चाचणी

चाचणी

"नाही! Plant visit साठी कोविड टेस्ट करावीच लागेल. तसा अध्यादेश आहे वरून.."
Purchase विभाग म्हणेल ती पूर्व दिशा! 
हा आम्हा व्यावसायिकांचा पहिला नियम असल्यामुळे मी फोनवर आहे हे विसरून फक्त मान डोलवली. 
ती बहुदा सवयीने कळल्यामुळे ते पुढे म्हणाले, 
"पत्ता घ्या लिहून, तिथूनच करवून घ्या!"
मी पत्ता नोंदवून घेतला. 
तडफडत पोहोचलो सांगितलेल्या ठिकाणी. 
एक किडकिडीत तरुण मोबाइलवर 
"कामावर जायला..." 
ऐकत होता. 
मला समोर उभे पाहून त्याने,  
"कुठली टेस्ट करायचीय?" असं विचारलं. 
मी अजागळपणे "कोविडची" म्हणालो! 
"त्ये झालं हो, त्यातली कुठली?"
शक्यतो पुरुषाला आपण बावळट दिसलो ह्याहून जास्त त्रास आपण बावळटापुढे बावळट दिसलो ह्याचा होतो. 
ते स्वतः अनुभवलं, फोन करून टेस्टच्या प्रकाराची शहानिशा करून त्या रिक्षावाल्याला मुलाला सांगितली. 
त्याने आधारचे फोटो काढले, काहीतरी टाईप केलं मला "बसा! "
म्हणाला आणि दोन प्लॅस्टिकच्या कांड्या तोंडाला कापूस सदृश काहीतरी, 
नक्की काय ते मी पाहायच्या आत माझ्या नाकात जितके आत जाईल तितके घातले!
हे असे नाकात काही इतक्या खोल जाण्याची माझी पहिलीच वेळ. 
लहानपणी - हवी तिथे न पोहोचल्याने - आपली करंगळी मस्त लांब असती तर... 
ह्या प्रश्नाचे उत्तर देत त्याने माझी आणि त्याची हौस फिटेपर्यंत, ती कांडी फिरवली. 
खिशात उलटा टाकलेला फोन, (त्यामुळे स्पीकर वरती येतात) "वाट माझी बघतोय रिक्षावाला .." करतच होता. 
काडी बाहेर काढून क्षणार्धात सवयीने एका नळीत बंद करून 
मला "ह्म्" करता झाला...
मी "काय???" 
असे विचारण्यासाठी 'क' ला काना देणारे तोंड केले 
तोवर त्याने हातामधली दुसरी कांडी तोंडात घातली. 
नाकावरल्या प्रक्रियेने डोळ्यात पाणी आले होते. नाक शिवशिवत होते, शिंकणार पण होतो 
पण तसे केल्यास माझ्या त्या रिक्षावाल्याला कामावर अजून उशीर होईल म्हणून कसे बसे आवरले, 
तर तेवढ्यात त्याने हे केलं!
कांड्या नळी बंद करून त्याच्या जागेवर जाऊन बसला सुद्धा.. 
मागितल्या प्रमाणे १६०० रुपये टेकवले आणि काही विचारायच्या आत, 
"उद्या ह्या टायमाला या!" म्हणाला, 
शिताफीने फोन काढून परत कामाला लागला.
आता वेळ होती मेडिकल नावाच्या दिव्याची! 
ही प्रक्रिया कंपनीच्या म्हणजे त्यांच्या कंपनीत बसणाऱ्या डॉक्टर कडून करून घ्यायची होती. 
लागणाऱ्या परवानग्या काढल्या.. 
तिथल्या रांगेतून सरकत सरकत फॉर्म भरण्याच्या ठिकाणी आलो. 
इंजिनीअरिंग केलेले असल्याने अर्थातच स्वतःचा पेन वगैरे बाळगणे असल्या भिकार सवयी मला नव्हत्याच. 
अजून एका गाढवाचे पाय धरून त्याच्या पेनने सगळे सोपस्कार पार पाडून अगदी डॉक्टर दिसतील इतक्या जवळ आलो. 
आम्ही चौघे होतो. सगळेच संभ्रमात होतो. 
दोन छिद्रांत काड्या जाऊन आल्या होत्या.. 
आता पुढे काय? अशी काळजी सगळ्यांनाच होती.
आमचा नंबर आला, 
आतमध्ये, चार अगदी छोटे स्टूल ओळीने ठेवले होते. 
पृष्ठभागाच्या (माझ्या) अर्ध्या आकाराचे. मला काही केल्या नीट बसता येईना. कसा बसा सावरून बसे पर्यंत पाठीला दोनदा काहीतरी लागून गेल्याचे कळले. 
हां आता मी नीट बसलो होतो. 
तोवर "झालं!, चला" अशा आवाज वजा ताकिदेने इतर शेजाऱ्यांसह बाहेर आलो देखील. 
मध्ये जे पाठीला लागल्यासारखे झाले ते stethoscope होते आणि 
त्या अगदी क्षणभराच्या स्पर्शाने जगातील सगळ्यात महान वैद्याने मी मेडीकली फिट असल्याच्या कागदावर सही केली. 
मी घोळक्यासोबत बाहेर देखील आलो. 
आता कोविडच्या चाचणीच्या निदानाची वात पाहत बसणे होते. 
दुसऱ्या दिवशी कुतूहलाने आणि थोड्याशा भीतीने परत त्या रिक्षावाल्याकडे गेलो. 
काल ज्या रंगाची पँट त्या रंगाचा आज शर्ट आणि कालच्या शर्टच्या रंगाची पँट घालून आज तो तत्सम दुसरे गाणे ऐकत होता. 
संगणकाच्या स्क्रीनला टेकवला, 
काहीतरी खटपट करून शेवटी दोन बटणे एकदम दाबली. प्रिंटरचा आवाज झाला आणि माझा report छापला गेला. 
टेस्ट निगेटिव्ह होती. 
एरवी एखादा ठसका जरी लागला, 
एखादी शिंक जरी आली 
थोडी धाप जरी लागली 
तर सभोवती घडणाऱ्या साथीच्या भयंकर रोगाची व्याधी आपल्यालाही झाली की काय? 
अशी धाकधूक आता नक्की जाणार होती. 
आता मी कसल्याही भीती शिवाय बिनधास्त खोकू-शिंकू शकणार होतो. 
ह्या वरकरणी अगदी छोट्या वाटणाऱ्या स्वातंत्र्याने देखील मी हुरळून गेलो होतो. 
खात्री करून प्रचंड आनंदाने साहेबाला फोन केला. 
झालं सगळं म्हणालो, तर ते पलीकडून, 
"टाकलाय पास तुमचा, जाल वेळेवर उद्या!"
मी आश्चर्याने विचारले त्यांना, 
"तुम्ही आधीच कसा टाकला पास? निदान तर आता आलं!"
साहेब हसले, अगदी अभिमानाने बोलले, 
"म्हणूनच तिकडे पाठवलं तुम्हाला, त्या सेंटर वर निगेटिव्हच येते टेस्ट! "