कुटुंब, करिअर का पैसा ??

ही गोष्ट आहे दोन मित्रांची, राज आणि अमितची.



राज आणि अमित, दोघेही शेजारीच राहणारे, शाळाही समोरासमोर. एकत्र
जाणे-येणे, खेळणे चालूच होते. राजचे विश्व छोटेसेच होते. थोडेफार शिकून
एखादी चांगली नोकरी करायची, लग्न करायचे आणि पुढे संसारात रमून जायचे हीच
त्याची स्वप्न. अमितचे तसे नव्हते. त्याची स्वप्न काही वेगळीच होती.
सहावी-सातवीत असल्यापासूनच त्याला मर्चंट-नेव्हीचे वेध लागले होते. पुढे
त्याच्या मेहनतीने, जिद्दीने आणि थोड्याफार ओळखीने त्याचे स्वप्न पूर्णं
झाले आणि त्याने मर्चंट-नेव्हीतली नोकरी पत्करली. काही दिवसांतच तो आपले
मित्र, आई-वडील-बहिणीला सोडून नोकरीकरता दूर निघून गेला. राजला काही दिवस
त्याची पत्र येत राहिली.. कधी हॉलंड मधून, कधी अमेरिकेतून, तर कधी
श्रीलंकेतून. आपण शहरातल्या पेठा बदलाव्यात तसा तो देश बदलत होता. त्याचा
पगार ज्युनीयर असूनही ८०,००० वगैरे होता. एक वर्षानंतर महिन्याच्या
सुट्टीवर जेव्हा तो आला तेंव्हा तो खूप खूश होता. वेगवेगळ्या देशात केलेली
खरेदी, तेथील फोटो त्याने राजला दाखवले. त्याची बचतही खूप झाली होती.
त्यातून त्याने एक मोठी गाडी पण घेतली.



एकडे राजलाही संगणक क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. काही दिवसातच त्याचा
पगारही ४०,००० पर्यंत गेला. कॉलेजमधील एका मुलीबरोबर त्याचा प्रेमविवाह
झाला. स्वत:चे एक मोठे घर, गाडी घेतली.  आई-वडील, बायको सगळे एकत्रच
राहत होते. त्याला अजून काय हवे होते. त्याच्या मेहनतीवर खूश होऊन पुढे
त्याला प्रमोशन मिळाले आणि अमेरिकेला ४-५ वर्षांसाठी जायची संधीही. पण
त्याने ती नम्रपणे नाकारली. फार मोठा निर्णय होता तो. एकीकडे सगळेजण
अमेरिकेला जायला जीवाचा आटापिटा करतात, आणि दुसरीकडे त्याने एवढी मोठी
संधी नाकारली होती. का?? कारण त्याने आपल्या कुटुंबाला झुकते माप दिले.



पाहिले काही दिवस, काही महिने त्याला आपल्या या निर्णयाचा पश्चात्तापही झाला.
त्याच्या मित्रांनी त्याला वेड्यात काढले. अमितकडुन आणि त्याच्या इतर
परदेशी गेलेल्या मित्रांकडून ऐकायला मिळणाऱ्या परदेशाच्या वर्णनाने तो खूप
व्यथित व्हायचा. नुसती वर्णनच नाहीत, तर त्यांची होणारी कमाई, त्यांची
होणारी बचत आणि पर्यायाने त्यांची भविष्यासाठी होणारी तजवीज यांचे विचार
त्याला रात्र रात्र झोपू देत नसत. नक्कीच या गोष्टी त्याला मिळणार
नव्हत्या. पण जे त्याला मिळाले होते ते नक्कीच कमी नव्हते. नंतर नंतर
अमितकडुन येणाऱ्या पत्रांमध्ये तो आपली व्यथा मांडत होता. कित्येक महिने
आजूबाजूला अथांग समुद्र, बोटीवरील ठराविक लोक सोडली तर मानवाची चाहूल
सुद्धा नाही. दिवस-रात्र त्या तप्त इंजिन-रूम मध्ये काम करायची आणि वेळ
मिळेल तेंव्हा मुडद्यासारखे झोपायचे. त्यालाही आपल्या आई-वडिलांची,
होणाऱ्या बायकोची खूप आठवण यायची. त्याच्या आनंदाच्या आणि  अडचणीच्या
वेळेस त्याचे आपले असे कोणी बरोबर नव्हते. डोळ्यातील अश्रू आणि झोपायची
उशी हेच त्याचे सोबती. त्याची ती मोठी गाडी त्याच्या गॅरेजमध्ये धूळ खात
पडून होती. पण करणार तरी काय? शेवटी, हा मार्ग त्यानेच स्वीकारला होता.



त्याच्या विरुद्ध, राज मात्र या बाबतीत नक्कीच सुखी होता. पावसातून भिजून
आल्यावर आईच्या हातचा वाफाळलेला चहा, रात्रीच्या जेवणात गरम-गरम तूप
घातलेला वरण भात त्याच्या नशीबी होता. ऑफिसमधील ताण-तणाव विसरायला बायकोची
ऊबदार मिठी होती.  अडचणीच्या प्रसंगी, वडिलांचे उपदेश त्याच्या 
पाठीशी होते, कौतुकाच्या वेळेस एक नाही अनेक थापा त्याच्या पाठीवर पडत.
भाच्याचा पहिला वाढदिवस, चुलतं भावाची मुंज, मामेभावाचे परीक्षेतील यश हे
सगळे साजरे करायला तो त्यांच्याबरोबर होता. पण अमित.., अमितचे तसे नव्हते.
त्याची इच्छा असूनही तो येऊ शकत नव्हता. पण निदान त्यामुळे त्याची द्विधा
मनस्थिती तरी नव्हती. त्याला पूर्णं माहीत होते, की आयुष्यातील काही वर्ष
तरी अशीच भोगायची आहेत. पण राज मात्र फार द्विधा मनस्थितीत आहे. 
एकीकडे त्याला आपले कुटुंब, आपले कर्तव्य खुणावत आहे, तर दुसरीकडे त्याला
परदेशातील सुख, पैसा खुणावत आहे. राजला त्याच्या कर्तृत्वावर, हुशारीवर
पूर्णं विश्वास आहे, आणि त्याला खात्री आहे, की ठरवले तर परदेशी जाणे फार
काही कठीण नाही.


राजच्या भुमिकेतुन आयुष्य जगताना मी तरी खुप द्विधा मनस्थितीत आहे.
राज ने काय करावे, तुम्हाला काय वाटते??



अनिकेत