कोलंबी भात.

  • कोलंबी १/२ किलो
  • तांदूळ २ वाट्या
  • काळे मिरे १० नग
  • लवंगा १० नग
  • दालचिनी २"
  • हिरवी वेलची ६ नग
  • जीरे २ टी स्पून
  • धणे १ टेबल स्पून
  • बडीशोप १ टेबलस्पून
  • बाद्यान १ फूल
  • आलं-लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  • तिखट १ टी स्पून
  • हळद १/२ टी स्पून
  • मीठ चवीनुसार
  • तेल १/४ वाटी
  • दही १/२ वाटी
  • कोथिंबीर मुठभर
  • साजूक तुप १/२ वाटी
१ तास
चौघा कोलंबी प्रेमींसाठी

मध्यम आकाराची ताजी कोलंबी आणून सोलावी. पाठीवर एक बारीक चीर देऊन आतला धागा काढून टाकावा.

कोलंबीला हळद आणि चवीनुसार मीठ लावून बाजूला ठेवून द्यावे.

तांदूळ पाण्यात भिजत ठेवावेत.

काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, जिरे, धणे, बडीशोप आणि बाद्यान कोरडे हलके भाजून घ्यावे. थंड झाले की मिक्सरमधून ग्राईंड करून त्याची वस्त्रगाळ पूड करून घ्यावी. बाजूला ठेवावी.

तांदुळातील पाणी काढून निथळवून घ्यावेत.

जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून तापवावे. तेल तापले की हळद-मीठ लावून ठेवलेली कोलंबी टाकून मंद आंचेवर किंचित परतून घ्यावी. त्यात पाणी निथळवून टाकलेले तांदूळ घालून हलक्या हाताने परतावे. (तांदूळ मोडता कामा नये.) आलं-लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, कोथिंबीर आणि चवी पुरते मीठ टाकून परतावे.

३-१/२ वाट्या पाणी आणि अर्धी वाटी दही (फेटून) घालून सर्व हलक्या हाताने मिसळून घ्यावे. वाफ बाहेर जाणार नाही असे मापाचे झाकण ठेवून वर वजन ठेवावे.

मध्यम आंचेवर एक उकळी आणून गॅस एकदम बारीक करून कोलंबी भात शिजवावा.

पाणी आटत आले की एकदा हलक्या हाताने भात मोकळा करून वरतून साजुक तूप पसरवून घालावे आणि पुन्हा झाकण ठेवून भात पूर्ण शिजवून घ्यावा.

भात टेबलवर घेताना पुन्हा वरून कोथिंबीर भुरभुरावी.

जेवताना कोलंबी भातावर लिंबू पिळायला विसरू नये.

शुभेच्छा.....!

सोबत सोलकढी असेल तर व्वाऽऽऽ रे व्वाऽऽऽ!