फेब्रुवारी १५ २००६

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२१)

ह्यासोबत
 
                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २१.

काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥

पाठभेदः हरिनाम=नाम हरि, ज्ञानदेवा=ज्ञानदेवीं

भगवंतप्राप्तीची इतर जी साधने आहेत त्यांत स्थळ,काळ, शूची-अशुचि इ. नियम पाळावे लागतात. परंतु नामस्मरणाला काळ-वेळेचे बंधन किंवा शूची-अशुचिचे नियम नाहीत.
"काळवेळ नसे नामसंकीर्तनी । उंचनीच योनी हेंही नसे ॥
धरा नाम कंठी सदासर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥"
"नामासी नाही स्नान बंधन । नाहीं नामापाशी विधि विधान ॥"
असा इतर संतांचाही अनुभवाधिष्ठित उपदेश आहे.मी गमतीने म्हणतो..मरणाला कुठे काळ-वेळ असते?नामस्मरण करणे म्हणजे 'मी' त्याच्यात मरून जाणे आणि नामी होऊन राहणे. भगवंत स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे आहे. त्याची सहज आणि अखंड अनुभूती घेण्यासाठी नामासारखे साधन नाही. सुरुवातीला मात्र काही काळ नामस्मरणाची वेळ आणि जागा निश्चित असेल तर ते साधकाला हितकारकच ठरते. शरीर आणि मन नकळत साथ देऊ लागते. एकदा का नाम अंतर्मनात रुजले की नामधारकाचे काम झाले. तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो. ते प्रातर्विधिकरिता गेले होते. तेथेच नामात दंग झाले. त्यांना भेटावयास आलेल्या एका शास्त्रीबुवांनी ते पाहिले आणि त्यांचा राग अनावर झाला व म्हणाले,'ही काय जागा आहे पवित्र नाम घेण्याची? तुम्ही लोकांनीच धर्म बुडवला आहे. कुठेही नाम घेता.' महाराज म्हणाले,'काय करू? माझी मज झाली अनावर वाचा'
तुम्ही माझी जीभ धरा म्हणजे मी नाम घेणार नाही.' हे ऐकल्यावर शास्त्रीबुवांनी महाराजांची जीभ धरली. त्याबरोबर शास्त्रीबुवाच विठ्ठल नामात दंग झाले आणि नाचू लागले. असा जर संतांचा अनुभव असेल तर आपण सामान्य जनांनी का काळजी करावी?
हरिपाठात ज्ञानदेवांचा आग्रह आहे,
'असोनी संसारी जिव्हे वेगु करी' तर तुकाराम महाराजांच्याच एका अभंगात महाराज लिहितात,
'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥' गीतेच्या आठव्या अध्यायात भगवान म्हणतात,
"तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच"
आता सामान्य माणसाला आपल्या अशा धकाधकीच्या जीवनात भगवंताचे स्मरण ठेवायचे असेल तर असे साधन हवे ज्याला काही स्थळकाळाची बंधने असणार नाहीत. हे का संतांना ठाऊक नसणार? नामाशिवाय दुसरे असे कोणतेही साधन नाही जे असे सुलभ आहे. नामस्मरणयोगात हे सत्य स्वीकारले आहे की भगवंत स्थळ-काळाच्या पलीकडे आहे.म्हणून केंव्हाही, कोठेही नाम घेतले तरी ते त्याच्यापर्यंत पोचणारच."जेथे उठे 'मी'चे स्फुरण तेथे म्हणा विठ्ठल विठ्ठल " असा तुकाराम महाराजांचाही उपदेश आहे.

मानवी जीवनाचा केंद्र आहे "मी"! हा 'मी' एका बाजूने जगाशी जोडला आहे तर दुसऱ्या बाजूने भगवंताशी. नामस्मरण करता करता भगवंताच्या कृपाप्रसादाने हा 'मी' भगवत्स्वरूप होऊन जातो आणि 'मी'चा उद्धार होतो. तर जसा जसा 'मी'चा उद्धार होत जातो तसतसा त्याच्या संपर्कात येणाऱ्या जगाचाही उद्धार होतो. मानवी व्यवहारात दुःखाचे कारण आहे स्वार्थ! इतरांचाही स्वार्थ असतो आणि तोही साधला गेला पाहिजे हे नकळत आपण विसरतो.  नामस्मरणाने माणसाचे मन नकळत शुद्ध होत जाते. तो निःस्वार्थी बनत जातो. जगाशी त्याचे संबंध नकळत आपलेपणाचे होऊ लागतात. अशा लोकांच्या सहवासाने, उपदेशाने जग सन्मार्गी लागले तर नवल ते काय? अजूनही साईबाबा, गजानन महाराज ह्या जगात देहाच्या अंगाने नसले तरी त्यांचे कार्य अखंड चालूच आहे ना? स्वतःचा उद्धार तर त्यांनी साधलाच;पण त्यांच्या संपर्कातील जगाचाही उद्धार केला.

रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥

माणूस म्हटला की त्याच्यात गुणदोष हे असणारच. सामान्य मानवी व्यवहारात जे दोष आपल्याला दिसतात त्याचे मूळ आहे अहंकार. माणसाचा 'मीपणा' अथवा अहंकारच सर्वात मोठा दोष आहे असे संतांचे सांगणे आहे. तोच तर देवाच्या दर्शनाच्या आड येतो. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात,
'अहंकार गेला । तुका म्हणे देव झाला ॥' अध्यात्म साधनेत आणि देवाच्या दर्शनात  हा 'अहंकार'च मोठा अडसर आहे. नामस्मरण करता करता माणसाचा हा अहं शून्यवत होतो. नामधारक हळूहळू अंतर्मुख होतो आणि त्याच्या एक लक्षात येते की बाह्य जगतावर विजय मिळवणे शक्य आहे. पण आपल्या अंगी असलेल्या अवगुणांना, विकारांना जिंकून देवाच्या प्रांतात जाणे कठीण आहे. नकळत तो सद्गुरू किंवा भगवंताला शरण जातो. त्यानंतरचे त्याचे नामस्मरण हे आत्यंतिक तळमळीने आणि हृदयापासून असते. अशा नामस्मरणाने भगवंताची कृपा होऊन नामधारक भवसागर तरून जातो.

हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥

मानवी जीवनात ज्ञानाला सर्वोत्तम स्थान आहे. म्हणूनच तर आपण म्हणतो,'विद्वान सर्वत्र पूज्यते'! ज्ञान हे स्मृतिरूप असते.ह्या ज्ञानाचे दृश्य स्वरूप म्हणजे त्याच्या मुखातून काय प्रगट होते ते. त्याच्या जिभेवर सरस्वती वास करते असे आपण सहज म्हणतो. अगदी तसेच भगवंताच्या ज्ञानाच्या बाबतीत म्हणायला हरकत नाही. मानवी जीवनाचे सर्वोत्तम मूल्य हे भगवंतप्राप्ती अथवा आत्मानुभूती आहे हे भारतीय ऋषीमुनींनी स्वीकारले आणि त्याची अनुभूती नामस्मरणाने घेता येते हेही जाणले. हे ज्ञान अंतर्मनात भिनते आणि जिभेवर नामाच्या रूपात नांदू लागते.विस्मरण हे जर अज्ञान असेल तर स्मरण हे ज्ञान असले पाहिजे.भगवंताचे नाम हे त्याच्या स्मरणाची खूण आहे.जिव्हा जर नामाचीच झाली तर अशा नामधारकाच्या भाग्याचे वर्णन कोण करू शकेल?

ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥

भगवंताचे नाम सांग आहे. नामाकडे कुठल्याही अंगाने पाहिले तरी ते पूर्ण आहे. नाम सर्वांगाने आणि सर्व गुणांनी युक्त आहे ते असे..
१. नाम अमोल पण बिनमोल आहे.
२. नामाच्या ठिकाणी वर्णभेद, आश्रमभेद किंवा जातिभेद नाही.
३. नामाच्या ठायी स्त्री-पुरूष भेद नाही.
४. नामाला काळ-वेळेचे बंधन नाही.
५. नामाला शूची- अशुचिचे नियम नाहीत.
६. नामाला सोवळे ओवळे नाही.
७. नामाला साक्षरतेची किंवा विद्वत्तेची जरूरी नाही.
८. नाम घ्यावयास कष्ट नाही.
९. नाम स्वयंपूर्ण आहे.
१०. नाम हे प्रत्यक्ष स्फुरद्रूप परब्रह्म आहे.

असे हे सांग नाम पूर्वजांनी मोठे परिश्रम करून उपलब्ध केले म्हणूनच तर आम्हाला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला. संत निळोबाराय सांगतात,
संत एकांती बैसले । सर्वही सिद्धांत शोधिले ॥
ज्ञानदृष्टीं अवलोकिले । सार काढिले निवडोनि ॥
ते हे श्रीहरिचे नाम । सर्व पातकां करी भस्म ॥
अधिकारी उत्तम अथवा अधम । चारी वर्ण नर नारी ॥

आपल्या पूर्वजांचे ऋण फेडण्याचा मार्ग म्हणजे त्यांनी दिलेले हे नाम कंठात अखंड धारण करणे हाच होय. म्हणूनच ज्ञानदेव सर्वांना उपदेश करतात.

"हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"

                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

 

ह्या आधीचे अभंग 

Post to Feedछान!

Typing help hide