मे १७ २००६

मोडेन, पण वाकणार नाही

महावीरसिंह. जन्म १६ सप्टेंबर १९०४, शाहपूर टहला, जिल्हा एटा, उत्तर प्रदेश.
हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेचा एक खंदा योद्धा. आझाद व भगतसिंह यांचा निःसीम भक्त. साँडर्स वधाच्या वेळी भगतसिंह, राजगुरु इत्यादींना त्यानेच सारथ्य करून दूरवर नेऊन सोडले होते.

 

mahavirOK

शालेय जीवनातच एका इंग्रजधार्जीण्यांच्या सभेत वंदे मातरम् च्या घोषणा देणारा व त्यासाठी शिक्षा भोगणारा हा मुलगा पुढे महाविद्यालयीन जीवनात सशस्त्र क्रांतीकडे आकर्षित झाला.मुळात राष्ट्राभिमान प्रखर, त्यांत महाविद्यालयात डॉ. गयाप्रसादांसारखी संगत लाभली. महावीरसिंहांनी आपले आयुष्य क्रांतिमार्गे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वाहून घेण्याचा निश्चय केला. इकडे पित्याने लग्न ठरविल्याची कुणकुण कानी आली. आता काय करायचे? मग डॉ. गयाप्रसाद यांनी सुचविले की आता सरळ खरे काय ते वडिलांना सांगून टाक. महावीरसिंहांनी वडिलांना पत्र लिहून कळविले की त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे आणि लग्न , संसार यांत त्यांना रस नाही. ते अस्वस्थ पणे पित्याच्या उत्तराची वाट पाहत होते. उत्तर आले.

देविसिंहांनी, म्हणजे त्याच्या वडिलांनी लिहिले होते, " मी आतापर्यंत खंत करीत होतो की आपल्या खानदानात केवळ गुलामांचेच रक्त भरले आहे की काय? आज तुझे पत्र वाचून मला तुझा अभिमान वाटतोय. तू ज्या मार्गावर जात आहेस, तो अतिशय खडतर आहे. तिथून कुणी परत येत नाही. तेंव्हा जाण्यापूर्वी नीट विचार कर आणि मगच जा. मात्र एकदा गेलास तर पुन्हा मागे वळून पाहू नकोस. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. मात्र दोन गोष्टी लक्षात ठेव. पहिली अशी की काहीही झाले तरी साथीदारांना कधी दगा देऊ नकोस आणि दुसरे असे की माझी मान शरमेने खाली जाईल असे काहीही करू नकोस. एक पिता मुलाला सांगत होता की मेलास तरी ताठ मानेने व सन्मानाने मर! धन्य तो पुत्र आणि धन्य तो पिता. मात्र अशी पत्रे कधी प्रसिद्ध झालीच नाहीत. सरकारमान्य त्यागाच्या हकीकती आम्ही पुस्तकात जरूर वाचल्या; त्या अश्या की जवाहर तुरुंगात गेला तेंव्हा मोतीलाल आपल्या महालात गादीऐवजी चटईवर झोपू लागले.

पुढे अनेक क्रांतिकारक पकडले गेले. महावीरसिंहांची रवानगी मियाँवाली तुरुंगात झाली. तिकडे भगतसिंह व साथीदाराने राजबंद्यांचा दर्जा व सन्मान्मनिय वर्तणूक मिळावी यासाठी उपोषण सुरू केले तर इकडे महावीरसिंहांनी सुरू केले. इंग्रजांना हे उपोषण मोडून काढायचे होते. इंग्रज डॉक्टरच्या मदतीने कैद्यांच्या नाकावाटे रबरी नळ्या खुपसून पोटात दूध ओतून उपोषण मोडू पाहत होते. हे लोक कोठडीत येताना दिसले की महावीरसिंह आपल्या ताकदीने दरवाजा रोखून धरायचे. बरीच झटापट झाल्यावर अखेर दरवाजा उघडायचा. मग आंत पुन्हा दंगा. मोठ्या प्रयासाने शिपाई महावीरसिंहांचे हातपाय जखडून ठेवायचे, मग डॉक्टर छाताडावर बसून नळ्या खुपसायचा. मात्र नेमका मोक्याच्या वेळेला महावीरसिंह असा हिसडा देत की दूध सांडून जाई. मग हे लोक हात हालवितं परत जात असत.हे पोलीस मनोमन आश्चर्य करीत असावेत  की दिवसच्या दिवस उपास केलेल्या या लोकांच्या अंगात इतकी शक्ती येते कुठून?

इंग्रजांनी क्रांतिकारकांची फाटाफूट केली. महावीरसिंह व गयाप्रसाद यांची रवानगी कर्नाटकात बेल्लारी येथे झाली. इथल्या तुरुंगाधिकाऱ्याला मुष्टियुद्धाचा शौक होता. तो शिपायांकरवी कैद्यांना जखडायचा आणि मग त्यांच्यावर; विशेषतः तोंडावर ठोसेबाजीचा सराव करायचा. हा प्रकार जवळ जवळ वर्षभर चालला होता. एकदा जेवण झाल्यावर शतपावली करताना त्याला मुष्टियुद्धाची लहर आली. महावीरसिंहांना शिपाई घेऊन आले. त्यांनी बेड्या न जखडता हात घट्ट धरून ठेवले होते. तो तुरुंगाधिकारी मारू लागताच माहावीरसिंहांनी एक बेसावध क्षण अचूक टिपला. पिंजऱ्यात असला, साखळदंडांनी बांधलेला असला तरीही तो सिंह होता. त्याने आपले हात निमिषार्धात सोडवून घेत त्या अधिकाऱ्याच्या थोबाडावर एकच ठोसा असा लगावला की तो झीडपीडत भीतीवर गेला. अपमान सहन न होऊन तो निघून गेला. मात्र या प्रमादाबद्दल दुसऱ्या दिवशी महावीरसिंहांना ३० फटक्यांची शिक्षा दिली गेली. शिपाई मारत होते, महावीरसिंह फटक्यागणिक 'इन्किलाब झिंदाबाद' चा घोष करीत होते.कपडे रक्ताने भरले. नेहमींप्रमाणे फटके संपताच दोन शिपाई रुग्णशय्या (स्ट्रेचर) घेऊन आले. त्यांच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकीत महावीरसिंह आपल्या पायांनी चालत परत गेले. आता त्यांना देण्यासारख्या शिक्षा संपल्या होत्या.

मुक्काम बेल्लारी हून हालला आणि ते मद्रास तुरुंगात आले. लगेचच त्यांना मालमोटारीतून बाहेर काढले गेले. मोटारी थेट बंदरावर पोहोचल्या. बंदरात उभी असलेली 'महाराजा' बोट पाहताच ते समजून चुकले की आता अंदमान! अंदमानाहून त्यांनी आपल्या पित्याला म्हणजे देविसिंहाना पत्र पाठवले व आपले बटुकेश्वर दत्त वगरे जुने मित्र येथे भेटल्याने आपण खूश असल्याचे सांगितले. देविसिंहांचेही उत्तरादाखल पत्र आले. त्यांनी लिहिले होते - "वा! अंदमान म्हणजे साक्षात हिऱ्यांचा टापू! इथे इंग्रजांनी हिंदुस्थानांतले सगळे निवडक हिरे जमविले आहेत. तू इथे आलास आता तुलाही झळाळी लाभेल" अंदमानाला गेलेला मनुष्य कधीच जिवंत परत येत नाही हे ठाऊक असतानाही एका पित्याने पुत्राला असे तेजस्वी पत्र लिहिले होते.

अंदमानात नव्या रंगमंचावर जुनाच खेळ पुन्हा सुरू झाला.  कैद्यांना मिळणारी  अमानुष वागणूक व घाणेरडे अन्न याच्या निषेधार्थ महावीरसिंहांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसले. १२ मे १९३३. इंग्रजांना हे परवडणारे नव्हते. सहाव्या दिवशी म्हणजे १७ मे १९३३ रोजी त्यांना जबरदस्तीने दूध पाजायचा प्रयत्न केला गेला. जणू महावीरसिंह मृत्यूला खेचत होते तर इंग्रज मृत्यूला त्यांच्या मिठीतून सोडवायचा प्रयत्न करीत होते. अखेर इंग्रज जिंकले. दुधाच्या नळ्या घुसवून दूध ओतण्यात ते यशस्वी झाले होते. मात्र हा आनंद क्षणभरही टिकला नाही. जबरदस्त प्रतिकारामुळे दूध अन्ननलिके ऐवजी फुफ्फुसात शिरले होते. हे समजताच धावपळ उडाली. पण आता उशीर झाला होता. अखेर महावीरसिंहच जिंकले होते. १७ मे १९३३ रोजी त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले.

ही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून हुतात्मा महावीरसिंहांचा मृतदेह रातोरात अंदमानच्या समुद्रात लाटांवर सोडून देण्यात आला. त्यांचे आदर्श असलेल्या आझाद, भगतसिंह यांच्याप्रमाणेच त्यांनाही अंत्यससंस्कार न होण्याचे भाग्य लाभले, कारण इंग्रज सरकारला त्यांची भिती त्यांच्या मृत्यूनंतरही कायम होती. आज हुतात्मा महावीरसिंहांच्या हौतात्म्यदिनी त्यांना  नम्र अभिवादन.

Post to Feedहेच
अभिवादन
सहमत!
अभिवादन
हेच
प्रणाम
हेच
न ऐकणारी मुले
इन्किलाब झिन्दाबाद!
खरा सिंह !
छान!
वंदे मातरम
नतमस्तक..
सहमत
धन्यवाद!
तेजस्वी...
विकृत व उन्मत्त

Typing help hide