अभिनंदन अवकाशवेध !

राज्य मराठी विकास संस्थेने जनभारती (सीडॅक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविभागाच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची पहिली खुली स्पर्धा आयोजित केलेली होती.तिच्यात प्रभादेवी मुंबईच्या सचिन पिळणकरांच्या 'अवकाशवेध' ह्या संकेतस्थळाला पहिले पारितोषिक मिळाले, ही अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे

अवकाशवेध सुंदर संकेतस्थळ आहे. फ़्लॅश, पॉवरपॉइंट ह्यांसारख्या अद्ययावत तंत्रांच्या साहाय्याने खगोलशास्त्रीय गोष्टींची माहिती आहे. एखाद्या वैज्ञानिक विषयावर संपूर्णपणे मराठीत संकेतस्थळ बनवणे, ते सतत जोपासणे, वाढवत जाणे आणि नवनव्या तंत्रांचा वापर करून ते कायम अद्ययावत स्थितीत ठेवणे ही गोष्ट अजिबात सोपी नाही. तांत्रिक बाजूला अनेक वेळा संगणकांच्या चालक प्रणाली, ब्राऊझर इत्यादींची मानके बदलतात आणि त्याला अनुरूप बदल करीत त्यांच्याशी सतत जमवून घ्यावे लागते. खगोलशास्त्रासारखा मूळ विषयही रोज नव्या नव्या लागणाऱ्या शोधांमुळे आणि अवगत होणाऱ्या माहितीमुळे संकेतस्थळ अद्ययावत ठेवणे क्रमप्राप्तच असते आणि तिसरे म्हणजे हे सर्व जाणीवपूर्व मराठीत बिनचूकरीत्या करीत राहणे, हे ही तितकेच जिकीरीचे आहे. अशा संकेतस्थळाला भेट देणाऱ्या लोकांच्या सतत उंचावणाऱ्या अपेक्षा पुऱ्या करणे हे अतिशय कष्टाचे काम आहे. डॉ. बाळ फोंडके (सुप्रसिद्ध विज्ञानकथालेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक), प्रा. मं. गो. राजाध्यक्ष (जे जे स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट्स चे माजी अधिष्ठाते) आणि इतर त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ परीक्षकांकडून होणाऱ्या कठोर परीक्षणातून ह्या पहिल्या पारितोषिकाचे मानकरी ठरणे हे त्यामुळेच अत्यंत अभिनंदनीय आहे. त्यासाठी सचिन पिळणकर ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

अशी तंत्रविज्ञानावर आणि इतर ज्ञानाच्या आणि अनुभवांच्या विषयांवर आधारलेली नवी नवी संकेतस्थळे मराठीत बनवायला आता अधिकाधिक लोकांना प्रोत्साहन मिळेल ह्यात शंका नाही. राज्य मराठी विकास संस्था, सीडॅक आणि महाराष्ट्र शासन ह्यांनी पुढाकार घेऊन अतिशय योग्य दिशेने पाऊल उचललेले आहे असेच म्हणावे लागेल. अशा स्पर्धांतून मिळालेले बक्षीस घेणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

मनोगताला दुसरे बक्षीस मिळाले. स्पर्धा जाहीर झाली तेव्हा मनोगताचे ऊर्ध्वश्रेणीकरणाचे काम ऐन भरात होते. त्याचवेळी वेधक पण भडक नाही, अशी नवी रंगसंगती, नवी रचना करण्यात सौ. अल्पना वेलणकर आणि चि. सलील वेलणकर ह्यांचे मार्गदर्शन आणि सूचना असे मोलाचे सहकार्य लाभले हे आवर्जून सांगावेसे वाटते. त्यांच्या मदती (आणि सहनशीलते)विना मनोगताचे काही काम करणे अतिशय अवघड आहे! मनोगताच्या यशात मनोगतावर नियमित/नैमित्तिक लेखन करणाऱ्या, प्रतिसाद देणाऱ्या, समीक्षा, टीका, सूचना, मार्गदर्शन ह्याद्वारे संकेतस्थळ सतत सचेतन अवस्थेत ठेवणाऱ्या समस्त मनोगतींचा, त्यांच्या मित्रमंडळींना आणि प्रियजनांचा फार महत्त्वाचा वाटा आहे.

बक्षीस मिळालेल्या इतरसंकेतस्थळांवर जाताना काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळी ती सर्व बघता आली नाहीत.

ह्या सर्व पारितोषिकप्राप्त संकेतस्थळांच्या कर्त्यांचे हार्दिक अभिनंदन.