सत्य व्यास - सध्याच्या हिंदी साहित्यातील एक आश्वासक नाव

चित्रपटकलेचे
भारतातील जनक दादासाहेब फाळके हे कारस्थानी सिद्धांतवादी (conspiracy
theorist) सोडता इतरांना मान्य व्हावे. त्यात मुंबईला ब्रिटिश भारतात
असलेल्या महत्त्वाच्या स्थानाची भर घातली की मुंबईत चित्रपटव्यवसाय का
फोफावला याची संगती सहज लागते. हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक सामाजिक
उलथापालथी घडवल्या. मध्य आणि उत्तर भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या
कुठल्याही सामान्य माणसाला रंगीबेरंगी स्वप्ने दाखवली. आणि एक नवीन हिंदी
भाषा घडवली.

मुळात हिंदी भाषा ही जेमतेम दोनेकशे वर्षे जुनी. अठराव्या
शतकात तेव्हा अस्तित्वात असलेली 'हिंदुस्थानी' बोली (हिंदी अशी काही भाषा
तेव्हा नव्हती) पर्शियन प्रभावाखाली 'उर्दू' नामक अपत्याला जन्म देती झाली.
शतकभरानंतर उर्दू भाषा ही मुस्लीमधर्माशी निगडित असल्याच्या जनसामान्य
समजुतीमुळे हिंदू धर्मीयांनी हिंदुस्थानी बोलीवर (यात खडी बोली, मैथिली,
अवधी, देहलवी अशा अनेक बोली नांदत होत्या) संस्कृतचे कलम केले आणि आजची
हिंदी भाषा अस्तित्वात आली.
हिंदी चित्रपटांनी हिंदी भाषेवर अजून
तऱ्हेतऱ्हेची कलमे केली आणि एक नवीनच टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातली. या
नवभाषेने राष्ट्रीय एकात्मता साधली असे बऱ्याच जणांचे मत आहे. पण या
नवभाषेने मूळच्या हिंदी भाषेतील चार आणे ज्ञान असलेल्यालादेखील आपल्याकडे
अख्खा रुपया आहे अशी झिंग आणायची सोय करून ठेवली.
त्यामुळे हिंदी
साहित्य वाचताना गमतीची गोष्ट होते. चेहरेपट्टी, अंगयष्टी, देहबोली सगळे
घट्ट ओळखीचे, पण व्यक्ती अनोळखी असे काहीसे वाटत राहते. शाळेत शिकताना तर
पुस्तकातली हिंदी आणि चित्रपटातली हिंदी हे दूरचे नातेवाईक असावेत असा दाट
संशय मूळ धरू लागतो. आणि शाळा सुटताच हिंदी भाषा चित्रपटाच्या दावणीला नेऊन
बांधली जाते.
बऱ्याच काळानंतर श्रीलाल शुक्ल यांची राग दरबारी वाचायला
घेतली आणि बाळपणीचा मित्र परतून भेटावा तसा आनंद झाला. उर्दू भाषेतील अदब,
नजाकत इ इ बद्दल बरेच लिहून झाले आहे. पण हिंदी भाषेतही स्वयंभू लोभसपणा
किती आणि कसा आहे याचा पुनरानुभव घेताना मोहरून जायला झाले.
राग दरबारी सुरुवातीपासूनच जखडून ठेवते. सुरुवातीची वाक्ये देण्याचा मोह न आवरता त्यास बळी पडतोः
शहर
का किनारा। उसे छोड़ते ही भारतीय देहात का महासागर शुरू हो जाता था। वहीं
एक ट्रक खड़ा था। उसे देखते ही यकीन हो जाता था, इसका जन्म केवल सड़कों के
साथ बलात्कार करने के लिए हुआ है। जैसे कि सत्य के होते हैं, इस ट्रक के भी
कई पहलू थे। पुलिसवाले उसे एक ओर से देखकर कह सकते थे कि वह सड़क के बीच
में खड़ा है, दूसरी ओर से देखकर ड्राइवर कह सकता था कि वह सड़क के किनारे
पर है।

सुरुवातच अशी पकड घेते की नंतर त्या पकडीतून सुटायचा विचारही
करवत नाही. ही कादंबरी चोख ५३ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली. पण त्यातील
खोचक बोचक टीका आजही नित्यनूतन या पदवीला सहज पात्र होते.
साधारण मध्यावर पोचल्यावर कादंबरी लेखकाच्या हातून सुटते की काय अशी धास्ती दोनेक पाने वाटते, पण परत सूर जुळतात.
अखेर कादंबरी अटळपणे संपतेच.

अवांतर - याच लेखकाची 'बिसरामपूर का संत' ही कादंबरी मात्र धापा टाकत कशीबशी पूर्ण करावी लागते.

मग सध्याच्या हिंदी लेखकांचा शोध घेताना
सत्य व्यास या लेखकाचा शोध लागला. शिक्षणाने वकील असलेला हा लेखक सध्याच्या
हिंदी साहित्यजगतात 'नयीवाली हिंदी' भाषेतला अग्रगण्य साहित्यिक गणला जातो
हे कळाले.
'दिल्ली दरबार' ही कादंबरी पहिल्यांदा वाचली. झारखंडमधील
टाटानगर येथून दिल्लीला पुढच्या शिक्षणासाठी (MBA साठी) आलेली दोन मुले.
एका बरसातीमध्ये भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यातला एक सैन्यदलात
जाण्याचीही तयारी करतो आहे. साधारण दहाएक वर्षांपूर्वी घडलेली ही कादंबरी.
यात दिल्ली मेट्रो आहे, मॉल्स आहेत, ड्रग पार्ट्या आहेत, इंटरनेट आधारित
फसवणुकी आहेत आणि आपल्या मुलीसाठी नियमांची ऐशीतैशी करणारे बाबूलोक आहेत.
थोडक्यात, कालावधी अगदीच आत्ताचा आहे.
झारखंडमध्ये बोलली जाणारी हिंदी थोडी वेगळी आणि तरीही लोभसवाणी आहे.
सुरुवातीची वाक्ये देण्याचा मोह न आवरता त्यास बळी पडतोः
उस
रोज दो घटनाएँ हुई थीं। दिन में मुहल्ले वालों ने शुक्ला जी की टीवी पर
रामायण देखा था और रात में महाभारत हो गया था। दिन में सीता जी अपनी कुटिया
से गायब हुई थीं और रात में गीता जी (शुक्ला जी की बेटी) अपनी खटिया से।
सीता जी जब गायब हुई थीं तो रावण के पुष्पक विमान पर नजर आईं। गीता जी जब
गायब हुईं तो पुजारी जी के मचान पर नजर आईं। रावण ने सीताहरण में बल प्रयोग
किया था। पुजारी जी के बेटे देवदत्त मिश्रा ने गीतावरण में लव प्रयोग किया
था। सीता जी को पुष्पक विमान पर जटायु ने देखा था और उन्हें बचाने की
भरपूर कोशिश की थी। गीताजी को पुजारी के मचान पर जटाशंकर चाचा ने देख लिया
था और बात फैलाने में कोई कोताही नहीं की थी।
कथानायक दिल्लीला आल्यावर
त्यात दिल्लीच्या स्वतःच्या अशा बोलीची भर पडते. त्यात यांचा घरमालक म्हणजे
राजस्थानातून येऊन दिल्लीला स्थायिक झालेला, त्यामुळे त्याच्या बोलण्यात
राजस्थानी छबीही उमटते.
भाषेचा लोभसपणा सोडला तरी कथानकही मनोरंजक
पद्धतीने पुढे सरकते. काही काही संवाद तर इतके चटकदार आहेत की वाचल्यावर
'ही कला नव्हे, कुसर खरी, पण इतकी मोहक कुसर करण्याची ऊर्मी येते तरी
कुठून' असा 'हे सर्व कोठून येते' छाप प्रश्न उमटल्याशिवाय राहत नाही.

एक
वानवळा. कथानायक आणि नायिका यांच्यात तणावग्रस्त परिस्थिती. दोघेही मेट्रो
स्टेशनबाहेर उभे. निवेदक तिकिट काढतो आहे. तेवढ्यात या दोघांमधील तणावाची
कल्पना येऊन कुणी तिसराच "Is there any problem?" असे विचारायला उपटतो.
कथानायकाची प्रतिक्रिया "हाँ, प्रॉबलम है। इसकी स्कूटी लेकर पपीता लाने गया था। पंचर हो गई है। साट देगा (बसवून/दुरुस्त करून देतोस?"

तेवढ्यात
निवेदक तिथे पोहोचतो आणि परिस्थिती सांभाळतो "नहीं, शक्तिमान। सब ठीक है।
चकबंदी (
जमिनीच्या मालकीहक्कावरून होणारा विवाद) का झगड़ा है; लेकिन अंडर
कंट्रोल है। आप रॉकेट बन जाइए
।"
अवांतर - बाकी सध्याची पिढी असले खटकेबाज संवाद
लिहिण्यात पटाईत आहे. 'बरेली की बर्फी' या चित्रपटातही "भईया, ये तो आस्तीन
का ऍनाकोंडा निकला" असे झणकेदार संवाद आहेत.
परतून 'दिल्ली दरबार'कडे.
एकंदर कथानक नंतरनंतर सरधोपट होत जाते, उत्कंठा अशी राहत नाही. पण म्हणून
'आता बास' असेही वाटत नाही. नंतर लिखाणही फार ताणलेले नाही. थोडक्यात
सोक्षमोक्ष लावला आहे.

ही कादंबरी वाचली, त्याबद्दल इतरांना भरभरून सांगितले, परत एकदा वाचली आणि याच लेखकाची 'बनारस टॉकीज' ही दुसरी कादंबरी हाती घेतली.

इथे
एक वेगळेच रसायन जमवले आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इथे LLB करायला
आलेला निवेदक-नायक ('दिल्ली दरबार'मध्ये दोघे वेगवेगळे आहेत) आणि त्याचा
गोतावळा. त्यांची ओळखही खास 'इष्टूडेंट इष्टाईल'मध्ये केलेली. इथल्या लॉ
कॉलेजच्या होस्टेलचे नाव 'भगवानदास होस्टेल'.

"ये हैं ‘जयवर्धन जी।
लेक्चर, घंटा। लेक्चरर, घंटा। भगवान, घंटा। भगवानदास, घंटा। सबकुछ घंटे पर
रखने के बावजूद, इतने नंबर तो ले ही आते हैं कि पढ़ाकुओं और प्रोफेसरों की
आँख की किरकिरी बने रहते हैं। गलत कहते हैं कहनेवाले कि दुनिया किसी
त्रिशूल पर टिकी है। यह दरअसल, जयवर्धन शर्मा के ‘घंटे पर टिकी है; और वो
खुद अपनी कहावतों पर टिके हैं। हर बहस की शुरुआत और अंत एक कहावत के साथ कर
सकते हैं।"

""आगे बढ़िए तो रूम नंबर-79 से धुआँ निकलता दिखाई देगा। अरे
भाई, डरिए मत! आग नहीं लगा है। भगवानदास के एकमात्र विदेशी छात्र ‘अनुराग
डे फूँक रहे होंगे। अब ये ‘विदेशी ऐसे हैं कि इनके पुरखे बाँग्लादेशी थे;
लेकिन अब दो पुश्तों से मुगलसराय में पेशेवर हैं। अरे! पेशेवर मतलब पेशेवर
वकील बाउ साहब! आप भी उल्टा दिमाग दौड़ाने लगते हैं!"

दोन मासले पुरेत!

कादंबरी साधारण पंधरा वर्षांपूर्वी घडते. २००६ साली काशीत झालेले बॉंबस्फोट कथानकात महत्त्वाची जागा पटकावून आहेत.
दोन्ही
कादंबऱ्या तसे म्हटले तर रोमकॉम (रोमँटिक कॉमेडी) अंगाच्या आहेत. पण
त्यांच्यावर तसा शिक्का मारणे हे अतिसुलभीकरण आणि/वा सत्यापलाप ठरेल.
राजकीय-सामाजिक घटनांबद्दल ठाम/दुराग्रही  मते न मांडताही सजगता दाखवणे हे
एक बलस्थान. हिंदी भाषेच्या अंगभूत
सौंदर्याला सौम्यपणे खुलवत कथानक पुढे नेणे हे दुसरे. अर्थात शेवट कसा
गोग्गोड होतो हा कोलायटिसग्रस्त समीक्षकांचा नेहमीचा आक्षेप
घेतला जाऊच शकतो, आणि शेवट कडू/तिखट असेल तरच कलाकृती चांगली असे कुठल्या
समीक्षाशास्त्रात लिहिले आहे ते दाखवा असे त्याला उत्तरही तयारच असते.
त्यामुळे त्यात पडूया नको.
शेवटी मला जाणवले ते असे - शरद जोशी वा श्रीलाल शुक्ल यांच्यानंतर हिंदी साहित्य असे वाचणे झाले नव्हते. ते झाले, आणि सुखद आश्चर्याचा धक्का देणारे झाले. याच लेखकाची अजून दोन पुस्तके आहेत, चौरासी (८४) आणि बागी बलिया. म्हणजे अजून काही वाचण्याजोगे शिल्लक आहे (असे वाटते).
त्यातले चौरासी हे १९८४च्या दिल्ली दंगलींवर आधारित आहे आणि बागी बलिया हे विद्यार्थी राजकारणावर. असे लेखकाची वेबसाईट सांगते. स्वतःची अद्ययावत वेबसाईट असलेला लेखक ही माझ्या पिढीला तरी नाविन्याचीच गोष्ट.