आशाची काही गाणी

आशाची मला विशेष आवडणारी हिंदी मराठी गाणी देते आहे. या गाण्यावर अधिक चर्चा करायला- ऐकायला - वाचायला आवडेल..


१) अबके बरस भेजो भैय्या को बाबुल...
या गाण्यातल्या
"बैरन जवानीने छीने खिलौने और मेरी गुडिया चुरायी,
बाबुल थी मै तेरी जाजोकी पाली फिर कैसे हुई मै परायी"
या ओळी ऐकताना काहीतरी आर्त असं अंतराला स्पर्शून जातं. कसली तरी हुरहूर लागते आणि नंतर कितितरी वेळ हे गाणं डोक्यातच घोळत राहतं.


२)भंवरा बडा नादान है
मूर्तिमंत खट्याळपणा असं हे गाणं ऐकताना मनाला कशा गुदगुल्या होत असतात.
"कभी मंडलाये कभी उड जाये भेद जिया के खोले ना.
 सामने आये नैन मिलाये मुख देखे कुछ बोले ना"  किंवा
"अखियओमे रचके चले बचबचके जैसे हो कोई दीवाना
रहे संग दिलके मिले नही मिलके बन के रहे वो अंजाना"
या कडव्यांमधला मधेच रुसणारा मधेच वेडावून दाखवणारा तिचा आवाज म्हणजे हातात येतंय असं वाटेपर्यंत निसटून जाणारं सकाळचं दंव आहे.


३)विसरशील खास मला
निखळ वेदनेतून आलेला आर्त स्वर, त्यामागची ती तडफड, तिव्ह्या विद्ध काळजातून येणारी ती साद. " यापरता दृष्टीआड होऊ नको नाथा" ऐकताना पोटात निरगाठ बसल्यासारखी होते ... केवळ अप्रतिम  असंच हे गाणं आहे.


४) परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला....
हे गाणं ऐकताना अंगावर सरसरून काटा येतो. मास्टर दीनानाथांच्या आवाजात हे गाणं ऐकायला मला आवडेल. पण आशा हे असं गाणं काही म्हणते की झगझगीत सोनेरी प्रकाशाचं एक बेट चहूबाजूला तयार होतं. पूर्वकाळाच्या रंगीत सावल्यांमधली एका निघून गेलेल्या पिढीच्या कर्मयोगाची आणि कर्मनिष्ठेची कहाणी दिसू लागते.  


५)तू विसरून जा रे विसरून जा...
या गाण्यातली हतबल आर्तता आणि जिवाला डागण्या देणाऱ्या आयुष्यभराच्या ताटातुटीची वेदना विलक्षण आहे. "इच्छा एकच उरी धरी मी तुला वरावे पुढल्या जन्मी , या जन्मी तर असाच साहीन दैवाचा वनवास..." या ओळी अर्थ आणि सूर या दोन्ही दृष्टीने अविस्मरणीय आहेत........


--अदिती