झाड

झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहून गेले
वरवर भासे शांत शांतसे , मुळांत वादळ राहून गेले

किती दिशांनी किती वादळे झाडाला उखडाया येती
जपण्यासाठी पाती पाती शोधित गेले ओली माती
खोल खोलवर पत्थर सारे, झरे कधीचे आटून गेले
झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहून गेले

अजून पुरेसे नाही जून , उरले कुठले ऋतू अजून
फांदी फांदी आतुरलेली, अंगोपांगी यावे फुलून
श्रावण दुरूनी गेला टाळून , ऊन भेटुनी जाळून गेले
झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहून गेले

झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहून गेले
वरवर भासे शांत शांतसे मुळांत वादळ राहून गेले