मटका चिकन रोस्ट

  • चिकन लेग पिसेस - ८ मध्यम आकाराचे.
  • २ लिंबांचा रस, १ चमचा व्हिनीगर, १ वाटी आंबट दही.
  • २ चमचे तंदूर मसाला किंवा नसल्यास चांगल्या प्रतीचा चिकन मसाला.
  • २ चमचे (चहाचे) धणेपूड व २ चमचे (चहाचे) जिरें.
  • ३ इंच आले व १ मोठा गड्डा (२० पाकळ्या) लसूण एकत्र वाटून.
  • २ चमचे तिखट, चवीनूसार मीठ, खाण्याचा लाल रंग चिमूटभर
२ तास
४ जणांसाठी

थंडी पडायला सुरुवात झाली की 'बार्बीक्यू' वा तत्सम पार्ट्यांचे कार्यक्रम ठरतात- नेहमी एकाच पद्धतीचे "चिकन तंदूर" खाऊन कंटाळा येत असणाऱ्या खवय्यांसाठी थोडी अधिक मेहनत घेतल्यास एक वेगळी "चिकन तंदुरी" बनवता येऊ शकेल.
हा खाद्यपदार्थ बनवताना दोघांनी (पतिपत्नी) मेहनत घेतल्यास त्याची लज्जत वाढते हा स्वानुभव आहे.

इतर तयारी करण्यापूर्वी एक छोटे मटके, हार्डवेअरच्या दुकानांतून बारीक तार व भरपूर केळीची पाने घरी आणून ठेवावीत.  

ह्या पद्धतीने चिकन रात्री बनवायचे असल्यास तयारी सकाळीच- १२ तास आधी करून ठेवावी. दिवसा करावयाचे झाल्यास तयारी एक रात्र आधीच करून घ्यावी.

  1. चिकन लेग पीस चांगले स्वच्छ धुऊन कोरडे होईपर्यंत निथळू द्यावेत.
  2. कोरडे झाल्यावर त्यावर धारदार सुरीने उभ्या चिरा पाडून घ्याव्यात.
  3. त्यावर लिंबाचा रस व मीठ* व्यवस्थित सर्वबाजूंनी चोळून अर्धा तास ठेवावे.
  4. धणेजिरे एकत्र चांगले भाजून त्याची बारीक पूड करून घ्यावी.
  5. धणेजिऱ्याची पूड, लाल तिखट, खायचा रंग, दही, व्हिनीगर, मीठ*, लसूण आल्याची पेस्ट व तंदूर मसाला सर्व एकत्र करून व्यवस्थित कालवून घ्यावा.
  6. लिंबू व मीठ आधीच लावलेल्या ह्या लेगपिसेसना हा मसाला व्यवस्थित चोळून एका हवाबंद डब्यात चिकन घालून १०/१२ तास फ्रीजमध्ये चांगले मुरत ठेवावे.

एक लहान तोंडाचे छोटे मटके आणून ते चांगले धुऊन सुकवत ठेवावे. सुकल्यावर बारीक तार त्याला गळ्याभोवती गोल गुंडाळून घ्यावी (शक्य झाल्यास चारी बाजूंनी बांधता आल्यास उत्तम) गळ्याजवळ तार गुंडाळताना दोन ठिकाणी लुप सारखा आकार द्यावा. हे वाचून फार कठिण वाटते पण प्रत्यक्षात अगदीच सोपे आहे - शिंकाळ्यासारखी तार मटक्याभोवती नीट गुंडाळायला फार फार तर १५ ते २० मिनिटे लागतात.

मटक्यात भरपूर केळीची पाने (नसल्यास कर्दळीची) आत घालावीत. तयार (फर्मेंटेड) झालेले चिकन केळीच्या पानांवर (तेल चोपडलेल्या) ठेवून त्याची पुरचुंडी बनवावी. ही पुरचुंडी आत ठेवून वरून केळीची भरपूर पाने कोंबून मटक्याचे तोंड बांधावे.

मोकळ्या जागेवर वाळलेला पालापाचोळा, काड्या किंवा सरपण जमा करून आग लावावी. हे मटके त्या आगीत ठेवून चिमट्याने किंवा हूक असलेल्या काडीने फिरवत राहावे. अर्धा तास ज्वाला असलेल्या आगीत हे मटके नीट भाजल्यावर फक्त उरलेल्या विस्तवावर भाजत ठेवावे. साधारण अजून अर्ध्या तासा नंतर मटके विस्तवावरून बाजूला काढून घ्यावे. थंड झाल्यावर (धीर धरावा)आतल्या चिकन लेग पिसेसवर तुटून पडावे.    

मीठ* - चवीप्रमाणे अर्धे अर्धे करून घेणे किंवा एकदाच लावल्यासही चालेल

माझ्या एका मित्राच्या फार्म हाउसवर केलेल्या बार्बीक्यू पार्टीतल्या प्रथम फेरीत मी खूप गोंधळ घातलेला होता. झाकणासकट मटके (तार न बांधताच) घेऊन त्याचे तोंड/झाकण चांगले POP लावून बंद केले. ना मटके फिरवायला जमे, ना ते बाहेर काढायला ! जसजसे मटके तापायला लागले, आतून चित्रविचित्र आवाज यायला लागले. शेवटी आतली वाफ त्या माठाला सहन न झाल्याने ते तडकले ! कसेबसे चिकन बाहेर काढण्यात यश आले. बघतो तर काय इतका गोंधळ घालूनही चिकन बऱ्यापैकी तयार झाले होते. अर्धवट झालेले ते चिकन मग बाहेर काढून पॅन वर शॅलो फ्राय केले व एका नव्या झकास डिशचा स्वाद घेता आला.

दुसऱ्या वेळी ह्या सर्व उणीवा बऱ्याच अंशी दूर केल्या- व्यवस्थित पूर्व तयारी व मर्यादित जाळ ह्यावर विसंबून केलेला हा दुसरा प्रयत्न थोडाफार यशस्वी झाला. तरीही मटक्यातली वाफ आत कोंडून मटके फुटले ते फुटलेच !

शेवटचा म्हणून केलेल्या प्रयत्नाला यश आले. ह्यावेळी मटक्याचे तोंड झाकणाने बंद न करता फक्त केळीच्या पानांनी बुजवले..... वाफ बाहेर पडायला जागा झाल्याने चिकन इतक्या सुंदर रितीने आत भाजले गेले की विचारूच नका. 

इतर टिपा-
मटके जाळावर आडवे ठेवावे व वेळोवेळी गोल फिरवत राहावे.
चिकन जितके जास्त मुरेल तितके अधिक सुंदर लागते.
दह्यातले पाणी काढून फक्त घट्ट दही (श्रीखंडासारखे असल्यास उत्तम) वापरावे.
तार जितकी जास्त व व्यवस्थित गुंडाळता येईल तितकी चांगली म्हणजे मटके फुटले तरी खापऱ्या पसरत नाहीत.
मटके फुटले तरी घाबरून जाऊ नये- एखादी खापरी वेगळी झाल्यास तो भाग सोडता इतर भाग नीट भाजून घ्यावा.......
(शेवटी कुठे कृती चुकल्यास हे लेग पीस ओव्हन मध्ये भाजता नाहीतर तव्यावर तळता येतातच की !)
प्रथम प्रयत्नांसाठी शुभेच्छा ! 

अगदीच धोका पत्करायचा नसल्यास फरमेंटेड चिकन ओव्हनमध्ये आलटून पालटून भाजून घ्यावे.
     

२ वेळा कृती फसल्यावर आलेला स्वानुभव- (प्रयत्नांती परमेश्वर !)