एक डाव भुताचा- भाग ५- शेवट

एक डाव भुताचा- भाग १
एक डाव भुताचा- भाग २
एक डाव भुताचा-भाग ३
एक डाव भुताचा- भाग ४





  एक डाव भुताचा- भाग ५-शेवट


रात्र संपून दिवस उजाडला.  ब्रेकफास्ट टेबलवर नेहमीप्रमाणे रीटा आणि ख्रिस्तीन बसल्या होत्या.  रीटाच्या फ्रीजमधल्या काही बियरच्या बाटल्या तिने न पिताच संपल्या होत्या.  आणखी एका सहकाऱ्याच्या फ्रीजमधले सर्व मद्य संपले होते. काय झाले असावे अशी चर्चा त्यांच्यामध्ये सुरू होती.  माधवीला अंदाज आला.  तिला हसताना पाहून ख्रिस्तीन आणि रीटाला मात्र काही उलगडा झाला नाही.  सगळ्यांबरोबर माधवी ऑफिसात गेली.  ऑफिसात कामे सुरू होती.  एक प्रश्न चटकन सुटेना. कुठेतरी छोटीशी चूक होती पण माधवीला खूप प्रयत्न करून ती सापडेना.   रात्रीची जागरणे आणि भिती याने तिचे डोके काम करेनासे झाले होते.  हॉट चॉकलेट प्यावे असे तिला मनातून वाटत होते. डोके विचार करेनासे झाले की शांत होण्याचा हा तिचा नेहमीचा उपाय होता.  ह्या ऑफिसात हॉट चॉकलेट मिळेल अशी सोय नव्हती. पाहते तर शेजारी वाफाळता हॉट चॉकलेटचा कप हजर होता.

"सॅम? तू?  "माधवीने  हळूच विचारले. सुदैवाने ती एकटीच केबिनमध्ये होती; अन्यथा सर्वांना काय उत्तर देणार हा प्रश्नच होता.

"मला कल्पना होती तुला हॉट चॉकलेट लागणार आहे,  पूर्वी असेच होते. घे त्याचा आस्वाद घेत विचार कर,"सॅमने दार लोटले व तो निघून गेला.
सॅम सतत तिच्या अवतीभोवती असतो अशी माधवीची खात्री होत होती.  संध्याकाळी कामे आटोपून खोलीवर येताना सॅमला याचे कारण विचारायचे असे माधवीने ठरवले.


दुसऱ्या दिवशी परत घरी जायचे होते. माधवी आपले सामान आवरत होती. सॅम केंव्हा येतो या विचारात तिची नजर घड्याळाकडे जात होती.


 मध्यरात्री सॅम आला. 
" उद्या निघणार ना घरी जायला?"सॅमने माधवी आपले सामान आवरत होती ते पाहून विचारले.
"हो इथून सुखरूप सुटले तर! " माधवीने त्याला  हसत हसत उत्तर दिले.   पण तिचे हास्य फार काळ टिकले नाही. त्याला कारणही तसेच होते. एकाएकी  तिच्या भोवती रक्ताचे पावलाचे ठसे उमटले होते.


"सॅम हे काय आहे? तू ,तू आता मारणार आहेस का मला? "माधवीने दचकून आश्चर्याने विचारले.  तिच्या बोलण्यात अविश्वास डोकावत होता.

" थॉमस,लीव हर अलोन , माधवी माझी आहे. बॉसला काय उत्तर द्यायचे ते मी देईन.  जा ,आलास तसा चालता हो" सॅम हातवारे करून ओरडला. 
पावलांचे ठसे नाहीसे झाले होते.  दार बंद केल्याचा आवाज माधवीच्या कानावर आला होता.
"हा कशाकरता आला होता? कुणी पाठवले त्याला?"माधवीने सॅमवर प्रश्नांचा भडिमार केला.  आपले प्राण वाचवले म्हणून सॅमचे आभार मानण्याचेही तिला भान उरले नव्हते.
 "माधवी ,आम्हाला काही कामे नेमून दिली असतात.  आज थॉमस येथे येणार होता ,आज मला इथे राहता येणार नव्हते. पण तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या म्हणून आलो. " सॅमने खुलासा केला.
"थॉमस? कोण आहे का?कोणी पाठवले आहे त्याला?"माधवीने विचारले.


"माझा सहकारी आहे. तुला फारशी इजा करायचा त्याचा विचार नव्हता." सॅमने उत्तर दिले.
"आता मी त्याचा देणेकरी झालो आहे,"सॅमच्या आवाजात थोडा विषाद होता.

"सॅम, केव्हापासून तू माझ्याबरोबर आहेस?" माधवीची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती.
" मी तुझ्याबरोबरच आहे.... ,आय मीन , तू आणि ख्रिस्तीन दोघी गाडीत बसल्या निदान तेंव्हापासून तरी आहे असे म्हणायला हरकत नाही. बासरीची सीडी छान आहे. तू अंघोळ करताना ऐकत होतीस ना." टीव्हीकडे आपली नजर रोखत सॅम मिश्किलपणे म्हणाला. त्याच्या ओठावर हास्य होते.
"सॅम, तू.. तू आत.. आत आला होतास?" माधवीने विचारले. तिच्या चेहऱ्यावर संकोच आणि राग याचे प्रतिबिंब उमटले होते. 


" तू कशाला हसतोस? दुष्ट आहेस तू"माधवीने न राहवून उत्तर दिले.

"ह्म्म, पण तुझ्यापेक्षा नक्कीच कमी" सॅमच्या चेहऱ्यावर हास्याचा मागमूसही नव्हता त्याची जागा खेदाने घेतली होती. 
"मी काय दुष्टपणा केला ?" माधवीने रागावून विचारले.
"ते तुला कसे कळणार म्हणा?" सॅमने तिला उत्तर दिले. त्याचे सगळेच बोलणे कोड्यात होते.  माधवीने बॅग भरली. सॅम तिच्या हालचाली बघत होता.  


"सॅम तुला माझ्याकडून काय हवे आहे?तू माझ्या मागे का येतो आहेस?"
"ही जागा माझ्या मालकीची आहे. कोण कुणाकडे आले आहे?" सॅमने तिचे प्रश्न टोलवत उत्तर दिले.


"कुठवर येणार आहेस माझ्याबरोबर?" माधवीच्या स्वरात काळजी होती.


"जिथवर शक्य आहे तिथवर, जोपर्यंत तुझ्याबरोबर येता येईल तोपर्यंत" सॅमच्या स्वरात अगतिकता डोकावत होती.


 "कारण सांगशील?" माधवी हट्टाला पेटली होती.
" कारण न कळण्याइतकी तू वेडी नाहीस ना?" सॅमने उलट प्रश्न केला.
  माधवीच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले. 


"माधवी एवढा विचार करू नकोस, लवकर घरी जा, तुझी मुलगी आणि नवरा वाट बघत आहेत. " बोलता बोलता सॅम कॉफीचे घोट घेत होता .


काळजी घे, नीट  जा, येतो मी" सॅमने तिचा निरोप घेतला . 
"आणि शक्य असेल तर शैलेशशी बोलू नकोस. मला ते आवडत नाही. हे इथेच थांबायला हवे." काही  क्षणात तो दिसेनासा झाला.

               सॅम निघून गेला. पण माधवीच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. सॅमची मुलगी, त्याची बायको कुठे आहेत?जिवंत आहेत का? त्यांना सॅम भेटला असेल का? पुन्हा आपली सॅमशी भेट होईल का? थकून माधवी केंव्हा झोपली ते तिलाच समजले नाही. 


                    सकाळी हॉटेलचे बील देऊन बाहेर पडताना तिने खोलीच्या किल्ल्या परत द्यायच्या म्हणून कोटाच्या खिशात हात घातला. तिच्या हाताला एक पाकीट लागले.   तिने ते पाकीट उत्सुकतेने उघडले. आत एक कागद होता , एक लाल गुलाबाचे फूल होते. एक क्वार्टर होता, सॅमजवळ होता तसाच चकाकणारा.  तिने पाहिले तर  नाण्यावर दोन्ही बाजूंवर "स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचाच पुतळा "होता. ..


माधवी सुन्न झाली होती. नेहमी सॅम म्हणतो तसेच होते, नाणे केवळ एक दिखावा. ती वाचू लागली. कागदावर लिहिले होते,
"तू कोठेही असशील, कुणाबरोबरही असशील तरी मी फक्त तुझाच आहे. फक्त तुझा. त्याखाली सॅमचे नाव होते.
माधवीच्या अंगावर काटा आला होतो. सॅम त्याचे म्हणणे खरे करणार होता. 
घरी परत येताना तिच्या मनात त्या ओळी रेंगाळत होत्या. दारात आनंद तिची वाट पहात होता. घरात सीडीवर गाणे लागले होते....

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 
 तुझेच मी गीत गात आहे.." 


                                         -सोनाली जोशी