे बंद !
मग मोर्चा वळवला जातो ब्रेकफास्ट कडे, आता तुम्ही ब्रेकफास्ट करूच नका, आमचा अमुक तमुक प्रोटीन शेक प्या... हा शेक सगळे लोक सारखाच विकतात पण मार्केटिंग मात्र खूप वेगळे वेगळे असते, कोणी सांगते प्रोटीन, कोणी म्हणते मल्टिव्हिटामिन, कोणी म्हणतात बैलन्स्ड न्युट्रिशन शेक, आणि कोणी प्रोबायोटिक विटमीन ऍड मिनिरल्स एस्सेन्शियल्स.
जेवणात काय खाता - त्यात कार्ब्स नुसते नकोत, सगळे घ्या पालेभाज्या, पनीर, कॅल्शियम, प्रोटिन्स ! हे एक नवीन फॅड आहे बरं का, म्हणजे प्रोटिन्स नसतील तर तुमचे स्नायू आयुष्यात बळकट होणार नाहीत आणि वजनाएवढे किलोमागे एक ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे आपल्याला ( काळजी नको आमचा शेक आहे ना तो घ्या)
आणि रोज १ तास व्यायाम.... 
ह्या पावडर शेक ची किंमत आहे २५० रुपये दिवसाला. म्हणजे आठवड्याचे १०५० महिन्याचे ७५०० आणि वर्षाचे ९१ हजार - आता तुम्ही म्हणाल एवढा रोज कशाला - तर निम्मे दिवस घेतला असे मानून चालू तरीही होतात ना राव ४५ हजार रुपये वर्षाला !! 
आपल्या इथे स्विमिंग, सौना, आणि पर्सोनल ट्रेनिंग देणाऱ्या चांगल्या जिम ची फी आहे १५ ते २० हजार वर्षाला ! आणि इथे लोकं त्याहीपेक्षा डबल खर्च करतोय   - बरं नुसते खर्च करत नाहीत तर अजून लोकांना जाळ्यात ओढून हे जाळे अजून मोठे करत आहेत !
ह्या पावडरी म्हणजे शतावरी, च्यवनप्राश किंवा गुलकंद सारख्या नाहीत बरं !! ह्या फक्त कंपनीतून बनून येतात आणि त्या फक्त अश्या डिस्ट्रिब्यूटर कडेच मिळतात जे घरोघरी असे हजारो फिटनेस क्लब चालवतात ! आणि हाच ह्या मल्टिलेव्हल मार्केटिंगचा गाभा आहे.
तुम्हाला ऐम-वे, किंवा टपरवेअर आठवतंय का, त्याचंही काहींस आधी असच होतं पण ते काही जास्त चाललं नाही आणि आता त्यांच्या प्रॉडक्ट्स सर्रास बाजारात मिळतात.
तुमच्या मनावर हे खोल ठासवण्याची खुबी असलेला एजंट जिंकतो - की तुमच्या आहाराच्या वेळा ठरवा ( दर ४ तासाने थोडे थोडे ) त्यातल्या एका आहाराच्या ऐवजी शेक प्या, उरलेले ३ आहारातून साखर वगळा आणि आम्ही सांगतो तो ४५ मिनिटांचा व्यायाम करा...
झालंच मग - जाड असाल तर तुम्ही १ ते ४ महिन्यात एकदम सडपातळ होणार, लठ्ठ असाल तर जाड होणार आणि गलेलठ्ठ असाल तर लठ्ठ होणार आणि मग पुढे तुम्ही तुमचे असेच रूटीन सुरू ठेवू शकता किंवा आम्हाला जॉईन होऊ शकता !
म्हणजे तुम्ही ४-५ अजून जाड माणसे आणा म्हणजे तुम्हाला तुमचा शेक अर्ध्या किमतीला बसेल, ९-१० आणलेत तर फुकट बसेल आणि १५ आणलेत तर तुम्ही काहीही न करता वरून पैसे कमावू शकाल. कधीतरी अशीच गंमत म्हणून ह्या फिटनेस-क्लब मध्ये चक्कर टाका... १०० एक BEFORE and AFTER चे फोटो लावलेले दिसत असतात - अनेक लोकं खरोखर TRANSFORM होत असतील हि, पण माझ्या ऑब्झेर्वशन नुसार तुम्हीही हे फोटो नीट बघा, AFTER वाले फोटो थोडे झुम आऊट केलेले असतात  
प्रॉब्लेम इथे नाहिचे !!  धंद्यासाठी काहीही हे सूत्रं तर कलियुगात योग्यच मानले जाते - पण दुसऱ्यांचे गळे कापण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने त्यांचे खिसे कापणे सर्वांत उत्तम आणि अश्या प्रकारे खिसा रिकामा करणारे मासे गळाला लागले तर काही विचारूच नका ! आधी एजंट म्हटलं की खूप राग यायचा त्या माणसाला आणि त्याच्याबद्दल ऐकणाऱ्यालाही पण आता तसे नाही ! त्यामुळे स्वार्थातून परमार्थाच्या वाटेला असे अनेक लोकं लागलेले आहेत, दाखवताना दाखवणार की तुमच्या शरीराची काळजी आम्ही घेतो आणि तुम्हीहि घ्या, फक्त आमची महागडी प्रॉडक्ट्स विकत घ्या, त्याबद्दल बोलत फिरा, लोकांना सांगून त्यांना पण घ्यायला लावा आणि अगदीच झाले तर तुम्ही फिटनेस
गँग मध्ये सामील व्हा :) माझा आक्षेप फक्त महागडी प्रॉडक्ट्स विकण्यावर आहे बाकी काही नाही - जेवण सोडून शेक प्या आणि कमी व्हा ह्यापेक्षा एखादा खरा डायटिशियन तुमच्या रोजच्या आहारातूनच पाहिजे ते मिळवून देऊ शकतो आणि वजन कमी जास्त करू शकतो.
शरीराला फायदा देणारे १२००-१४०० रुपये किलो मिळणारा सुकामेवा (बदाम, अक्रोड, पिस्ते, अंजीर) लोकांना चैन वाटते, आणि हेच लोकं चिझ्बर्स्ट पिझ्हा लार्ज विथ एक्क्ष्र्टा टॉपिंग्स एकाच वेळी मागवून १२०० रुपये सहज उडवतात.
रोजच्या आहारातले तीळ, जवस, भाकरी, दूध, ताक, दही ,(खात असाल तर अंडी) , गूळ, डाळी, सडिचा तांदूळ, रुतु मानानुसार मिळणारी फळे भाज्या आणी उपवास, चातुर्मास, ह्यामागचे पोटातील अग्नीशी निगडित शास्त्रे बाजूला ठेवल्यामुळे मग असे काहीतरी करावे लागते...
३५शी ओलांडल्यावर बी-कॉम्प्लेक्स, व्हिटामीन आणि कॅल्शियम घेतलेच पाहिजे असे आवर्जून सांगणारे लोकं मी पाहिलेत -- 
हे लोकं आत्ता जे कॅप्सुल मधून खातात ते आमच्या शाळेबाहेरच्या गाडीवर २ रुपयांत मिळायचे -- अगदी मागच्याच वर्षी मी पुन्हा एकदा फैक्टचेक केले आणि २ चे आता महागाईनुसार ५-१०-२० झाले आहे पण मिळते हे नक्की  
आपापले बेसिक्स फिक्स करा, कधी खायचे कुठे खायचे आणि किती खायचे ह्याचा ताळेबंद ठेवा .. रोज जेवणत २-३ पोळ्या खात असाल तर एखादिच खा, किंआ भाकरी घ्या त्या ऐवजी ते सगळयात उत्तम. प्लॅस्टिक पॅकिंग मध्ये आलेल्या वस्तू खाण्याचे टाळा (कुरकुरे, चिप्स, केक, चिवडा ,लाडु, चकली वगैरे... )
आणि शक्य तेवढे गरम आणि फ्रेश खा ...प्रत्येक आहारात प्रोटिन, हिरव्या भाज्या आणि कर्बोहायड्रेडस घेणे नक्की करा म्हणजे मग तुम्ही स्वतःच हे सगळे मॅनेज करू शकता आणि वाचलेल्या पैशातून तब्येतीसाठीच उत्तम फळे, ड्राय-फ्रुटस वगैरे घेउ शकता...
(संतुलित आहार - धडा २रा इयत्ता ३ री) आपोआप सगळं नीट होत ! आणि ३री मध्येच हे देखील शिकवलेले होते की नियमित व्यायामाने आरोग्य नीट राहते - ते वाचून अमलांत आणले तरी खूप झालं...  ह्या निमित्ताने तुम्ही जुनी पुस्तके तर उघडाल:) -

शेवटी काय तर - तुझे आहे तुजपाशी..... परी....