क्रांतिवंदन

ज्या क्रांतिकारकांच्या मुळे देश पारतंत्र्यातून मुक्त झाला,ज्यांनी क्रांतीच्या आसक्तीपायी सर्वस्वाचा होम केला मात्र आज जे विस्मृतीच्या पडद्या आड गेले आहेत किंबहुना माहीतही नाहीत त्यांना ही मानवंदना.ज्यांनी आयुष्य म्हणजे काय हे धड पाहील देखिल नव्हतं त्यांनी ते आयुष्य हसत हसत आपल्या ध्येयावरून ओवाळून टाकलं त्यांना ही मानवंदना. ऐन विशीत देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीरांचे चरित्र वाचताना डोळ्यापुढे कुसुमाग्रजांच्या शब्दांचा प्रत्यय येतो -



'पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे


एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार


गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार.


खरोखरीच या ध्येयासक्तांना कीर्तीचे वा प्रीतीचे धागे बांधायला फुरसत नव्हती. आपले आयुष्य हे स्वल्प आहे आणि त्यात आपल्याला जास्तीत जास्त काहीतरी करून मगच मरायचे आहे ही एकमेव भावना होती. आपण आपल्या हाताने आपले घरदार पेटवून देत आहोत, त्या आगीत आपले आप्त जळून खाक होतील, घरदार नष्ट होईल हे ठाउक असूनही कसलाही धागा त्यांना बांधून ठेवू शकला नाही. त्यांना नाव नको होते, लौकिक नको होता, सत्ता नको होती हवे होते ते केवळ स्वातंत्र्य. ते तर मिळाले पण ते पाहायला हे हुतात्मे राहिले नाहीत. काळाच्या  व कृतघ्नतेच्या प्रवाहात ते विसरले गेले. अनेकांना तर ते माहीतही नाहीत. भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन क्रांतिकारकांविषयीचे अज्ञान दाखवणारे उद्गार काढले होते. दीड दमडीच्या पुढाऱ्यांचे सगळे खानदान मिरवत असते मात्र आम्हाला भगतसिंगाचे संपूर्ण नावही माहीत नाही. भ्रष्ट गल्लाभरू नेत्यांच्या वाढदिवसाचे फलक नाक्या नाक्यावर लागतात, मात्र मदनलाल धिंग्राची जन्मतारीख माहीत नाही. असे कितीतरी कर्तारसिंग सराबा, अजितसिंग, अशफाक उल्लाह, राजेंद्र लाहिरी, सूर्यसेन, सदाशिवराव मलकापूरकर, विश्वनाथराव वैशंपायन, गजाननराव पोतदार, श्रीराम सावरगावकर, करंदीकर,गयाप्रसाद, महावीरसिंह,यशपाल, खानखोजे, वैकुंठ शुक्ल, शाळिग्राम शुक्ल आणि मणींद्र बॅनर्जी आहेत ज्यांची नावे आम्ही ऐकलीच नाहीत.


ज्यांनी आपले सर्वस्व या देशासाठी वाहून टाकले त्यांचे कर्तृत्व चार जणांना सांगता आले व त्यामुळे ते कुणाला माहीत झाले वा स्मरणात आले व त्यांनी ते आणि चार जणांना सांगितले तरी ती या महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल. जे आपल्याला माहीत आहे ते इतरांना सांगावे आणि या हुतात्म्यांनी या देशावर आणि समाजावर जे महान उपकार केले आहेत त्याची अत्यल्पशी का असेना पण जाण ठेवावी या हेतूने हा लेखनप्रपंच.


अनुक्रमणिका