पहिला अध्याय

[१]


धृतराष्ट्र म्हणाला


त्या पवित्र कुरू-क्षेत्री पांडूचे आणि आमुचे ।
युध्दार्थ जमले तेंव्हा वर्तले काय संजया ॥ १ ॥


संजय म्हणाला


पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे ।
मग गेला गुरूपाशी त्यांस हे वाक्य बोलिला ॥ २॥


गुरूजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज ।
विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे ॥ ३ ॥


ह्यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुनासम ।
महा-रथी तो द्रुपद विराट-नृप सात्यकि ॥ ४ ॥


धृष्टकेतु तसा शूर काश्य तो चेकितान हि ।
पुरूजित कुंतिभोजीय आणि शैब्य नरोत्तम ॥ ५ ॥


उत्तमौजा हि तो वीर युधामन्यु हि विक्रमी ।
सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महा-रथी ॥ ६॥


आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक ।
सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण ॥ ७ ॥


स्वतां आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्ण तो ।
अश्वत्थामा सौमदत्ति जयद्रथ विकर्ण हि ॥ ८ ॥


अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया ।
सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे ॥ ९ ॥


अफाट आमुचे सैन्य भीष्मांनी रक्षिले असे ।
मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे ॥ १० ॥


राहूनि आपुल्या स्थानी जेथे ज्यास नियोजिले ।
चहूंकडूनि भीष्मांस रक्षाल सगळेजण ॥ ११ ॥


हर्षवीत चि तो त्यास सिंह-नाद करूनिया ।
प्रतापी वृद्ध भीष्मांनी मोठ्याने शंख फुंकिला ॥ १२ ॥


तत्क्षणी शंखभैर्यादि रणवाद्ये विचित्र चि ।
एकत्र झडली तेंव्हा झाला शब्द भयंकर ॥ १३ ॥


इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी ।
माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले ॥ १४ ॥


पांच-जन्य हृषिकेशे देव-दत्त धनंजये ।
पौंड्र तो फुंकिला भीमे महाशंख महा-बळे ॥ १५ ॥


तेंव्हा अनंत-विजय धर्मराज युधिष्ठीरे ।
नकुळे सहदेवे हि सुघोष मणि-पुष्पक ॥ १६ ॥


मग काश्य धनुर्धारी शिखंडी हि महा-रथी ।
विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकि ॥ १७ ॥


राजा द्रुपद सौभद्र द्रौपदीचे हि पुत्र ते ।
सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेगवेगळे ॥ १८ ॥


त्या घोषे कौरवांची तो हृदये चि विदारिली ।
भरूनि भूमि आकाश गाजला तो भयंकर ॥ १९ ॥


मग नीट उभे सारे पुन्हा कौरव राहिले ।
चालणार पुढे शस्त्रे इतुक्यात कपि-ध्वज ॥ २० ॥
हाती धनुष्य घेउनि बोले कृष्णास वाक्य हे ।


अर्जुन म्हणाला


दोन्ही सैन्यामधे कृष्णा माझा रथ उभा करी ॥ २१ ॥


म्हणजे कोण पाहीन राखिती युद्धकामना ।
आज ह्या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज ॥ २२ ॥


झुंजते वीर ते सारे घेतो पाहूनि येथ मी ।
युद्धी त्या हत-बुद्धींचे ज करू पाहती प्रिय ॥ २३ ॥


संजय म्हणाला


अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकूनि शीघ्र चि ।
दोन्ही सैन्यांमधे केला उभा उत्तम तो रथ ॥ २४ ॥


मग लक्षूनिया नीट भीष्म द्रोण नृपास तो ।
म्हणे हे जमले पार्था पहा कौरव सर्व तू ॥ २५ ॥


तेथ अर्जुन तो पाहे उभे सारे व्यवस्थित ।
आजे काके तसे मामे सासरे सोयरे सखे ॥ २६ ॥
गुरुबंधु मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे ।


असे पाहूनि तो सारे सज्ज बांधव आपुले ।
अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला ॥ २७ ॥


[२]


अर्जुन म्हणाला


कृष्णा स्व-जन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी ।
गात्रे चि गळती माझी होतसे तोंड कोरडॅ ॥ २८ ॥


शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती ।
गांडीव न टिके हाती सगळी जळते त्वचा ॥ २९ ॥


न शके चि उभा राहू मन हे भ्रमले जसे ।। ३० ॥


कृष्णा मी पाहतो सारी विपरित चि लक्षणे ।
कल्याण न दिसे युद्धी स्व-जनांस वधूनिया ॥ ३१ ॥


नको जय नको राज्य नकोत मज ती सुखे ।
राज्य भोगे मिळे काय किंवा काय जगूनि हि ॥ ३२ ॥


ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हि ती ।
सजले ते चि युद्धास धना-प्राणास सोडुनी ॥ ३३ ॥


आजे बाप मुले नातू आमुचे दिसती इथे ।
सासरे मेहुणे मामे संबंधी आणि हे गुरू ॥ ३४ ॥


न मारू इच्छितो ह्यांस मारितील जरी मज ।
विश्व-साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाड तो किती ॥ ३५ ॥


ह्या कौरवांस मारूनि कायसे आमुचे प्रिय ।
अत्याचारी जरी झाले ह्यांस मारूनि पाप चि ॥ ३६ ॥


म्हणूनि घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हे चि तो ।
आम्ही स्व-जन मारूनि सुखी व्हावे कसे बरे ॥ ३७ ॥


लोभाने नासली बुद्धि त्यामुळे हे न पाहती ।
मित्र-द्रोही कसे पाप काय दोष कुल-क्षयी ॥ ३८ ॥


परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये ।
कुल-क्षयी महा-दोष कृष्णा उघड पाहता ॥ ३९ ॥


कुल-क्षये लया जाती कुल-धर्म सनातन ।
धर्म-नाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग ॥ ४०॥ 


अधर्म माजतो तेंव्हा भ्रष्ट होती कुल-स्त्रिया ।
स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण-संकर ॥ ४१ ॥


संकरे नरका जाय कुलघ्नांसह ते कुळ ।
पितरांचा अधःपात होतसे श्राद्ध लोपुनी ॥ ४२ ॥


ह्या दोषांनी कुलघ्नांच्या होऊनी वर्ण-संकर ।
जातींचे बुडती धर्म कुळाचे हि सनातन ॥ ४३ ॥


ज्यांनी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित ।
नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे ॥ ४४ ॥


अरेरे केवढे पाप आम्ही आरंभिले असे ।
लोभे राज्य-सुखासाठी मारावे स्व-जनांस जे ॥ ४५ ॥


त्याहुनि शस्त्र सोडूनि उगा राहीन ते बरे ।
मारोत मग हे युद्धी शस्त्रांनी मज कौरव ॥ ४६ ॥


संजय म्हणाला


असे रणात बोलूनि शोकावेगात अर्जुन ।
धनुष्य-बाण टाकूनि रथी बैसूनि राहिला ॥ ४७ ॥


अध्याय पहिला संपूर्ण