जुलै ११ २००६

ऐकावे ते नवलच-अमेरिकेतील पूल

ऐकावे ते नवलच- अमेरिकेतील पूल

             पुलांच्या माहितीत पूल कोठे आहे, पूल कोणी व केंव्हा बांधला ते सांगितलेले असते. शिवाय त्या पुलाच्या बांधकामासाठी वापरलेले तंत्रज्ञान आणि बांधकामासाठी जर विशेष साहित्य वापरले असेल तर त्याची नोंद असते.  बरेचदा पुलाच्या दोन टोकामधील अंतर (लांबी) आणि पुलाची उंची , रुंदी ही महत्त्वाची परिमाणे सुद्धा दिलेली असतात. आतापर्यंत बहुतेक सर्व पुलांविषयी ह्यापैकी जी माहिती मिळू शकली ती दिलेली आहे.  या भागात अमेरिकेतील काही निवडक व प्रसिद्ध पुलांची माहिती करून घेऊ या.

ब्रुकलीन ब्रिज

जॉन रोबलिंगचे जगातील सर्वात मोठा लोंबता पूल बांधण्याचे स्वप्न होते. न्यूयॉर्क मध्ये ईस्ट नदीवर पाण्यात मध्यभागी खांब न रोवता एकसंध पूल बांधण्याची त्याची मनीषा होती. म्हणजे जवळजवळ १६०० फूट अंतर जोडणारा पूल त्याला बांधायचा होता. एवढे अंतर याआधी कोणत्याही एकसंध पुलाने जोडले नव्हते.   ह्या पुलाच्या बांधकामाने जॉनला आपले स्वप्न  पूर्ण करण्याची संधी मिळाली.  हा पूल लोंबत्या पुलाच्या स्थापत्यशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ह्या पुलाच्या बांधणीत ग्रॅनाइटचे दोन मोठे मनोरे दोन बाजूंना आहेत. त्यांची उंची नदीच्या  पात्रापासून २७६ फूट आहे. पाच हजाराहून जास्त स्टीलच्या तारांनी या पुलाला आधार दिला आहे.  त्या लोंबत्या तारेचा व्यास ४० सें. मी. आहे.  दुर्दैवाने ह्या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याआधी त्याचा जनक  जॉन रोबलिंग याचे आजारपणाने दुःखद निधन झाले.  पुलाच्या बांधकामाचे निरीक्षण करताना जॉनला इजा झाली आणि नंतर जॉन स्वतःच त्यावर उपाय करत होता. त्याने दुखणे वाढले आणि त्यामुळे त्याचा अंत झाला.   ह्या पुलाच्या बांधकामात कामगार व देखरेख करणारे अभियंते ह्या सर्वांना आजाराचा सामना करावा लागला अशी नोंद आढळते. जॉनच्या निधनानंतर हा पूल जॉनचा मुलगा व सून यांनी पूर्ण केला.  २४मे १८८३ रोजी ह्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.   

bruklin bridge


जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज

न्यूयॉर्क येथे हडसन नदीवर १९३१ साली हा कमानीचा पूल बांधण्यात आला. हा पूल ३५०० फूट लांब आहे.  अभियंता ओथमार अमान याने या पुलाची रचना आखली होती.  मूळ आराखड्यात दगडांनी आधार दिलेले स्टीलचे दोन मुख्य मनोरे होते परंतू मंदीमुळे असणाऱ्या पैशाच्या तुटवड्याने शेवटी ते मनोरे नुसते स्टीलचेच ठेवण्यात आले. ह्या पुलावरचा एकसंध रस्ता चार जाडजूड साखळदंडावरून लोंबता सोडला आहे. त्यापैकी प्रत्येक साखळदंडात सव्वीस हजाराहून अधिक लोंबत्या तारा आहेत. ह्या तारांची एकूण लांबी १६०९०० किमी आहे. १९६२ मध्ये ह्या पुलावर दुसरा कमी उंचीचा आणखी एक रस्त्याचा पदर जोडण्यात आला. सुदैवाने आपल्या आराखड्यात व नियोजनात अमानने ह्याची तरतूद केली होती म्हणूनच असे करणे शक्य झाले.  अमानने ह्यानंतर अमेरिकेतील सर्वात जास्त लांबीचा लोंबता कमानीचा पूल "वेराझनो नॅरोज ब्रिज' बांधला. त्याची माहिती पुढे दिली आहे.

DSC01026

 

वेराझनो नॅरोज ब्रिज

न्यूयॉर्क येथे ओथमार अमान व व्हिटने या दोघांनी बांधलेला वेराझनो नॅरोज हा पूल १९६४ साली वाहतुकीस मोकळा करण्यात आला. ह्या पुलाची एकूण लांबी ७२०० फूट आहे. नदीच्या पात्रापासून याची उंची २१६ फूट आहे.

 

02veraz

 

गोल्डन गेट ब्रिज
व्यापारासाठी अनेक संधी अमेरिकेत प्रवेश मिळाला की शक्य होत्या म्हणून सॅनफ्रॅन्सिस्कोला गोल्डन गेट असे टोपण नाव मिळाले होते . त्यामुळे या पुलाला गोल्डन गेट म्हणतात. ( त्याच्या रंगामुळे हे नाव पडलेले नाही.)  सॅन फ्रॅन्सिस्कोच्या खाडी आणि पॅसिफिक महासागराला जोडणाऱ्या या पुलाने सॅनफ्रॅन्सिस्को आणि मरीन काउंटी हेडलँड्स जोडले आहेत. याचा पाया कॉफरडॅम पद्धतीचा  असून त्यात ६५ फूट खोलीपासून कॉन्क्रीट भरले आहे. गोल्डन गेट पुलाचे दोन मजबूत खांब ७०० फुटांच्या उंचीवर आहेत. ह्या पुलाचा रुंदी आणि लांबीचे गुणोत्तर  १/६३(एकास त्रेसष्ट) असे आहे. त्यामुळे आधुनिक अशी एक निमुळती कलाकृती निर्माण झाली आहे. हा पूल बांधला तेव्हा जगातील सर्वात उंच लोंबते मनोरे या पुलाचेच होते. १९५७ साली पूर्ण झालेल्या मिशिगन राज्यातील मॅकनिऍक पूलाचे मनोरे मात्र याहून उंच आहेत.  पुलाला असणाऱ्या रेड ऑक्साइडच्या थराने सूर्यास्ताच्या वेळी हा पूल चमकताना दिसतो. ह्या पुलाचा मुख्या अभियंता जोसेफ स्ट्रॉस हा होता. त्याने अंदाजे एक लाख पौंड कॉन्क्रिट वापरून पुलाचे खांब उभे केले. त्याला एक खांब पूर्णपणे पाण्यात उभारावा लागला. अशा कमानीच्या पुलांना वाऱ्यापासून नेहमी धोका असतो, त्यामुळे वाऱ्याचा जोर गृहीत धरून पूल त्यानुसार तयार करावा लागतो. जेव्हा बांधकाम पूर्ण झाले तेव्हा  सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये हा पूल २० फूट एवढे हेलकावे घेत होता. त्या पुलाला खालच्या बाजूने योग्य ते जोड देऊन अभियंत्यांनी ह्या दोषावर मात केली. या पुलाची गणना 'अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनियर्सने 'जगातील आश्चर्यात केली आहे. स्टार ट्रेक, सुपरमॅन,वर्टिगो, बायसेंटिनियल मॅन अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात व मालिकांमध्ये या पुलाचे चित्रण आले आहे.

DSC01034

 

सॅनफ्रान्सिस्को ऑकलॅड बे ब्रिज
हा पूल १९३६ मध्ये बांधण्यात आला. दोन पूल जोडून तयार केलेले हा जगातील लोंबता पूल आहे. त्यापैकी पश्चिमेचा पूल हा लोंबता पूल आहे तर पूर्वेचा पूल हा कॅन्टेलिवर पूल आहे. पश्चिम खाडी ओलांडायचे एकूण अंतर ९२०० फूट आहे. पूर्वेच्या खाडीचे अंतर ११०००फूट आहे.

SFOBBnight

 

याक्विना बे ब्रिज

         ओरेगन राज्यातील न्युपोर्ट येथे हा पूल आहे. ह्या पुलाचा मुख्य अभियंता कॉन्डे बी मॅकॅलोव्ह हा आहे.  हा पूल १९३७ साली पूर्ण झाला.  स्टीलच्या सळयांना कॉन्क्रिटचा आधार देऊन कित्येक सळयांनी हा पूल तयार केला आहे. ह्या सळयांमधील अंतर १६० ते २६५ फूट आहे. त्यापैकी मुख्य कमान ही ६०० फूट आहे, तिची उंची पाण्यापासून २२६ फूट एवढी आहे. ह्या पुलाची एकूण लांबी ३२०० फूट एवढी आहे.

 

DSC01020

ड्रॉ ब्रिज
वॉशिग्टन राज्यातील सिऍटल येथे हा पूल आहे. साधारणपणे ड्रॉ ब्रिज हा कमी उंचीचा आणि कमी अंतर कापणारा असतो. हा पूल एका टोकाकडून किंवा मध्यभागातून वर उचलले जातो आणि पाण्यातील जहाजांना जाता येईल अशी सोय केलेली असते. शिकागो येथेसुद्धा असाच एक ड्रॉ ब्रिज आहे.

DSC01025

 

ब्रिज ऑफ अमेरिका
पनामा कालव्यावर ब्रिज ऑफ अमेरिका आहे. ह्या पुलाने उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंड जोडले आहेत. हा पुला अतिशय डौलदार दिसतो.

 

DSC01022

 यापुढील भागात आशियातील काही निवडक पुलांची माहिती पाहू या.

Post to Feedमाहितीपूर्ण लेख
बेंजामिन फ्रँकलिन
माहितीपूर्ण
सहमत
माहितीपूर्ण आणि रंजक
प्रियाली म्हणते तसेच
'विचित्र विश्व' ची आठवण झाली!
माझ्याही लहानपणी
छान
आभार
मस्त
सुंदर लेख/छायाचित्रे

Typing help hide