दोन सेनापती

आज २३ जुलै २००६; आज लोकमान्य टिळकांची १५० वी जयंती तर चंद्रशेखर आझादांची १०० वी जयंती.


५० वर्षांच्या अंतराने जन्माला आलेल्या या दोन स्वातंत्र्यसेनानींमध्ये मला बरेच साधर्म्य आढळून येते. दोघेही जहाल मतवादी, दोघेही सशस्त्र क्रांतीचे उद्गाते, दोघेही कुशल संघटक, दोघेही सुस्पष्ट विचारांचे, एकाचे सुप्रसिद्ध उद्गार 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळविणाराच तर दुसऱ्याचे सार्थ शब्द होते 'मी स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रच असेन' (हम आझाद है और आझादही रहेंगे). टिळकांच्या लेखणीत बंदुकीची स्फोटकता होती तर आझाद आपले मॉवजर लेखणीच्या सफाईने चालवीत.


लोकमान्य हे अप्रत्यक्षपणे तर आझाद प्रत्यक्षपणे सशस्त्र क्रांतीमध्ये सहभागी. टिळक हे रँड वधामागचे प्रेरणास्थान तर आझाद हे साँडर्स वधाचे प्रेरणादायी. लोकमान्य विद्यार्थी असतानाच त्यांना असलेली अन्यायाची चीड व्यक्त करणारा शेंगांच्या सालींचा प्रसंग सर्वश्रुत आहे. आझादांच्या विद्यार्थी जीवनातही नेमकी हीच भावना प्रकट करणारा प्रसंग घडला होता. आझाद व त्यांचे बंधू शुकदेव यांना शिकवायला मनोहर त्रिवेदी हे शिक्षक येत असत. एकदा मनोहरजींनी परीक्षा घेण्यासाठी एक शब्द मुद्दामच चुकीचा उच्चारला. आझादांनी तत्काळ बाजूला पडलेला वेत उचलून मनोहरजींना हाणला. ते म्हणाले, जेव्हा आम्ही चुकतो तेंव्हा गुरुजी फटकवतात. आज ते चुकले तर मी फटका दिला, माझे काय चुकले?


दोघेही बलोपासक! दोघेही वज्रनिश्चयी. दोघेही चारित्र्य संपन्न व विलक्षण योगायोग असा की लोकमान्यांना ताइमहाराज प्रकरणात मनस्ताप सहन करावा लागला तर आझादांना अज्ञातवासात असताना त्यांच्या मागे लागलेल्या एका विधवेमुळे मनस्ताप सहन करावा लागला होता. टिळकांनी 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' हा सुप्रसिद्ध अग्रलेख लिहिला तर जेव्हा क्रांतिकारकांची संभावना गांधींनी हिंसेखोर अशी केली तेंव्हा आझादांनी 'बॉम्बगोळ्याचे तत्त्वज्ञान' हे सुप्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध केले. याचे शब्दांकन व प्रत्यक्ष लेखन जरी भगवतीबाबूंनी केले असले तरी संकल्पना आझादांची होती व पत्रकावर त्यांनी 'बलदेवराज - सरसेनापती, हिं. स. प्र.से. अशी स्वाक्षरीही केली होती. इंग्रज जितके टिळकांच्या लेखणीला वचकून होते तितकेच ते आझादांच्या बंदुकीला वचकून होते. दोघेही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित जीवन जगले.


इथे त्या दोघांची तुलना करण्याचा प्रयत्न नसून केवळ एकाच दिवशी जन्मलेल्या दोन देशभक्तांमधील मला जाणवलेले साम्य मी व्यक्त केले आहे. दोघेही त्यांच्या स्थानी महान आहेत, अढळ आहेत.


या दोन स्वातंत्र्यसेनानींना त्यांच्या जन्मदिनी सादर वंदन.