चिरनूतन
निळ्याभोर लाटांवर,
शुभ्र रंगावली,
सरत्या सूर्यप्रकाशात,
चमके वाळू ओली!
वाऱ्यासंगे थरथरती,
सुरुबनातुन सावल्या,
कुठल्या स्वप्नांसाठी,
दिवसभर झुरल्या?
दूरात सागरवक्षावर,
संथ नाव तरंगे,
पलिकडे क्षितिजावर,
नभ धरणीला बिलगे!
फिरे चराचरावर,
सूर्याचा प्रेमळ हात,
उन्हं पिऊन तवानी,
लाल-लाल पायवाट!
बंदरावरील लगबग,
सारी आता विरेल,
काळोख पांघरुन एकला,
ध्यानस्थ सागर उरेल!
चिरनूतन ही सायंकाळ,
पिऊ दे क्षण न क्षण तोवरी,
उद्या, परवा,रोज,
फिरुन येणार तरी!
--मुक्ता