सप्टेंबर २१ २००५

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा!

ह्यासोबत

              ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

काही महिन्यांपूर्वी माहितीजालावर खालील संकेतस्थळ पाहिले.
http://groups.yahoo.com/group/gajananshegaondevoteeclub/ 
ह्यामध्ये श्री.ज्ञानदेवांच्या हरिपाठावर निरूपण वाचले होते. मनोगतच्या सभासदांना आणि वाचकांना ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील विचारांची / तत्त्वज्ञानाची ओळख व्हावी असा विचार मनात आला होता. विनायक, मंदार आणि श्रावणी ह्या मनोगतींचे प्रोत्साहन, प्रशासकांची अनुमती आणि माझ्या सद्गुरूचे आशीर्वाद ह्या त्रिवेणीसंगमातून माझ्या मनीची मनीषा  आता मनोगतवर प्रगट होवू इच्छीत आहे.आपल्यासारख्या सुजाण वाचकांचा आणि रसिकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

मानवी जीवनात "मी आणि माझे सुख" ह्या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. पण बहुतेक वेळा ह्या दोन्ही गोष्टी काल्पनिकच असतात."सर्व दुःखाचे कारण। हे तो कल्पनाची केवळ॥ तिचे केलिया निर्मूलन।मोक्ष असे आयता॥ हा तुकाराम महाराजांचा अभंग मार्गदर्शकच ठरतो. देहभावावरच माणसाचा प्रपंच आणि जीवन सुरु असते. देहभावाचे मूळ म्हणजे स्वस्वरूपाबद्दलचे अज्ञान व तेच सर्व दुःखाला कारण आहे. "दे आणि हवं" ह्यामध्ये  माणसाच्या स्मरणातून "देव" दूर जात चालला. माणसाचे अज्ञान दूर करून त्याच्या स्मरणात देवाची स्थापना करणे हेच संतांचे ध्येय असते.

बद्धाचे विषयसुख किंवा सिद्धाचे मुक्तिसुख ह्यांच्या पलिकडे असलेले भक्तिसुख संतांनी आपलेसे केले. जीवनात कृतकृत्यतेची भावना निर्माण होणे हा खरा भगवंताच्या नामस्मरणाचा अनुभव आहे.नामांत राहणे हेच खरे गुरू आज्ञापालन होय. जो नामाच्या संगतीत राहतो त्याच्या मनांत भगवंताशिवाय वृत्तीच उठत नाही.त्याला वृत्तीचा निरोध करण्याचे कष्ट पडत नाहीत.

 मानवाच्या जीवनात चिंतनालाही  तितकेच महत्त्व आहे. जसे चिंतन तसे जीवन हे आपल्याला ज्ञात आहेच. चिंतनाचा पाया आहे स्मरण. म्हणूनच स्मरण सुधारणे हीच खरी संस्कृती, हीच खरी सुधारणा आणि हेच परमार्थाचे वर्म आहे.

हरिपाठ म्हणजे संतरचित एक लहानसा अभंगसंग्रह. त्या अभंगांमध्ये भगवंताच्या प्राप्तीचे साधन म्हणून नामस्मरणाचे वर्णन केलेले असते. भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताचे अनुसंधान कसे ठेवता येते आणि त्या अनुसंधानाचे पर्यवसन भगवंताच्या दर्शनात कसे घडून येते याची रुपरेखा हरिपाठात मिळते. वेदांताची परिणिती  " अहंब्रह्मास्मि" चा नारा लावण्यात होते. तर संत "नामस्मरण"चा घोष करतात.

मला वाटते नामस्मरण म्हणजे " ना अहम्"स्मरण. ह्याचाच अर्थ "जो आहे त्याचे स्मरण"म्हणजेच "नामीचे स्मरण"! कारण नुसताच शब्द पाहिला तर हरिपाठात ज्ञानदेवांनी कुठेही " विठ्ठल" ह्या नामाचा उल्लेख केला नाही. पण त्यांचेच सद्गुरु श्री. निवृत्तीनाथ ह्यांच्या हरिपाठात मात्र विठ्ठल नामाचा उल्लेख येतो.
"ध्यान धरा विश्रांती नामाची। विठ्ठलींच साची मनोवृत्ति॥" किंवा " निवृत्ती समता विठ्ठल कीर्तन। करिता अनुदिन मन मेळे॥"  ह्या  निवृत्तिनाथांच्या हरिपाठातील ओव्या हेच दर्शवितात. तुकाराम महाराजांच्या अभंगातून तर राम,कृष्ण,हरी,विठ्ठल अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. म्हणूनच नामस्मरणात अनुसंधानाला फार महत्त्व दिले आहे. किंबहुना तेच अपेक्षित आहे.

ज्ञानदेवांच्या हरिपाठावर लिहितांना मी काही ग्रंथांचा आधार घेतला आहे.

मुख्य आधार.. ज्ञानेशांचा संदेश..सद्गुरु श्री.वामनराव पै.

संदर्भ ग्रंथ.. १‌. श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ.. के.वि.बेलसरे
             २. हरिमुखे म्हणा.. कौसल्या गोरे

"रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडी तू अवगुणु रे भ्रमरा ॥" असे जरी श्री.ज्ञानेश्वरांनी एका अभंगातून सांगितले असले तरी माझी ही भ्रमरवृत्ती मात्र अवगुणु न ठरता लाभदायकच ठरो. माझ्यातील साधकवृत्ती अधिक उजळून निघावी हिच मनिषा आहे. त्याच बरोबर वाचकांच्या मनात नामाबद्दल गोडी निर्माण होवून त्यांनाही नामाचा छंद लागावा हिच अपेक्षा आहे. जेणेकरून " असा धरी छंद । जाई तुटोनिया भवबंध॥" ही अनुभूति सर्वांना येवून " सर्व सुखी सर्व भूती। संपूर्ण होईजे॥" हे ज्ञानदेवांचे पसायदान सफल होईल.

धन्यवाद!

 

 

 

 

Post to Feedअतिशय सुंदर!
शुभेच्छा!
उत्तम
सात्विक
छान/शुभेच्छा

Typing help hide