सारखी

सारखी भेटीस जाते कागदाच्या 
वेदना धाकात नाही काळजाच्या

एक ओळीचीच आहे गोष्ट माझी
नायिका नशिबात नाही नायकाच्या

दार त्याचे तोडणे तर भाग आहे 
हरवल्या आहेत जर चाव्या मनाच्या
 
मी जगासाठी भलेही एक बेघर
राहतो हृदयात एका चेहऱ्याच्या

शेवटी आयुष्य म्हणजे देत जाणे
नित्यनेमाने परीक्षा संयमाच्या

तो कधी दिसलाच नाही पंचक्रोशी
गाव हे गावीच नाही पावसाच्या

....

(जयंत कुळकर्णी)