मृत्यंजयाचा आत्मयज्ञ


आज दिनाक २३ मार्च. आज रोजी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या दैदिप्यमान हौतात्म्याला ७५ वर्षे होत आहेत. या महान विभूतींना प्रणाम.


सरदार भगतसिंह उर्फ रणजीत हे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव याचे प्रतिक व क्रांतियज्ञाचे अध्वर्यु होते. सुखदेव उर्फ विलेजर हे तत्वज्ञानी व लाहोर कटामागची प्रेरणा व जणु एच एस आर ए चा मेंदू होते तर राजगुरू उर्फ रघुनाथ उर्फ एम हे देशासाठी बलिदान करायला उताविळ झालेले एक शिपा‌इ होते.


राजगुरू घराणे मुळचे पुण्याजवळील खेडचे, ज्याला आता राजगुरूनगर असे नाव दिले आहे. यांचे मूळ आडनांव ब्रह्मे, परंतु यांच्या घराण्यातील एका पुरुषाला सातारच्या गादीविरील महाराजानी आपले गुरु मानल्यामुळे त्यांना राजगुरू असे आडनाव पडले. शिवरामला लहानपणी बापू म्हणत असत. बापू लहानपणापासूनच जरा विक्षीप्त आणि धाडसी. एकदा माजघरात खेळत असता त्याना कुणीतरी म्हणाले की जपून उठ, वर चिमणी आहे. बापूने तात्काळ उठून त्या चिमणीची तप्त काच आपल्या हात दाबून फोडली. लहानपणी वहिनीच्या पुढ्यात अपमान झाल्याने ते तडकाफडकी घर सोडून कुणालाही न सांगता नेसत्या वस्त्रानिशी परागंदा झाले.


घर सोडून निघालेले बापूसाहेब मजल दरमजल करीत काशीला पोहोचले व तेथिल अहिल्याबा‌ई धर्मशाळेत राहीले. पांडुरंगपंत जोशी यांच्याकडे संस्कृत अध्ययन करता करता त्यांचा परिचय बळवंतराव सावर्गावकर यांच्याशी झाला. पुढे या मंडळींनी तेथे गीर्वाण वाग्वर्धिनी सभा स्थापन केली. काशीतील भारत सेवा मंडळ चालवणार्या कुदळे पिता-पुत्रांच्या तालमित ते कुस्ती, मलखांब, दांडपट्टा व धनुष्यबाण शिकले. इथेच त्यांची ओळख बाबाराव सावरकर यांच्याशी झाली. लहानपणी जालीयनवाला बाग प्रकरणामुळे त्यांना इंग्रजांविषयी भयानक चीड निर्माण झाली होती, इथे ती वाढीस लागली. जिथे इच्छा तिथे मार्ग या न्यायाने सावरगावकर- शिव वर्मा - मुनीश्वरप्रसाद- असे करीत अखेर ते आजादांपर्यंत पोहोचले व एच एस आर ए ला एक धाडसी शिपा‌ई लाभला. या दिग्गजांपुढे आपण कमी पडता कामा नये या एकाच ध्यासाने त्यांना पछाडले होते. त्यांनी भांडून लाहोर कटात आपले नाव घेण्याची आजादांना गळ घातली व ती मान्य झाली.


आयुष्यातले इप्सित साध्य करायची वेळ जवळ आली तसे ते अधिर होत होते. स्कॊट त्याच्या कार्यालयात असल्याची खबर १७ डिसेंबर रोजी आली आणि ते तिघे बाहेर पडले. भगतसिंहाकडे महाविध्वंसक असे जर्मन बनावटीचे मॊवजर होते तर राजगुरूंकडॆ रीवॊल्वर होते. उतावळ्या राजगुरूंना दबा धरुन बसणे सहन हो‌इना, ते म्हणू लागले कि त्यापेक्षा सरळ आत कचेरीतच घुसुन त्या हरामखोराला उड्वतो. त्यांना समजावत भगतसिंह त्यांच्या सह कुंपणाच्या भिंती‌आड लपून राहीले तर ईशारा करण्यासाठि जयगोपाळ कचेरीसमोर दुचाकी दुरुस्त करण्याचे सोंग घेत बसला. अखेरीस गोरा फटफटीवरून बाहेर पडताच जयगोपाळने खुणेचा रूमाल टाकला. स्वार पुढे जाताना जवळून पाहताच त्याला चुक समजली, तो स्कॊट नसून सॊंढर्स्ट होता. त्याने तसे ओरडून सांगितलेही, पण आता पेटलेले राजगुरू रिवॊल्वर घे‌उन थेट स्वारापुढे धावले होते. भगतसिंहाने त्यांना ओरडुन सांगायचा प्रयत्न केला. पण एक तर त्याचे उर्दू प्रभावित पंजाबी हिंदी राजगुरूंना समजत नसे व त्या क्षणी ते इतके उत्तेजित झाले होते की त्यांना वाटले भगतसिंह तो गोरा जवळ ये‌इपर्यंत थांब असे सांगत आहे. आपली शिकार भगतसिंहाला का बरे? राजगुरूंनी ५० फ़ुटांवरूनच रिवॊल्वर झाडले आणि पहिलीच गोळी सॊंढर्स्ट चे डोके फोडून बाहेर पडली. तरिही सूडाने पेटलेल्या भगतसिंहाने मॊवजर त्याच्यावर रिकामे केले. लगेच छननसिंह, फ़र्न वगरे याना पकडायला धावले तसे आजाद आडोशाबाहेर येत मैदानात उतरले व त्यांनी सर्वाना निघायचा हुकुम दिला. मात्र हा बहाद्दर अचानक घटनास्थळी उलटा धावत गेला व काहीतरी उचलून पळत आला व सगळे पसार झाले.


तिथे कशाला मरायला परत गेला होतास? असा संतप्त सवाल आजादांनी करताच राजगुरूंनी मोठ्या अभिमानाने कोटाच्या खिशातुन मॊवजरचे रिकामे मॆगजिन काढून दाखवले व भगतसिंहाकडे बोट दाखवत तक्रार केली की हा हे तेथेच सोडून आला होता. त्यांनी लटक्या रागाने अशीही तक्रार केली की स्वतःला मॊवजर व मला मात्र साधे रिवॊल्वर दिले! मात्र ह्रुदयाने हा माणूस मेणाहून म‌ऊ होता. सायंकाळी ते खूप उदास दिसले तेव्हा सावरगावकरांनी कारण विचारले असता ते म्हणाले अरे आपण ज्याला मारला तोही माणूसच होता, आता त्याची बायका-मुले खूप दु:खात असतील. मग इतरांनी त्यांची समजूत घातली की विषारी सापालाही जीव असतो, पण तो घरात शिरला तर त्याला ठेचावाच लागतो नाहीतर तो दंश करुन घरातल्यांचे जीव घे‌इल.


पुढे एक एक करत कुणी चकमकीत मारले गेले, कुणी पकडले गेले. लाहोर खटल्याचा निकाल लागला. सर्वप्रथम भगतसिंह व मग सुखदेव यांना फाशीची शिक्षा फर्मावली गेली तर बटुकेश्वर दत्तांना काळे पाणी दिले गेले. स्वत:चा निकाल बाकी असताना नेहेमी काहितरी विनोद वा चेष्टा मस्करी करून ठसका लागेपर्यंत हसणारे व सर्वाना हसवून वातावरणातला ताण घालवणारे राजगुरू नि:शब्द झाले होते. माझे साथी फासावर जाणार आणि जर मी जीवंत राहीलो तर ते शरमेचे जीणे कसे जगू या कल्पनेने ते विलक्षण अस्व्स्थ झाले होते. मग त्यांचाही निकाल लागला व त्यांनाही फाशी झाली तेव्हा त्यांना अत्यानंद झाला.


२४ मार्च रोजी फाशी मुक्रर झाली. नियमाप्रमाणे नातेवा‌ईक २३ मार्चला सायंकाळी ५ वाजता अखेरचे भेटायला आले. भगतसिंहाचे आ‌ई-वडील, भावंडे, सुखदेव यांची आ‌ई, राजगुरुंची आ‌ई पार्वतीबा‌ई, यमुता‌ई, त्यांचा लहान मुलगा शरद असे सगळे जमले असता तुरुंगाधिकारी उर्मटपणे म्हणाले की फक्त आ‌ई-वडील व सख्खी भावंडे यांनाच परवानगी आहे, ईतरांना नाही. भगतसिंहाचे आ‌ई-वडील मागे फिरले. जर सगळ्यांना भेटता येत असेल तरच जा‌उ नाहीतर अम्ही आत जात नाही असे त्यांनी बजावून सांगीतले. दारापर्यंत गेलेल्या राजगुरुंच्या मातोश्रीही मागे कुणीच येत नाही असे लक्षात येताच मागे परतल्या. भगतसिंहाचे वडील किशनसिंह यांनी त्यांना आत जा‌उन आपल्या मुलाला अवश्य भेटा असे सांगीतले, पण इतरांना परवानगी नाही तर मी ही जाणार नाही असे म्हणत ती वीरमाता आपल्या मुलाला अखेरचे न भेटताच परत आली.


जनक्षोभ व लाहोर मधील वाढती गर्दी लक्षात घेताच फाशीच्या दिवशी कदचित प्रचंड जमाव जमेल व त्यावर काबू ठेवणे जमणार नाही हे समजून या वीरांना २३ मार्च रोजी म्हणजे आदल्या दिवशी सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी फ़ाशी दिले गेले व त्यांचे मृतदेह मागील भागाची भींत फोडून तात्पुरता रस्ता बनवून बाहेर काढले गेले व फ़िरोजपूर रस्त्यावर सतलज काठी रात्री ११.४५ ला घा‌ईघा‌ईने चिता पेटवल्या गेल्या. जर मृतदेह नातेवा‌अ‌ईकांच्या ताब्यात दिले तर प्रचंड अंत्ययात्रा निघेल व कदाचित जमाव हाताबाहेर जा‌ईल या भीतीने इंग्रजांनी हे कृत्य केले. हे तीघे मेले तरी त्यांची दहशत कायम होती!


२३ मार्च १९३१ ला हे तीन वीर हसत फाशी गेले. मागे राहीलेले डॊ. भगवानदास माहोर गह्तीने असे म्हणत की जर फाशी नंतर फ़क्त एकदा प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी तोंडावरची काळी टोपी काढली असती तर राजगुरूंचीची नजर भगतसिंहाकडे रोखलेली दिसली असती, हेच पाहायला की तो आपल्या आधी तर मेला नाही ना? आणि भगतसिंहाच्या ओठावरही राजगुरूंचा हा वेडेपणा पाहून मधुर हास्य उमटले असते आणि ते म्हणाले असते, ' अरे, हौतात्म्याचे आकर्षण आम्हा सगळ्यांनाच आहे पण तू तर हौतात्म्याचा आशिक आहेस'