दुःखमुक्तीसाठी 'अहं ब्रह्मास्मि'

जगणे म्हणजे 'जग'णे, जग अनुभवणे. हे जग कोणी दुसऱ्या तिसऱ्याने निर्माण केलेले नसते तर प्रत्येकजण स्वतःच कल्पनेंत आपापले जग निर्माण करीत असतो व त्यांत तो जगत असतो. त्यामुळे प्रत्येकाचे जग वेगवेगळे असते. अनेकांच्या अनेक जगांतील बऱ्याच गोष्टी सारख्या दिसत असल्या तरी प्रत्येकाच्या जगांत त्यांचे स्थान किंवा महत्त्व वेगवेगळे असते व त्याप्रमाणे प्रत्येकजण स्वतःचे जग अनुभवतो व त्यांत वागतो. म्हणूनच वरकरणी सारख्याच गोष्टी ज्यांच्या वाटणीला आलेल्या दिसतात त्यांतील काही माणसे सुखी तर काही दुःखी असतात. स्वतःचे जग निर्माण करण्याचे काम माणसाचे मन करीत असते म्हणून आयुष्यांतील (सुखदुःखाच्या) अनुभवांचा उगम माणसाच्या मनांत आहे असे म्हंटले आहे. (मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः).


आता माणूस स्वतःच जर आपल्या जगाचा व त्यांतील अनुभवांचा निर्माता असेल तर तो दुःखी होण्याचे कारण नाही कारण तो जाणीवपूर्वक स्वतःला दुःखी करणार नाही. पण आपणच निर्माते आहोत (अहं ब्रह्मास्मि) या गोष्टीचा माणसाला विसर पडतो व आपल्याला येणारे अनुभव बाहेरून लादले गेले आहेत, आपण त्याबाबतींत असहाय आहोत असे त्याला वाटू लागते. ही असहायतेची भावना त्याला दुःखी करते. त्यांतूनच आपल्या जगण्यावर कुठल्यातरी बाह्य शक्तीचे नियंत्रण आहे असा भ्रम त्याला होतो व त्या काल्पनिक शक्तीला तो देव, ईश्वर, परमेश्वर, अशी नावे देतो.


याचा अर्थ माणसाला सुखी व्हायचे असेल तर त्याने आपल्या अनुभवांची जबाबदारी आपलीच आहे हे ओळखायला शिकले पाहिजे. एकदा आपले जग व आपले अनुभव ही आपलीच अपत्ये आहेत (अहं ब्रह्मास्मि) हे लक्षांत आले की माणसाला आपला प्रत्येक अनुभव, मग तो सुखाचा असो की दुःखाचा, आपल्या अपत्याप्रमाणे आवडू लागेल. त्यांचा त्याला त्रास होणार नाही. याबाबतींत कीटकांच्या शिकारीसाठी भिंतीच्या कोपऱ्यांत जाळे विणणाऱ्या कोळ्याचे उदाहरण काही प्रमाणांत लागू पडते. ज्याप्रमाणे आपणच विणलेल्या जाळ्यांत कोळी स्वतः कधी अडकत नाही, उलट त्यांत तो मुक्तपणे संचार करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या अनुभवांचे जाळे आपणच निर्माण केले आहे ही जाणीव असणारा मनुष्य त्यांत न अडकता मुक्तपणे (आनंदाने) संचार करू शकेल. पण ज्याप्रमाणे इतर कीटकांसठी कोळ्याचे जाळे हे परक्याने विणलेले असल्यामुळे ते त्यांत अडकून मरतात त्याचप्रमाणे आपले अनुभव आपल्यावर बाह्य शक्तीने लादले आहेत असे समजणारा मनुष्य त्यांत दुःखाने तडफडतो.


तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि' ही जाणीव अधिकाधिक व्यापक करणे हा दुःख मुक्तीचा मार्ग आहे असे म्हणायला हरकत नाही.


आता बोला!