जून २००६

९ जून १९३१

आझादांचे एक एक सहकारी पकडले जात होते वा पोलीसांच्या गोळ्य़ांना बळी पडत होते तसे नवीन तरुण भगतसिंह प्रभृतिंच्या फाशीमुळे पेटून क्रांतिकार्यात स्वतःला झोकून देत होते.  भगतसिंह व सहकाऱ्यांची फाशी व पंजाबातील जनतेवर होणारी दडपशाही आणि अत्याचार याचे जनक होते पंजाबचे गव्हर्नर सर जॉफ्रे डी-मॉण्टेमोरेन्सी. पंजाबातील अत्याचारांचा प्रतिशोध म्हणून मॉण्टेमोरेन्सीला कंठस्नान घालायला एक रगेल तरुण पुढे आला.

  

harikishan

त्याचे नांव हरिकिशन. वायव्य सरसीमेवरील एक प्रतिष्ठीत जमीनदार गुरुदासमल यांचे सर्वात धाकटे व नववे पुत्ररत्न, ज्याचे वडील बंधू भगतराम राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाल्याबद्दल तुरुंगात शिक्षा भोगत होते. काकोरी कटातील बहाद्दर क्रांतीकारकांप्रमाणे फाशी जायची आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगीतले. वायव्य सरहद्द प्रांतात हत्यारे व काडतूसे यांना काय तोटा? हरिकिशन यांनी नेमबाजीचा गृहपाठ सुरू केला व नेमबाजीत प्राविण्य मिळवीले.


त्याच सुमारास आणखी काही तरुण मॉण्टेमोरेन्सीला मारायचा कट करीत योजना आखत होते व ते होते - देवराज, चमनलाल, दुर्गादास खन्ना, रणवीर आणि केवल कृष्ण; पैकी चमनलाल हे पेशावर नॅशनल स्कूलचे विद्यार्थी व स्टुडंटस युनियनचे अध्यक्ष व हरिकिशनचे सख्खे चुलत भाऊ. चमनलाल यांनी हत्येची योजना आखली व तिच्यावर हरिकिशन यांना नियुक्त करून त्यांना लाहोरला बोलावले. इकडे हरिकिशन घरातून बेपत्ता झाले व घरात खळबळ माजली.

हरिकिशन अले ते अंगात सीमा प्रांतातील पठाणी विजार, पांढरा सदरा नी त्या काळी प्रचलीत असलेला पण जाड सैनिकी कापडाचा डबल ब्रेस्ट चा खाकी कोट, डोक्याला पठाणी फेटा व पायात जाडजूड पठाणी वहाणा अशा थाटात. इकडे दुर्गादास खन्ना यांनी तुरुंगात फाशीच्या प्रति़क्षेत असलेल्या भगतसिंहापर्यंत योजना पोहोचवीली व अनुमोदन मागीतले. आपण इथे अडकलो असल्याने काहीच करू शकत नाही मात्र हिंमत असेल तर तुम्ही काही करा असा त्यांचा निरोप आला. हरिकिशन यांना स्फुरण चढले.

याच सुमारास विधी महाविद्यालयात तृतिय वर्षाच्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीनेही क्रांतिकार्यात रस घेतला होता. तीने अनेकदा पैसा व एकदा दागिने देखिल कार्यासाठी दीले होते. ही तरुणी पदवीदान समारंभासाठी जाणार होती आणि तिथे समारंभाचा अध्यक्ष म्हणून मॉण्टेमोरेन्सी उपस्थित राहणार होता. प्रत्यक्ष त्या तरुणीलाच विरेंद्र यांनी 'तू त्या नीचावर गोळी झाडशील का' असे विचारले व तीने उलट प्रश्न केला, 'की असे काम काय तरूणच करू शकतात असे तुम्हाला वाटते की काय?' व आपण ही कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. मात्र सर्वांच्या असे लक्षात आले की यासाठी पिस्तूल हाताळणे व नेमबाजीचा सराव आवश्यक आहे, मात्र निर्जन जागी जाउन ते करणे तीला शक्य होणार नाही व तीच्या घरच्यांना पत्ता लागेल व सगळा बेत फसेल यास्तव तीला परावृत्त केले गेले. तिने आपल्या वडिलांची पदवीदान समारंभाची आलेली पत्रिका मात्र या लोकाना गपचुप आणून दिली व वधकऱ्याचा प्रवेश सुकर केला.

समारंभाच्या स्थळी पंजाबात सरकारी व विशेषतः गोऱ्या अधिकाऱ्यांवर होणाया हल्लयांची चढती कमान पाहता प्रचंड बंदोबस्त तैनात होता. प्रवेशिकांची कसून तपासणी केली जात होती. ते पार करून हरिकिशन आपले पिस्तूल घेऊन आंत प्रवेशले. महाशय व उपकुलगुरू उच्चासनावर बसले होते. त्यांना नीट पाहून घेत हरिकिशन वर गॅलरीत गेले. पदवीदान व भाषण संपले, मंडळी समारंभपूर्वक मिरवणुकीने जाण्यास मुख्य द्वाराकडे निघाली. बरोबर मोका साधत हरिकिशन यांनी उभे राहून पिस्तूल काढले व मॉण्टेमोर्न्सीवर गोळ्या झाडाला सुरुवात केली. पहिली गोळी चुकुन दुसया प्राध्यापिकेला लागली, लगेच दुसरी गोळी झाडली ती मात्र मॉण्टेमोरेन्सीच्या दंडाला लागली. कुणीतरी गोळ्या झाडतय हे लक्षात येताच तो पळू लागला. त्याबरोबर हरिकिशन यांनी गॅलरीतून थेट खाली उडी मारली व पहारा चुकवित जवळ जाण्याचा प्रयत्न करित पुन्हा गोळी झाडली व ती कमरेत लागली आणि मॉण्टेमोरेन्सी कोसळला. पोलीसांनी झडप घालत हरिकिशन यांना अटक केली. फितुरांच्या साथीने एकूण अकरा जणाना गुन्हेगार म्हणून उभे केले गेले. मात्र हरिकिशन यांनी अमानुष छळाला न जुमानात अपण एकटे असल्याचे सांगीतले व अखेर पुराव्या अभावी इतर सर्वाना सोडावे लागले. त्यांनी पोलीसांना सहा गोळ्यांचा हिशेब देत सांगिटले की चार मॉण्टेमोरेन्सीला व दोन मला अशा सहा गोळ्या मी पिस्तुलात भरल्या होत्या. तुला पत्रिका कशी मिळाली या प्रश्नाचे उत्तर देण्याचे नाकारत ते पोलीसांना म्हणाले की ते शोधायचे काम तुमचे आहे.

न्यायालयात सुनावणी चालू असताना, बॅरिस्टर असफ अली बचावाचे भाषण देत असताना हा रगेल तरूण मिशांना पीळ देत शांतपणे बाकावर बसला होता. त्यांनी आपल्या भाषणात असे सांगीतले की " माझ्या राष्ट्राचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अवलंबलेला अहिंसेचा मार्ग इंग्रजांनी दडपला, अत्याचार केले. या अत्याचारांमुळे व चर्चिल सारखे लोक कधीही हिंदुस्थान स्वतंत्र होऊ देणार नाहीत हे लक्षात आल्यावर माझा अहिंसेवरील विश्वास उडाला. मला हिंसा करायची हौस नाही पण हिंदुस्थानची परिस्थिती साऱ्या जगाला कळावी म्हणून त्या जुलुमी अधिकायाला जखमी करण्यासाठी गोळ्या झाडल्या. मला त्याला ठार मारायचा नव्हता. पोलीसांनी बळेच कागदावर स्वाक्षरी घेतली असून मी कसलाही कबुलीजबाब देत नाही". अर्थात सरकारचा निकाल आधीच ठरलेला होता.

हरिकिशन यांना भगतसिंहाप्रमाणे आपणही फाशी जाणार याचाच आनंद झाला.मियाँवली तुरुंगात फाशी जाण्या पूर्वी त्यांचे वजन मृत्युच्या छायेत तब्बल नऊ पौंडांनी वाढल्याचे आढळले. ९ जून १९३१ रोजी ते हसत फाशी गेले व जाताना सांगून गेले की याच देशात पुन्हा जन्म मिळावा व पुन्हा सशस्त्र क्रांतीमध्ये  भाग घेता यावा व हे देश स्वतंत्र होइपर्यंत चालूच रहावे हे आपले ध्येय आहे. त्यांनी आपले अंत्यसंस्कार भगतसिंहाचे दहन जीथे झाले तिथेच केले जावे अशी शेवटची इच्छा व्यक्त केली.

फाशी नंतर गुरुदासमल यांनी मुलाच्या मृतदेहाचा ताबा मिळावा अशी तार पंजाब सरकारला केली मात्र सरकारने रिवाजा प्रमाणे त्यांचा मृतदेह घाईने जवळच्या एका कबरस्तानात जाळून टाकला गेला, अस्थी घाइघाईने अज्ञात स्थळी विसर्जित केल्या गेल्या.

गेल्या शतकाच्या चौथ्या दशकात म्हणजेच हिं. स. प्र. से. च्या कारकिर्दीत जे अनेक वीर हौतात्म्य पावले आणि ज्यांच्या मृतदेहाची देखिल ईंग्रजांनी धास्ती घेतली होती, त्यांत हरिकिशन यांनी आपल्या आदर्शा प्रमाणेच आपलेही नाव लिहिले. त्यांच्या ७५ व्या हौतात्म्यदिनी त्यांना सादर प्रणाम.


 

Post to Feedनतमस्तक
सहमत.
अभिवादन
हीच...
अभिवादन
आभार
नवीन माहीती
अभिवादन
अभिवादन
अभिवादन

Typing help hide