यज्ञकुंड आणि समिधा

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील चार पर्वे ही सशस्त्र क्रांतिची आहेत. पहिले १८५७ चे स्वातंत्र्यसमर ज्याने चेतना निर्माण केली. दुसरे पर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्याने साम्राज्याला हादरा दिला. तिसरे पर्व हिंदुस्थान स्माजवादी प्रजासत्ताक सेनेचे ज्याने सरकारला इशारा दिला की आता घटका भरत आली आहे. चौथे निर्णायक पर्व आजाद हिंद सेनेचे ज्यांनी साम्राज्यावर निर्णायक घाव घातला.


विसाव्या शतकातील तिसरे दशक हे हिं.स.प्र. से. चे. १९३०-३१ हा काल मात्र हिं‌. स. प्र. से. साठी अत्यंत वाईट व विनाशाचा ठरला. या साधारण वर्ष-दिड वर्षाच्या कालावधीत आजाद, भगतसिंह, राजगुरू, भगवतीचरण, शालीग्राम शुक्ल, हरिकिशन, जगदिश असे अनेक वीर व ज्यांचे नावनिशाणही माहित नाही असे अनेक हिं. स. प्र. से. चे योद्धे फ़ाशी गेले वा लढताना पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडले.


आज २ मे, याच दिवशी ७५ वर्षांपूर्वी लाहोर जवळील शालिमार बागेत जगदिश म्हणजेच जगदिशचंद्र रॉय पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडले.


 


Jagdish


आजादांचा स्फुर्तिदायक मृत्यु व लागोपाठ भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांचे हौतात्म्य यामुळे हिं. स. प्र. से चे अनेक सभासद काहीसे सैरभैर झाले होते व त्याच बरोबर प्रतिशोध घेण्यास आसुसलेले होते.


२७ फेब्रुवारी रोजी आजादांच्या बलिदान प्रसंगी त्यांच्याच हुकुमानुसार तिथून पसार झालेले सुखदेवराज यांनी सुशिलादीदींच्या सांगण्यावरून (हुतात्मा भगवतीचरण यांची बहीण) पंजाबचा गृहमंत्री सर हेन्री क्रेक जो भगतसिंह प्रभृतिंना फाशी होण्यात विशेष सहभागी होता त्याला मारायचे ठरवले. याच कटात सुखदेवराज यांच्या नकळत जगदिशही सहभागी झाला. १ मे रोजी डॉ. लिला नावाच्या स्त्रीने त्यांना काही कागदपत्रे व बॉम्ब असलेली एक मोठी थैली आणून दिली. वास्तविक या बाइचे वर्तन व लौकिक फारसा चांगला नाही हे समजूनही त्यांनी ती थैली त्या बाइकडेच ठेवायला दिली. सुखदेवराज यांना हे वृत्त समजताच त्यांनी जगदिश यांना त्यांच्याहातून एक मोठी चुक घडली असल्याचे सांगीतले. मात्र उशीर झाला होता. इकडे त्या बाइने ते सर्व साहित्य थेट पोलिसाना नेउन दिले व सर्व माहितीही दिली होती.


२ मे १९३१ रोजी जगदिश व सुखदेवराज हे लाहोर बाहेर ४ मैलावर असलेल्या शालिमार बागेत गेले. मात्र फ़ितुरीने घात केला होता. ८ फूट उंच भिंत असलेल्या बागेला १५० सशस्त्र पोलिसानी वेढा घातला. हि. स. प्र. से. च्या बहाद्दरांची हिंमत व नेमबाजी पूर्णपणे माहीत असलेल्या पोलिसांनी कसलीही संधी न देता बेछूट गोळीबार केला. सुटकेसाठी दोघे दोन दिशाना पळाले. जगदिश यांनी एका ओहोळात उडी घेतली व ते गोळ्या चुकवीत पुढे जाउ लागले. मात्र ओहोळातून बाहेर येताच त्यांना गोळ्या झाडून जागीच ठार केले. सुखदेराज पकडले गेल्यावर त्यांना ही माहिती समजली. मृत्य समयी जगदिश हे निःशस्त्र असतानाही आपण संरक्षणार्थ गोळीबार केला व आपल्यावर गोळ्या झाडणारा जगदिश चकमकीत मारला गेला असा खोटा अहवाल त्यांनी सादर केला. त्यांच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांना न देता परस्पर जाळला गेला. जगदिशच्या सत्र न्यायाधिश असलेल्या आजोबांनी हे खोटे असल्याचे व पोलिसांना 'क्रांतिकारकांना दिसताच गोळ्या घाला' असे हुकुम असल्याचे पो. उपमहानिरिक्षक दिक्षित यांच्या कडून न्यायालयात वदवून घेतले. सत्य असे होते की त्यांना सुखदेवराज समजून गोळ्या घातल्या गेल्या होत्या.


असे असंख्य हुतात्मे होउन गेले ज्यांची नावेसुद्धा इतिहासाला ज्ञात नाहीत. असे अनेक हुतात्मे आहेत ज्यांचे नाव व कार्य आपल्याच देशात कुणाला फारसे माहित नाहीत. अशा वीरांविषयी चार शब्द लिहून जर चार भारतियांना त्यांचे हौतात्म्य ज्ञात होणार असेल तर ते लिहिणे हे मी माझे परम कर्तव्य समजतो.


जगदिश यांच्या ७५ व्या हौतात्म्यदिनी त्यांना विनम्र आदरांजली.