पुस्तकांविषयी : समिधा - साधना आमटे

बाबा आमटेंबरोबरच्या त्याग आणि सेवामय सहजीवनाची कहाणी अत्यंत साध्या शब्दात मांडणारे साधना आमटेंचे आत्मचरित्र म्हणजे समिधा. शब्दांकन जरी त्यांच्याच एका सहकाऱ्याने केले असले तरी साधनाताईंची कथनाची निगर्वी आणि सहज शैली तशीच कायम ठेवल्याचे जाणवते.


कुष्ठनिवारण आणि पुनर्वसनाचे काम करणारे आनंदवन, पंजाब पेटला होता तेंव्हाचे भारत जोडो आणि काही वर्षापूर्वी नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा यामुळे बाबा आमटेंचे कार्य व चरित्र वृत्तपत्रे व पुस्तकांद्वारे बऱ्यापैकी लोकांसमोर आले आहे, पण तरीही साधनाताईंच्या स्वानुभवाच्या बोलातून अनेक नवे तपशील, पैलू हाती लागतात.


एका सुखवस्तू परिवारातील इंदू घुलेचा, मुरली आमटे या ध्येयवेड्या तरूणाशी त्या काळात होणारा प्रेमविवाह, आणि त्यानंतर लगेच सुरू होणारे समाजसेवेचे कधी थोडे यशस्वी झालेले तर कधी फसलेले श्रमाश्रम सारखे प्रयोग, एका भेसूर कुष्ठरोग्याला बाबा घाबरले तो त्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा क्षण, कुष्ठ्धाम उभारण्याची धडपड, अविरत परिश्रम, हालअपेष्टा, आर्थिक टंचाई, आजारपण यावर मात करून उभारलेला प्रकल्प हा सर्व प्रवास त्या इतक्या विलक्षण समरसतेने विशद करतात की आपणच त्याचे सहप्रवासी असल्याचा अनुभव घेतो.


प्रकाश, विकास आणि रेणूकेचे बालपण, संस्कार, प्रगती आणि शेवटी याच कार्याला जीवन वाहून घेण्याचा त्यांचा संकल्प हेही असेच उलगडत जाते.


गावातील श्रीमंत मारवाडी वर्षातून एकदा गरीबांना भोजन देतात. त्याला भिकारजेवण असे म्हणत असत. बाबांच्या कार्याबददल सहानुभूती असल्याने ते एका वर्षी सर्व कुष्ठरोग्यांनाही पाठवा असा निरोप देतात. इकडे परिस्थिती हलाखीचीच असते, पण कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नाचा हा अपमान वाटून बाबा संतापतात आणि आमच्याकडे आम्हीच भिकारी आहोत असे म्हणून साधनाताईंसह स्वतःच त्या भिकारजेवणाला जाउन बसतात तो प्रसंग या विषयातले त्यांचे conviction  दाखवून देणारा आहे. त्यामूळेच खरे खरे पुनर्वसन शक्य झाले, माणसे, कुटुंबे स्वतःच्या पायावर उभी राहिली.


मदर तेरेसेंच्या कार्याचा बराच गवगवा केला जातो. त्यात मिशनरी प्रचारतंत्राचा भाग आहेच. त्यांचीही सेवा आहेच पण त्यांनी कायमचा डिपेंडन्स आणि त्यातून धर्मांतर असे जे कल्चर उभे केले त्यातून असे रचनात्मक काम उभे राहिले नाही.


पण तुलनेने फार उत्कृष्ट दर्जाचे काम असूनही बाबा आमटेंच्या कामाची नोंद घेतली गेली, तरी त्याला एवढे मोठे ग्लॅमर वा आर्थिक पाठबळ मात्र प्राप्त झाले नाही. आता विकास आमटेंनी मोठ्या प्रमाणावर विस्तार हाती घेतला आहे असेही शेवटच्या प्रकरणातून लक्षात येते.


प्रकाश आमटेंच्या हेमलकसा येथील वनवासी विकास प्रकल्प, प्राण्यांचे अनाथालय याबद्दलही थोडी माहिती येते, पण त्याबद्दलचे नेगल हे विलास मनोहरांचे पुस्तकही  छान माहिती देते.


एकंदर बाबांचा स्वयंस्वीकृतं कंटकाकिर्णमार्गं , त्याला साधनाताईंनी पावला पावलाला दिलेली तोलामोलाची साथ, त्याची बाबांनी ठेवलेली जाणीव आणि कधीतरी त्यांच्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक तत्वालाही घातलेली मुरड ( उदा. देवळात जाण्याचा प्रसंग) असा सर्व सेवामय सहजीवनाचा आलेख एक सुखद प्रेरणा देउन जातो.


पुस्तकात तथाकथित साहित्यिक शैलीचा अभाव आहे, मांडणी विस्कळीत आहे, पण जगलेले जीवनच एवढे प्रभावी आहे की अशा गोष्टींकडे लक्षही जात नाही.  वाचावेच असे पुस्तक.