ऋणानुबंध

"फार लाडावून ठेवलं आहेस बाई तू सगळ्यांना", सासूबाई थोड्या वैतागलेल्या होत्या सुनीतावर.
" किती सुट्ट्या झाल्या वसुधाच्या, पोळीवाल्या सुरेखाच्या"
"अहो आई, खरंच अडचणी होत्या त्यांच्या घरी, नाहीतर मागत नाहीत त्या सुट्ट्या", तिने समजावले.

"आणि वरून परत पैसे हवेच असतात नेहमी"
सुनीताने ऐकून न ऐकल्यासारखं केलं
-------------------------------------------
"हा तुमचा 3 महिन्यांचा पगार, वसुधा मावशी", सुनीताने 1 तारखेला नोटा त्यांच्या हातात ठेवत म्हटले.
"ह्या महिन्यापासून तुम्हाला पगार देणे नाही जमणार, ह्यांची नोकरी अजून सुरू झाली नाहीये"

वसुधा मावशींनी थोडं आश्चर्याने बघितलं सुनीताकडे. तिलाही थोडं अवघड झालं.

"ताई पैसे देणं जमणार नसेल तरी चालेल, पण कामावरून नका काढू"
"अहो मावशी, खरंच अडचण आहे"

"ताई, पैशासाठी काम नाय करत तुमच्याकडे. आज 5 वर्ष झालीत, तुम्ही सगळे हट्ट पुरवता आमचे. एवढे लाड तर आमचे मालक पण नाही करत. सणाला गोडधोड, बोनस, नवीन कपडे सगळ्यात आधी तुम्ही देता. कधीच घालून पाडून बोलत नाही. शक्य नसेल तरी 8-10 दिवस भर पगारी नेहमीच सुट्टी देता."

"अहो सगळेच देतात की, त्यात काय एवढं", सुनीताने लगेच म्हटलं

"ते काय नका सांगू ताई, सायबाना आज न उदया नोकरी भेटेलच, तवा पैसे दया" असं म्हणून वसुधा ताई निघून गेल्या.

सासूबाईंना हे अनपेक्षित होतं.
-----------------------------------------
संध्याकाळी निखिल आणि सुनीता घरातील कामे आटपून जरा निवांत बातम्या बघत बसले होते. तेवढ्यात बेल वाजली.

"आई आल्या असतील. मी त्यांना दूधवाला, पेपरवाला, वाणी सगळ्यांचे पैसे देऊन पाठवलं होतं, ह्या महिन्यापासून नको असं सांगायला. आपल्याला काही महिने तरी काटकसर करावी लागेल ना पण बाकीच्यांचे पैसे देऊन टाकले की डोक्याला त्रास नको उधारीचा"

सासूबाई जरा दमल्या होत्या. सुनीताने पाणी आणून दिलं ते प्यायल्यावर त्यांनी पेला खाली ठेवला आणि म्हणाल्या,
"हरले मी सूनबाई तुझ्यापुढे"

निखिल आणि सुनीता थोडे आश्चर्यानं बघू लागले तश्या सासूबाई पुढे म्हणाल्या,

"दुपारी ती वसुधा पैसे न घेताच गेली. पोळीवाली सुरेखा सुट्टीवर आहे म्हणून घरी गेले तर तिनंही पैसे घ्यायला नकार दिला. वसुधा सांगून गेली असेल नक्की"

"आता ह्या दोघी झाल्या तर बाकीचे तर घेतील म्हणून गेले तर पेपरवाला, दूधवाला, अगदी किराणा दुकानवाला सुद्धा पैसे घ्यायला तयार नाही"

"सुनीताबाई नेहमी वेळेवर पैसे देतात, कधीच त्रास झाला नाही, कधी वाकडा शब्द नाही, आपुलकीने वागवतात, अनेकांच्या पैशाच्या अडचणी होत्या तेव्हा सुनीता ताईंनी मदत केलीय हे आम्हाला माहितेय. आता थोडे दिवस आम्हाला पण परतफेड करू दे की असेच सगळे म्हणत आहेत"

"सासरचे नाव मोठे केलेस पोरी" असं म्हणून सासूबाईंनी सुनीताच्या डोक्यावर हात ठेवून मनापासून आशीर्वाद दिला.

सुनीताचे डोळे अश्रूंनी भिजले होते, आई वडिलांचे शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत होते

"पोरी, सासरच्या नावाने ओळख मिळव, अभिमान वाटला पाहिजे सासरच्यांना तुझा"