दाल फ्राय

  • मसूर डाळ १ वाटी
  • आलं १ इंच
  • हळद अर्धा चमचा
  • कांदा १ मध्यम
  • टोमॅटो अर्धा
  • लसूण ४ पाकळ्या
  • टोमॅटो प्युरी २ टेबलस्पून
  • जीरे १ टी स्पून
  • कसूरी मेथी अर्धा टी स्पून - ऐच्छिक
  • तेल पाव वाटी
  • तिखट १ टी स्पून सपाट
  • काश्मिरी मिरच्या २
  • कोथिंबीर १ टेबलस्पून
  • धण्याची पावडर १ टी स्पून
  • मीठ चवीनुसार
४५ मिनिटे
चौघांसाठी...

मसूर डाळ पाणी घालून शिजायला ठेवा. पाणी इतकेच घालायचे की डाळ शिजल्यावर ती घट्टसरच राहील.
आल्याचे काड्यापेटीतल्या काडी सारखे तुकडे करून डाळीत घालावे.
हळद घालावी.

कांद्याचे उभे दोन भाग करून, कांदा पातळ, उभा चिरावा.
टोमॅटो बारीक, चौकोनी कापावा.
लसूण बारीक, चौकोनी चिरावा.
कोथिंबीर चिरून घ्यावी.

मसूर डाळ शिजून मोडायला लागली की डावाने घोटून घ्यावी. साध्या वरणासारखी एकजीव झाली नाही तरी बऱ्यापैकी दाट आणि एकजीव होते.

दुसऱ्या पातेल्यात, मध्यम आंचेवर, तेल तापवावे. तेल तापले की जिरे घालावे. जिरे तडतडले आणि लाल झाले की लसूण घालावा आणि लालसर रंगावर परतून घ्यावा. लसूण लाल झाला की काश्मिरी मिरच्या २-३ तुकडे करून त्यात घालाव्यात.  नंतर त्यावर कांदा घालून परतावे. कांदा गुलबट रंगावर आला की टोमॅटो, टोमॅटो प्युरी, लाल तिखट, धण्याची पावडर, कसूरी मेथी पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे. अर्धी वाटी पाणी घालून सर्व मिश्रण परतावे. पाणी आटून तेल तरंगू लागले की शिजवलेली मसूराची डाळ वरून घालावी आणि सर्व मिसळावे. 
डाळ घट्टसरच असावी. डावाने वाढता यावी पण आमटी इतकी पातळ नसावी.

वरून कोथिंबीर भुरभुरून सुशोभित करावी.

शुभेच्छा....!

नाहीत.