मे २९ २००६

दोन महापुरुष

हा लेख खरेतर कालच प्रसिद्ध होणे उचित होते, परंतु काही कारणाने जालाशी संपर्क साफ तुटल्याने मी हा लेख काल देऊ शकलो नाही, क्षमस्व!

२८ मे म्हणजे स्वा. सावरकरांची जयंती तर हु. भगवतिचरण व्होरा यांची पुण्यतिथी. दोघेही 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' या विचाराचे होते. दोघेही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समर्पित जीवन जगले, दोघांनीही उपेक्षेची तमा न बाळगता आपले व्रत चालूच ठेवले.

स्वा. सावरकरांनी नव्या शतकात पुन्हा नव्याने क्रांतिज्योत चेतविली तर भगवतिचरण स्वतःच ज्योतीची वात झाले व जळून गेले. स्वा. सावरकरांची चेतना इतकी प्रभावी होती की तिने परदेशात हौतात्म्य साकारणारा मदनलाल धिंग्रा निर्माण केला तर दोन दशकांनंतर भगतसिंगाला स्फूर्ती दिली. राजकारण, समाजकारण, साहित्य या सर्व क्षेत्रात या महात्म्याचे महान कार्य आहे.

हु. भगवतिचरण व्होरा हे तर एका वृक्षाचे जीवन जगले ज्याने अनेकांना आसरा, दिला, धीर दिला, फळे दिली व अखेर जीवनही समर्पित केले. सुरुवातीच्या काळात हिं. स. प्र. से. मध्ये असा लोकापवाद होता की भगवती हे गुप्तचर खात्यातले असून ते क्रांतिकारकांच्या पाळतीवर आहेत. मात्र या महान आत्म्याने कधी त्रागा केला नाही की तक्रार केली नाही, फक्त गैरसमज दूर होण्याची वाट पाहिली. यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रकार्यासाठी स्वतःला समर्पित केले होते. प्रत्यक्ष क्रांतीकार्यातील सहभागा बरोबरच भूमिगतांना आसरा देणे, वेळोवेळी खाद्यपदार्थ व आर्थिक मदत करणे हे अव्याहत सुरू होते. लाहोरात साँढर्स्ट वधानंतर शीख तरुणाचा शोध सुरू झाला तेंव्हा भगतसिंहाला निसटून जाता यावे यासाठी भगवतीबाबूंनी  आपली पत्नी दुर्गावती व अडीच वर्षाचा पुत्र सचिंद्र याच्या जीवाचा धोका पत्करून त्यांना भगतसिंहाचे कुटुंबीय म्हणून त्याच्याबरोबर कलकत्त्याला धाडले.

१ जून १९३० रोजी भगतसिंहाला बोर्स्टल तुरुंगातून बाहेर काढण्याचा बेत ठरला होता. त्यासाठी कानपुराहून बॉम्बं आले होते. त्याची परीक्षा घेण्यासाठी २८ मे रोजी रावी नदीच्या किनारी दाट झुडुपात सगळे जमले. भगवतिबाबूंनी स्वतः स्फोट करून पाहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. अचानक बॉम्बं ची टोपी सदोष असल्याचे सुखदेवराज यांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनी चाचणी रद्द करण्याचा आग्रह धरला. मात्र भगतसिंहाला जर १ जून ला सोडवायचा असेल तर आज चाचणी झालीच पाहिजे, पुढे ढकलणे शक्य नाही असे म्हणत भगवतिबाबू एकटे झुडुपांत शिरले व स्फोट करताना अपेक्षेआधीच स्फोट होऊन त्यांत भगवतिबाबू शहीद झाले. त्यांच्या मृत्यूमुळे हिं‌.प्र. स. से वर मोठा आघात झाला. मात्र त्यांच्या भगिनी सुशिलादिदी व पत्नी दुर्गावती या दोघींनीही त्यांच्या पश्चात वारसा हक्काने त्यांचे कार्य चालविण्याचा निर्धार व्यक्ते केला. दुर्गावतींनी पतीनिधनानंतर सर्व दागिने उतरवून आझाद यांच्या हवाली केले व सांगितले की त्यांच्यापेक्षा आता संघटनेला या दागिन्यांची  अधिक गरज आहे, तेंव्हा आझाद त्यांच्या पायावर डोके ठेवून रडले होते. पुढे मुंबईत लॅमिंग्टन रोड येथे पोलीस स्थानकांत घुसून गोळीबार करण्याच्या हिं स प्र से च्या कामगिरीत दुर्गावती स्वतः सामील होत्या. जेव्हा वर्तमान पत्रात या हल्ल्याची बातमी जाहीर झाली व त्या बातमीत 'केस वर बांधून पुरुष वेष धारण केलेली महिला सामील होती' असे सांगितले तेंव्हाचं आझादांनी ओळखले की त्या दुर्गावतीच असल्या पाहिजेत.

समर्पित जीवन जगलेल्या त्या महापुरुषांना नम्र अभिवादन

Post to Feedनतमस्तक!
कृतज्ञ
सुंदर...
अभिवादन
सहमत
कृतज्ञ
नाही चिरा नाही पणती!
धन्यवाद
सहमत/असेच
सहमत
सहमत
दुर्गावतीदेवी
प्रणाम !
प्रणाम

Typing help hide