डिसेंबर २००५

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#११)

ह्यासोबत
 
                          ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

अभंग # ११.
हरि उच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥
तृण अग्निमेळें समरस झाले । तैसे नामे केले जपतां हरि ॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणें याचे
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥

भिन्नपाठः उच्चारण=उच्चारणीं , याचे=तेथें

ह्या अभंगावर चिंतन करताना हरिपाठाच्या प्रत्येक अभंगातील शेवटची ओवी पुन्हा पुन्हा आठवावीशी वाटू लागली.  तसेच मागील १ल्या आणि ६व्या अभंगातील ओव्या मनात आल्या. का ते हळूहळू उलगडत जाईलच. १ल्या अभंगात ज्ञानदेव म्हणतात,

"देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥"

आणि ह्या अभंगात म्हणतात,

"हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रें ॥"

अंधाराचा नाश करायचा असेल तर तो घालवण्यासाठी एक प्रकाशकाडी पेटवली की पुरे. अंधार आपोआप नाहीसा होतो. किंबहुना प्रकाश असणाऱ्या जागी एखादा माणूस आला तर आधी तेथे अंधार होता हे त्याच्या लक्षात येणारच नाही. परस्पर भिन्न गुणधर्म असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. तसेच पाप-पुण्याच्या बाबतीत होते. नामाच्या क्षणभरीं उच्चाराने अगणित पुण्य जमा झाले की अनंत पापराशीं । जातील लयासी क्षणमात्रें हा अनुभव साधकाला सहजच येतो.मुळात पापाच्या राशी का निर्माण होतात? तर ते कारण आहे " देवाचा विसर" अथवा "स्वरूपाचे विस्मरण". "पाप ते विस्मरण" हे जरी खरे असले तरी त्यातून पापाच्या राशी कशा निर्माण होतात हेही पाहिले पाहिजे. एका बाजूने आपल्याला 'आनंदाचा सागर आणि सुखाचे आगर' असलेल्या देवाचा (स्वरूपाचा) विसर पडतो. दुसऱ्या बाजूला बहिर्मुखतेमुळे आणि कर्तेपणाच्या अहंभावातून आपण सुखाचा शोध बाह्य विषयांत घेण्याचा प्रयत्न करतो. वड-पिंपळासारखे अजस्त्र वृक्ष अनेक वर्षे उभे राहतात.पण त्यांची निर्मिती होते ती एका बीजातूनच. अनंत पापराशी उभ्या राहतात त्या सुखाच्या वासनेतूनच. देवाचा विसर किंवा स्वस्वरूपाचा विसर हे आहे वासनेचे मूळ बीज. या वासनेमुळे विकार निर्माण होतात. अनंत पापराशी ह्या विकारांतूनच आकाराला येतात. हे विकार जळून खाक झाल्याशिवाय माणसाच्या जीवनात निर्माण होणाऱ्या अनंत पापराशी लयास जाणार नाहीत.

तृण अग्निमेळें समरस झाले । तैसे नामे केले जपतां हरि ॥

गवताची गंजी कितीही मोठी असली तरी अग्नीच्या स्पर्शाने ती जळून खाक होतेच. पण मुळात त्या गंजीतील गवत सुके असणे गरजेचे आहे. ओल्या गवताला अग्नी कुठून स्पर्श करणार? तद्वतच एकदा का देवाचे स्मरण असले आणि त्याच्या स्मरणातच कर्म झाले तर ते कर्म जीवाला बाधित होत नाही. हरि उच्चारता जीव देवाला सन्मुख होतो आणि त्याचा मीपणा म्हणजे अहंकार म्हणजेच कर्तेपणाचा अभिमान गळून पडतो. देवाच्या स्मरणाने वासना क्षीण होत जातात. तुकाराम महाराजांचाही एक छान अभंग आहे.
"चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळा ॥
तुज पापची नाही ऐसे । नाम घेता जवळी वसे ॥
पंच पातकांच्या कोंडी । नामे जळतां नलगे घडी ॥
तुका म्हणे काळा । रीघ नाही निघती ज्वाळा ॥"
जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मरेपर्यंत कर्म करणे हे अटळ आहे. कर्म तर करायला हवे. त्यातून अनंत पापराशी निर्माण होणार.मग माणसाने कर्म करायचे सोडून का द्यायचे? कोणताही सत्पुरूष असा उपदेश करणार नाही. अशा पापराशी निर्माण न करता सुखाने कसे जगता येईल असा विचार ते सामान्यांना देतात. नामस्मरणाने साधकामधील कर्तेपणाचा अभिमान क्षीण होतो. त्याजागी कर्ता ईश्वर किंवा भगवंत ही जाणीव निर्माण होते. साधकाच्या हातून कर्म घडत राहते. पण कर्तेपणाचा अभिमान नसल्यामुळे कर्म बाधत नाही. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही त्याप्रमाणे त्याचा 'मी' व्यवहारापुरता उरतो. कर्ता ईश्वर मग भोक्ताही ईश्वरच हा भाव साधकाच्या ठायी दृढ होवू लागतो. त्यामुळे प्रपंच, कर्मबंधनातून तो मुक्त असतो. येथे पुन्हा मला ६व्या अभंगातील ओवी आठवते. त्या अभंगात ज्ञानदेव म्हणतात,
"कापुराची वाती उजळली ज्योति । ठायीच समाप्ति झाली जैसी ॥
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधुचा अंकिला हरिभक्त ॥"
त्या अभंगात कापुराचा दृष्टांत दिला आहे. एकदा का ज्योत उजळली की कापुराचे अस्तित्वच संपून जाते. ही अवस्था साधकाच्या ठायी येण्यासाठी त्याच्यावर सद्गुरूंची कृपा व्हावी लागते. तरच साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ही अनुभूती साधकाला येते.

मग ह्या अभंगात ज्ञानदेव तृण अग्निमेळें चा दृष्टांत का देतात? गवत जळले तरी शेवटी काही शिल्लक उरतेच की! ह्या अभंगात ज्ञानदेव द्वैतातून का बोलत आहेत ह्याचा विचार मनात येतो. अभंगाचा शेवटही "माझा हरी" असा ते करतात. भक्तीची परिसीमा गाठल्यानंतरची अनुभूती ज्ञानदेव शब्दबद्ध करताहेत की काय? की गीतेतील कर्मयोग ह्या एकाच अभंगातून सांगत आहेत ? कर्ता ईश्वर ह्या भावातून केलेले कर्म साधकाला बाधत नाही आणि कर्मसंन्यास आपोआपच घडतो असे तर त्यांना सुचवायचे नाही ना?

हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणें याचे ॥ 

भूतबाधा हा शब्द संताच्या लिखाणात आणि तेही संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या हरिपाठात म्हणजे जरा विचित्रच वाटले वाचायला. माझ्या काही साधक मित्रांशी बोलताना ह्या विषयावर त्यांचा विश्वास असल्याचे जाणवले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे (आणि काही ग्रंथातूनही असे वाचायला मिळते) भूतपिशाच्च या दुष्टबुद्धीच्या योनी आहेत. पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या भूवर्लोकात त्यांचे वास्तव्य असते असे म्हणतात. सनातन प्रभात ह्या नियतकालिकेत ह्यासंबंधी वाचायलाही मिळेल. दुसरा अर्थ.. भूत म्हणजे पंचमहाभुतांशी संबंधितही असू शकेल असे वाटते.

आपण एखाद्याला भूतबाधा झाली आहे असे केंव्हा म्हणतो? आपल्याला माहीत असलेल्या त्याच्या स्वभावाच्या अगदी विपरित वागू लागला आणि आपल्या तर्कसंगतीच्या बाहेर त्याचे वागणे असेल तर आपण असा विचार करू लागतो. अगदीच वाटले तर मग मनोरोगतज्ञाकडे घेऊन जातो. पण काही बाबतीत मात्र तेही स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. मी स्वतः काही मांत्रिकांना भूतबाधा(?!) झालेल्या माणसांना ठीक करताना पाहिले आहे. पण मनोरोगतज्ञ त्याचे वेगळेच स्पष्टीकरण देतात. 

दुसऱ्या बाजूने विचार केला तर.. आपण आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडल्यामुळे देहतादात्म्यामुळे देहाशी समरस होऊन वागू लागतो. पंचीकरणशास्त्राप्रमाणे देह हे पंचमहाभुतांचाच मिलाफ आहे. अस्ति-भाति-प्रिय असे आपण असूनही मरणाची भीती आपल्याला सतावते, आनंदस्वरूप असूनही आनंदासाठी भीक मागत विषयांच्या दारी फिरत राहतो, ज्ञानस्वरूप असूनही ज्ञानासाठी भटकत राहतो. संतांना हीच भूतबाधा अधिक खुपत असावी. ह्या भूतबाधेतूनच मी अमुक अशी कल्पना दृढ होऊन आपण वागत असतो.  नामदेव महाराजांनी "विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा" होवू नये अशी मागणी एका अभंगात केलीच आहे.
"कल्पनेची बाधा न हो कवणे काळी । ही संत मंडळी सुखी असो ॥
अहंकाराचा वारा न लागो राजसां । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥
नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखी निधान पांडुरंग ॥"
संतांना अधिक काळजी असते ती स्वरूपाच्या विसराची किंवा देवाच्या विसराचीच. त्याच्या विसरात जे वागणे  ते भूतबाधा झाल्यासारखेच आहे की!

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥

समर्थ ह्या शब्दाच्या अर्थासाठी मी काही मनोगतींशी बोलत होतो. सामर्थ्यसंपन्न असा अर्थ साऱ्यांनाच माहीत आहे. पण समर्थ म्हणजे अर्थपूर्ण असाही एक अर्थ आहे असे वाचले. रात्री विचार करत असतां सहजच मनात केशवसुतांची शाळेत शिकलेली "अढळ सौंदर्य" ही कविता आठवली.निसर्गातील एकेक सौंदर्य कितीही टिपले, शब्दबद्ध केले तरी काही शिल्लक राहतेच. तसेच काहीसे ज्ञानदेवांना "त्यांच्या" हरीबद्दल सांगायचे आहे का? उपनिषदात वर्णन केलेल्या भगवंताच्या स्वरूपाबद्दल वाचून किंवा ऐकूनही काही जाणायचे राहते असे साधकाला वाटतेच. हरिपाठातील कोणत्याही अभंगात ज्ञानदेव "माझा हरी" असा द्वैतातून उल्लेख करत नाहीत. मात्र ह्याच अभंगाचा शेवट असा आहे. कदाचित हरीबद्दल कितीही लिहिले, बोलले आणि ऐकले तरी पूर्णता वाटत नाही.म्हणून तर तो अनंत आहे, अथांग आहे. देव सगळाच अजून तरी कुणाला कळला नाही.कळणार नाही. पण त्याचा अनुभव मात्र एकदा स्वतःच घ्यायला हवा. तो सहज घेण्यासाठीच ज्ञानदेव सांगतात...

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी"

                       "॥ सद्गुरुचरणी समर्पित ॥"

 

Post to Feedछान!
भूतबाधा
प्रतीकात्मक वापर?!

Typing help hide