जानेवारी २५ २००६

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१८)

ह्यासोबत
 

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # १८.

हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं॥
तयां नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥
मनोमार्गे गेला तो येथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥
पाठभेदः येथें=तेथें

ह्या अभंगात ज्ञानदेव भक्तिमार्गाची सुरुवात आणि परिणिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. नवविधाभक्तितही श्रवणभक्तीला प्राधान्य आहे. एखाद्या विषयाची गोडी लागण्यासाठी त्या मार्गाने जाणाऱ्यांबद्दल आणि तेथवर जाऊन जे मिळविले (भगवंत) त्याबद्दल ऐकणे / वाचणे ह्यातूनच त्याबद्दल प्रीती निर्माण होवून माणूस ते मिळविण्यासाठी प्रयत्न करू शकतो. भगवंताबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी किंवा तो प्राप्त करून घेण्याची इच्छा मनात निर्माण होवून त्या मार्गाने साधना करावीशी वाटण्यासाठी हरिवंशपुराण वाचले पाहिजे किंवा ऐकले तरी पाहिजे. वाचन आणि श्रवण ह्यात फरक आहे. एखादी कविता आपण वाचतो तेंव्हा ती मनात घर करेलच असे नाही. पण तीच कविता चाल लावून गाण्यातून सादर केली किंवा त्यातील गर्भितार्थ कुणी आपल्याला समजावून दिला तर ती आपल्या मनात पटकन घर करू लागते. वाचताना आपण त्या विषयाशी समरस होऊच असे नाही. पण श्रवण करताना वक्ता जर विषयाच्या (भगवंताच्या) प्रेमरसात न्हाऊन निघाला असेल तर त्याच्या मुखातून आलेले वक्तव्य आपले हृदय हेलावून सोडते आणि आपणही नकळत भगवंताच्या प्रेमात रंगू लागतो. दृकश्राव्य माध्यम आणि आंतरिक ओढ ह्या दोहोंच्या परिणामातून असाध्य तेही साध्य होऊ शकते असा सर्वसामान्य अनुभव आहे.

अध्यात्मात अगदी सुरुवातीला भगवंताचे कुल, बालपण आणि लीला यांचे वर्णन असलेल्या ग्रंथांचे वाचन / श्रवण केले असता साधकाच्या मनालाही भगवंताच्या दिव्यपणाची ओढ लागते. (आमच्या लहानपणी मनोरंजनाची आजची माध्यमे नव्हती. सकाळी उठलो की शेजारी जाऊन बुवांबरोबर ग्रंथ वाचायचे किंवा हरिपाठ म्हणायचा हा नित्यक्रम होता.त्यामुळे लहानपणापासून भक्त प्रल्हाद,चिलयाबाळ,राम-लक्ष्मण,ज्ञानदेव-मुक्ताई मनात घर करून राहिले होते.घरून,शेजाऱ्यांकडून मुल्यशिक्षण असे मिळत होते.)नकळत साधक देवाच्या ओढीने त्याच्याकडे ओढला जातो. त्याच्या मनात भगवंताबद्दलच्या आठवणी घर करू लागतात. सुरुवातीच्या टप्प्यात पुराण म्हणजे भगवंताबद्दलचे चरित्रपर प्राचीन काव्यग्रंथ श्रवण करता करता देवाच्या ओढीने साधक सद्गुरुकृपेने नामसंकीर्तन करू लागतो. भगवंताच्या नामामध्ये असे सामर्थ्य आहे की जगांत आणि जीवनांत भगवंतच सर्वोत्तम आहे अशी निष्ठा नकळत निर्माण होते. हरिप्रेमावाचून दुसरे काहीच प्रिय नाही अशी साधकाची अवस्था होते.

साधक असे नामस्मरण करू शकतो. पण आपण सर्वसामान्य माणसे मनात किंतु ठेवूनच असतो. कशाला हवा देव? परमार्थ करून कुणाचे भले झाले आहे? आधी शिका / नोकरी-धंधा करा / पैसा कमवा / संसार करा आणि मग म्हातारपणी आहेच वेळ तेंव्हा करा भगवंताचा विचार अशी सर्वसामान्य माणसाची विचारधारा असते. तीच तो आपल्या मुलांवर ठसवत असतो.

वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना प्रथम वर्षी Anatomy,Physiology & Biochemistry हे विषय अभ्यासावे लागतात.नंतर मग Pathology शिकविले जाते. एकदा का normal & abnormal काय हे कळले की मग Surgery की medicines ह्यापैकी कशाचा उपयोग करून रोगी बरा करायचा हे अंतिम वर्षात शिकविले जाते. पण गंमत अशी आहे की 'मी कोण' आहे,'देव कोण' आहे आणि 'जग' म्हणजे नेमके काय? ह्यांचा आपला संबंध काय?नशीब / नियती म्हणजे काय ?  ह्याची ओळख न होताच आपण जीवन जगायला सुरुवात करतो. जीवनाच्या शाळेचा अभ्यासक्रम विचारवंत का नाही नक्की करत? अध्यात्म(परमार्थ) आणि व्यवहार ही मानवी जीवनाची दोन भिन्न अंगे केली गेली. एवढी मोठी फसगत आपल्या जीवनात झाली आहे ह्याची आपल्याला जाणीवच नाही. मग त्याबद्दल खंत तरी का वाटावी आपल्याला? असो.

तयां नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥

हरीच्या वंशांचे पुराण, कथा, गोष्टी ज्याला प्रिय आहेत; हरिनामसंकीर्तन प्रिय आहे. किंबहुना हरिप्रेमावाचून दुसरे काहीच प्रिय नाही आणि हरी हाच ज्याच्या सर्व सुखाचा विषय आहे अशा नामधारकाला इहलोकीच वैकुंठाचा अनुभव येतो. श्री.ज्ञानदेवांची वैकुंठाची संकल्पना समजावून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मते हे विश्व म्हणजे भगवंताचा विलास (चित्शक्तिविलास) आहे. माणूस अज्ञानामुळे भगवंताला विसरतो आणि भगवत्स्वरूप असणारे विश्व त्याला स्थूल व जड दिसते. भगवंताच्या नामसंकीर्तनाने भगवत्स्वरूप झालेल्या साधकाला हे जग भगवंताने भरलेले दिसते. भगवंतांनी गीतेत सांगितले आहेच,
तो मी वैकुंठी नसे । वेळ एक भानु बिंबीही न दिसे ।।
वरी योगियांचीहि मानसे । उमरडोनि जाय ॥
परी तयापाशी पांडवा । मी हारपला गिवसावा ॥
जेथ नामघोष बरवा । करिती माझा ॥

त्याचप्रमाणे नामधारकाला तीर्थाटन करण्याचीही जरूरी नाही. कारण हरिनामात, हरिप्रेमात रंगून गेलेल्या नामधारकाचा देह हा सर्व तीर्थांचे माहेरघर असतो.
हेच तुकाराम महाराज सांगतात,
राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाऊला पाऊली ॥
धन्य ते शरीर । तीर्थव्रतांचे माहेर ॥

भगवन्नाम हेच महातीर्थ आहे. या महातीर्थात अखंड स्नान करणाऱ्या नामधारकाला दुसऱ्या तीर्थाकडे जाण्याची आवश्यकताच नाही. उलट तीर्थांना पावन करण्याचे सामर्थ्य नामधारकात असते.

मनोमार्गे गेला तो येथें मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥

ही ओवी वाचताना माझ्या मनात आठव्या अभंगातील
'संतांचे संगती मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथे ॥' ही ओवी आठवली. हा विरोधाभास आहे असे विचार आपल्या मनात येतात. एका मनाचाच आलंब घेऊन देव आकळावा असा विचार करावा तर ज्ञानदेवच सांगताहेत की 'मनोमार्गें गेला तो येथे मुकला'!  ह्यातील गुह्य समजायलाच तर सद्गुरू हवेत. 'वाहणे' हा पाण्याचा गुणधर्म आहे. विशिष्ट माध्यमाच्या साहाय्याने जर ह्या पाण्याला गती दिली तर वीजनिर्मिती होवू शकते. दुधात लोणी अव्यक्त रूपात असतेच.दूध जर असेच ठेवले तर ते नासते.पण त्याच दुधाला 'दह्याची संगती' लाभली तर त्याचेही दही होते आणि ते दही घुसळले की त्यातून लोणी आणि मग तूप सहज प्राप्त होते. तद्वत सामान्य माणसाच्या मनाला संतसंगातून नामाचे विरजण लाभले तर त्या मनात देवभाव जागा होऊन हळूहळू नामसंकीर्तनाने त्या भावातूनच 'देवत्व' प्रगट होऊ शकते. हा संतांचा अनुभव आहे,ज्ञानदेवांचा उपदेश आहे.

पण सामान्य माणूस सुखासाठी बहिर्मुख होऊन इंद्रियांद्वारे मनाच्या विषयलोलूप मार्गाचा आलंब घेतो आणि भगवंताच्या दिव्य सुखाला मात्र मुकतो. पण ह्या दिव्यसुखासाठी साधक हरिपाठी स्थिरावला पाहिजे. कारण मनाची चंचलता हेच दुःख व मनाची स्थिरता हेच सुख होय. विषयाने मन चंचल होते तर हरिनामाने मन स्थिर होते. विषयांपाठी धावेल तो अभागी तर हरिपाठी स्थिरावेल तोच धन्य होय. शेवटच्या चरणात ज्ञानदेव सांगतात,

ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥

ह्या ओवीतील गोडी,जोडी आणि आवडी ह्यातील यमक न पाहता ज्ञानदेवांचा अनुभव आणि परमार्थातील साधकाच्या प्रगतीचा आढावा तीन टप्प्यात कसा घेतला गेला आहे ते पाहायला हवे. हरिवंशपुराणाच्या श्रवणातून हरीची गोडी निर्माण झाली आणि नामसंकीर्तनसाधनेची जोडी असेल तर भगवंताच्या स्वरूपाची ओळख होऊन भगवंताच्या ठायी अखंड आवडी निर्माण होते. स्थान व परिस्थिती यांची मर्यादा न राहणे ही खरी 'आवडी'. आवडीमध्ये लाजलज्जा, कंटाळा व लौकिकाचा विचार कधीही नसतो. पुष्कळ लोक परमार्थ करतात. पण त्यांचा तो परमार्थ फावल्या वेळेचा असतो. परमार्थात गोडी किंवा आवडी मुळीच नसते. विषयांच्या ठिकाणी जितकी गोडी सर्वसामान्यांना असते त्याहूनही अधिक आवडी भगवंताच्या ठायी असणे ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे.

संतांच्या संगतीने आणि त्यांच्या उपदेश-श्रवणाने हरिनामाची गोडी चित्तात रुजते,उमलते,फुलते आणि त्याची चंचलता संपूर्ण नष्ट होऊन ते रामकृष्णी म्हणजेच भगवंताच्या चरणी स्थिर होते. साधकाचा अनुभव मग
'चित्त चाकाटले स्वरूपामाझारी । ते न निघे बाहेरी ऐसे झाले ॥' असा शब्दरूप घेतो.

नामाचा अट्टहासाने अभ्यास केल्याशिवाय नामाची गोडी निर्माण होत नाही. म्हणूनच ज्ञानदेव सांगतात,

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"

                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

पुस्तक(अभंग १ते १५)  अभंग १६ अभंग १७

Post to Feedअप्रतिम!

Typing help hide