याचसाठी केला होता अट्टाहास...

सरदार अजितसिंग अर्जुनसिंग सिंधू. सिंधू घराण्याचा क्षात्रतेज आणि राजनिष्ठेचा वारसा मिरविणारे महारथी. हे सरदार भगतसिंग यांचे सख्खे काका.


चाफेकर बंधूंच्या बलिदानातून स्फूर्ती घेऊन आणि लोकमान्यांचा आदेश शिरोधार्थ मानून अजितसिंगांनी स्वतःला क्रांतिकार्यात झोकून दिले. सरकारशी खुलेआम संघर्ष सुरू झाला. १९०७ साली वसाहतीकरण कायदा जुलुमी सरकारने जबरदस्तीने लागू केला. या कायद्याने सरकार शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः मनमानी करू शकणार होते. सारा चौपटीने वाढवणे, शेतात काय पिकवायचे ते सरकारने ठरवणे, शेतात शेतकऱ्याला राहायला घर बांधायची मनाई करणे व याला विरोध करणाऱ्याला अटक करून खटला भरण्याचे अधिकार सरकारला प्राप्त झाले होते. या कायद्याच्या विरोधात पंजाबात जन आंदोलन उभे राहिले. जालंदर येथे झालेल्या प्रचंड शेतकरी मेळाव्यात सरदार अजितसिंग यांनी शेतकऱ्याला आपल्या हक्काची जाणीव करून देत जबर सारा भरणी धुडकावून लावायची प्रेरणा दिली. या प्रसंगी पंजाबचे लोककवी बाँकेदयाल यांनी आपली 'पगडी सम्हाल तेरा लूट गया माल' ही जागृतीपर कविता म्हटली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली (पुढे हे गीत १९६५ आणि २००३ च्या शहीद या नावाच्या दोन्ही चित्रपटांत वापरले गेले).


१९०७ साली सरकारने अजितसिंगांना अटक केली व राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली मंडालेच्या तुरुंगात डांबले. ते सुटून परत येताच पुन्हा त्यांच्यावर जागती पाळत ठेवली. जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आता इथे राहून ते शक्य होणार नाही हे ओळखून अजितसिंग आपल्या वडिलांचा आशीर्वाद व कुटुंबीयांचा निरोप घेऊन  ते १९०९ साली देशाबाहेर निसटले. या महारथीने ३८ वर्षे जगभर वणवण केली. गदर पासून ते आझाद हिंद सेनेच्या जमवाजमवी पर्यंत अनेक भगीरथ प्रयत्न केले. अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी व जपान व अन्य पौर्वात्य देशात भ्रमण करून त्या त्या देशातून त्यांनी पाठिंबा व शस्त्रे जमा करण्याचे कार्य केले.


एकदा त्यांची सतत वाट पाहणाऱ्या भगतसिंगांना खबर लागली की ते ब्राझील येथे आहेत व त्यांचे इथे कुणाला तरी पत्र आले आहे. त्याने आपल्या हरनाम काकूला म्हणजे अजितसिंग यांच्या पत्नीला ही आनंदाची बातमी सांगितली. तिने आनंदून आपल्या पुतण्यामार्फत पत्र धाडले की आपण तर परवा येतो असे सांगून गेलात आणि आलाच नाहीत. त्यावर तिला अजितसिंगांनी उत्तर लिहिले, काळजी करू नकोस. मी 'परसो असे म्हटले होते, पण परसो आणि बरसो' यांत तर केवळ दोन नुक्त्यांचे अंतर आहे.(उर्दू लिपीप्रमाणे). ती त्यांची वाट पाहत राहिली मात्र भगतसिंगांना पक्के माहीत होते की अजितसिंग स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय येणार नाहीत, ते बाहेर राहून प्रयत्न करत राहणार. अखेर तो सुदिन उजाडला.


मार्च १९४७ मध्ये 'स्वातंत्र्य मिळणार' या वार्तेने सुखावलेले व आपल्या मातृभूमीच्या दर्शनाला आसुसलेले अजितसिंग हिंदुस्थानात परत आले. त्यांचे जंगी स्वागत व अनेक सत्कार झाले. प्रत्यक्ष नेहेरुंनी त्यांना काही दिवस आपल्या घरी पाहुणे म्हणून ठेवून घेतले. मात्र हे सुख क्षणभंगुर ठरले. अजितसिंगांना फाळणीची बातमी व निश्चिती समजली. ते पार खचून गेले. ज्या सिंधू कुटुंबातील पुरुषांनी ज्या मंगलभूमीवर स्वातंत्र्यसूक्ताचे महन्मंगल पाठ गायिले, ज्या भूमीवर त्यांच्या स्त्रियांनी आपल्या लेकरांना बलिदानाची प्रेरणा देणारी अंगाई गीते गायिली, त्या भूमीवर हिरवा सुलतानी अंमल सुरू होणार, त्यांचे गाव, जमीन सगळे पाकिस्तानात जाणार होते. लाडक्या भगतने ज्या लाहोरमध्ये शौर्यकृत्य गाजवले आणि ज्या लाहोर तुरुंगात तो फासावर गेला ते लाहोर आता हिंदुस्थानात राहणार नव्हते. म्हणजे काय? कसला पाकिस्तान? आम्ही तर अखंड हिंदुस्थानासाठी हयातभर लढलो मग आता हे काय? या फाळणीने काय साध्य होणार? रक्ताचे पाट वाहणार आणि निरपराध माणसे मरणार त्याला उत्तरदायी कोण? अजितसिंग अतिशय निराश झाले. जवाहर आणि जीना दोघेही समजायला तयार नाहीत. आता होईल सर्वनाश आणि माझ्या प्राणाहून प्रिय आणि पवित्र हिंदुस्थानचे तुकडे होतील, जे मी कदापि बघू शकणार नाही. मग? मग ठरलं. आता मला जगायचंच नाही. माझ्या आयुष्याचा संघर्ष संपला, स्वातंत्र्य मिळणार, बस्स आता मी निघतो.


१४ ऑगस्ट उजाडला, रात्रीचा स्वातंत्र्यजल्लोश त्यांनी डोळे भरून बघितला. आकाशवाणीवर देश स्वतंत्र झाल्याची घोषणा ऐकली आणि ते झोपी गेले. पहाटे चार वाजता त्यांनी घरच्यांना जागे केले. म्हणाले, आता मी चाललो, पण न सांगता गपचूप गेलो तर जगभरातले माझे दोस्त, माझे साथी रागावतील; त्यांचा निरोप नको घ्यायला? त्यांना अखेरचा राम राम नको सांगायला? चला, पटकन माझी जबानी लिहून घ्या. कुटुंबीयानं धक्काच बसला. त्यांनी डॉक्टरला बोलावून आणला. त्याने तपासून सर्व काही व्यवस्थित असल्याचा दिलासा दिला. मात्र अजितसिंग म्हणाले डॉक्टरांवर विश्वास ठेवू नका, मी सांगतो ते ऐका. अखेर अजितसिंगांनी आपल्या पत्नीला, हरनामला जवळ बोलावले व ते तिचा हात हातात घेत म्हणाले की लग्न करू तिला आणली खरी पण देशाच्या सेवेत गुंतल्याने ते तिची काहीच सेवा करू शकले नाहीत, तिला कसलेच सुख देऊ शकले नाहीत. त्यांनी खाली वाकून तिच्या पायाला हात लावून तिला नमस्कार केला व आपल्याला क्षमा करण्याची विनंती केली. मग ते सोफ्यावर लोडाला टेकून बसले, दोन्ही पाय वर घेत 'जयहिंद' अशी गर्जना केला व त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला.


ज्या साठी आयुष्य वेचले ते स्वातंत्र्य मिळाल्याचे ऐकणारा पण देशाचे तुकडे झालेले पाहायला न थांबता स्वातंत्र्याचा पहिला सूर्य उगवायच्या आंत तो महायोगी आपल्या देहाचा त्याग करून मुक्त झाला. आज १५ ऑगस्ट च्या दिवशी सरदार अजितसिंग यांना प्रणाम!