|| शुभं भवतु ||

लेखकाला ही भूक लागते
तो काही शब्द छंद
खात नाही

खाता खाता त्यालाही
शब्द लागतात खड्यांसारखे
मग ते बाजूला काढून
तो वाङ्मय प्रकार करतो

उष्टं खरकटं लागलेलं
ते साहित्य
साफसूफ करावं लागतं
वाचकाला घृणा येऊ नये म्हणून

अशाच एका लेखकाला
मी म्हंटलं
" तुमचं बरं आहे
सभा संमेलनं सत्कार परिषदा
यातून पोट भरतं म्हणा.
तुमच्यासाठी पैसा 
केवळ एक साधन आहे "

त्यावर भडकून तो म्हणाला
" घरची चूल पेटवावी लागते
मुलंबाळं बोंबलत फिरतात.
बायको मग साहित्य जाळते
नाहीतर चूल पेटणार कशी ?

तिचंही बरोबर आहे
प्रश्नांची उकल 
तिलाही करायची असते.
मी मात्र त्यावेळी
तिच्या बरोबर नसतो.

ती रागावते रुसते
शेवटी हात टेकते
आणि म्हणते, 
" || शुभं भवतु || "

अरुण ९००४८०८४८६