नोव्हेंबर २३ २००५

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#९)

ह्यासोबत
                          ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

अभंग # ९.
विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥
उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा । रामकृष्णी पैठा कैसा होय ॥
द्वैताची झाडणी गुरूविण ज्ञान । त्या कैचे कीर्तन घडे नामी ॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठे मौन प्रपंचाचे ॥

भिन्नपाठः अद्वैतवाटा = अद्वयवाटा

भगवन्नामाचा जप करण्याऐवजी इतर नाना तंत्रयुक्त मंत्रांचे जप करणारे पुष्कळ लोक आढळतात. त्या त्या मंत्राची एकेक देवता धर्मशास्त्रांत सांगितली आहे. त्या मंत्रांचा विधिपूर्वक जप केल्याने प्रापंचिक वासना / इच्छा फळास येतात.परंतु त्याचा भगवंताच्या दर्शनाशी काही संबंध नसतो. सद्गुरूंकडून एकदा का खऱ्या देवाची,नामीची म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख झाली की त्याच्या अपेक्षेत नाम घेणे हेच महत्वाचे. संतांना अभिप्रेत असलेले नाम हेच. तंत्रयुक्त मंत्रजप विधी विधानपूर्वक जपावयाचे असतात. ज्ञानदेवांनीच एके ठिकाणी लिहिले आहे,

"अशौचिया जपू नये । आणिकांते ऐकू नये ॥
ऐशाही मंत्राते जग बिहे । याचे फळणे थोडे ॥
परि क्षोभणे बहू । तैसा नव्हे हा मंत्रराज रे रे ॥"
 

तंत्रयुक्त मंत्राचा जप करणे साधकाला हितावह नाही. अनेक संतांनी ह्याबाबतीत साधकाला सावध केले आहे.भगवन्नाम मात्र मंत्रराज आहे. येथे कोणतेही बंधन नाही, विधिनिधान नाही. म्हणूनच ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत सांगतात,

"नामजपयज्ञ तो परम । बाधू न शके स्नानादि कर्म ॥
नामे पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थे ॥

नामाचा महिमा अगाध आहे. तंत्रयुक्त मंत्रजप आणि संतांना अभिप्रेत असलेले भगवन्नाम ह्यातील फरक 

"मंत्रचळे पिसे लागती सत्वर । अबद्ध ते फार तरले नामे ॥"

ह्या ओवीत अगदी स्पष्टच केला आहे; जेणेकरून सामान्य साधक,ज्याला भगवतप्राप्तीची तीव्र इच्छा आहे, त्या चुकीच्या वाटेने जाऊ नये. ह्या ओवीतील 'ज्ञान' हा शब्द लौकिक अर्थाने शब्दज्ञान असा असावा. शब्दज्ञान,विद्वत्ता किंवा पांडित्य माणसाजवळ कितीही असले आणि त्याच्याठायी भगवतप्रेम नसेल तर सारे व्यर्थ होय. अशा विद्वत्तेने अहंकार निर्माण होऊन तो सर्वनाशास कारणीभूत होणारच. म्हणून ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायात लिहितात,

"नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठी ॥
सज्ञानाचे झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥"
(ओवी ८२)

उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा । रामकृष्णी पैठा कैसा होय ॥


ज्या नामाने भगवत्प्रेम प्राप्त होते ते नाम ही अद्वैताची वाट आहे. ज्यांनी आपले सारे आयुष्य नामसंकिर्तनी सार्थकी लावले ते तुकाराम महाराज सर्वसामान्य साधकांना मोलाचा सल्ला देऊन सांगतात,

"स्वल्प वाटे चला जाऊ । प्रेमे गाऊ  विठ्ठल ॥
तुका म्हणे हेचि नीट । जवळी वाट वैकुंठ ॥"

नामगायन ही अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी,वैकुंठाला नेणारी जवळची आणि सुखाची वाट आहे. नामदेव महाराजही म्हणतात,

"नामेचि तरले नामेचि तरले । नाम म्हणता गेले वैकुंठासी ॥" 

द्वैतामध्ये राहणाऱ्या आणि रमणाऱ्या माणसांना इतर वाटा-इतर मार्ग- सुलभ नाहीत. हे ध्यानात आले की माणूस भगवंताच्या नामाचे महत्त्व जाणतो. अभ्यासाने नाम त्याच्या जीवनांत शिरते आणि तो नामामध्ये स्थिर होतो.

द्वैताची झाडणी गुरूविण ज्ञान । त्या कैचे कीर्तन घडे नामी ॥

परमार्थ किंवा अध्यात्मात  ज्ञान म्हणजे आत्मज्ञान! आत्मज्ञानाशिवाय द्वैताचा निरास होणे शक्यच नाही. द्वैताचे म्हणजे दृश्याचे खरेपण माणसाच्या अंतरी घट्टपणे बसलेले असते. त्याचे दृश्यरूप म्हणजे 'मी' अमुक तमुक हा भाव. जेव्हा सद्गुरूबोधामुळे साधकाचा 'मी'पणा गळून पडतो तेंव्हाच त्याला"नामी"चा साक्षात्कार होऊन तो नामाला वाहून घेतो. तो सतत नामाचे उच्चारण करतो.

 ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठे मौन प्रपंचाचे ॥

'ध्यान' या शब्दाचा अर्थ आपण एरव्ही जसा करतो तसा तो येथे नाही. हे ध्यान तुकाराम महाराज सांगतात त्या प्रकारचे आहे.

'तुका म्हणे केली नेत्री ओळखण । तटस्थ ते ध्यान विटेवरी॥'

नाम हे देवाचे सगुण ध्यान आहे. नाम हेच देवाचे रूप आहे. नामाच्या रूपाने देव सगुण-साकार आहे. म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात,

'नाम तेचि रूप,रूप तेचि नाम । नामरूपा भिन्न नाही नाही ॥
आकारला देव नामरूपा आला । म्हणोनी स्थापिला नामवेदी ॥'

 अशा दिव्य नामाच्या पाठाने, घोषाने प्रपंचाचे मौन होते.
स्वरूपाच्या विसरात प्रपंचाचे भान होते, तर स्वरूपाच्या स्मृतीत प्रपंच विरून जातो. जागृतीत राहूनसुद्धा अद्वैतावस्था कायम राहते. म्हणून जागृतीत सुद्धा जगच काय तर अख्खे ब्रह्मांड बाधीत राहू शकते. अद्वैतात गेल्याशिवाय जगाचे अस्तित्व संपले असे होत नाही. ती नुसती मनाची अवस्था नसते. येथे महत्वाचा मुद्दा असा आहे की अद्वैतात गेल्याने जगाचे मिथ्यात्व समजते. म्हणजे अद्वैतात जाणे हा उद्देश्य असतो. जगाला बाधित करणे हा उद्देश्य नसतो. अद्वैतात गेल्यावर त्याचा परिणाम म्हणून जगाचे अस्तित्व संपलेले असते. अस्तित्व संपणे म्हणजे "आनंदावस्था" प्राप्त होणे. म्हणजे सर्व गोष्टींमध्ये एकच आहे आणि एकात सर्व आहे. म्हणून अशा उच्च कोटीचा साधक म्हणतो 'आता सर्व संपले' म्हणजे त्या एकात संपले. त्या एकाचीच अनुभूती आल्याने बाकी सर्व शून्य झाले.  द्वैतभावनाच संपली की मौनाशिवाय काही राहतंच नाही.

मला वाटते...नामस्मरण करतांना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" असे साकाररूप पाहता पाहता "पाहता पाहणे दूर सारोनी" देवाला पाहायचे असते. नामसंकीर्तनात सगुण हे ध्यान  असे लक्षात ठेवून नाम घेताना त्याच्या नादाकडे लक्ष द्यायचे. नादाचे मूळ स्वरूप विश्वव्यापी आहे. त्यास अनाहत नाद म्हणतात. नामाच्या नादामध्ये तल्लीन झालेले मन अनाहतापर्यंत पोहचते. मनाला नामाहून इतर कशाचेच भान उरत नाही. नामसमाधि नामाच्या ध्यानाने अनुभवास येते. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात,

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी

                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

 

 

Post to Feed
Typing help hide