गणेशोत्सव

गणपतीचे दिवस जवळ आले आहेत असे मला गेल्या भारतभेटीत लक्षात आले. रस्त्यावर खड्डे खणून मंडप करण्याचे काम सुरू होते, अगदी बंगलोरात देखील वर्गणीसाठी मुले येत होती. दोन वर्षांपूर्वी ऐन गणपतीत घरी आले होते त्याची आठवण झाली.


न राहवून पुनःपुन्हा तोच तो प्रश्न पडला. की टिळकांचा गणेशोत्सव असा होता का? ध्वनिक्षेपकांच्या मोठाल्या भिंती, वाहतुकीचा बोजवारा आणि अनंतचर्तुर्दशीला ब्रह्मानंदी टाळी लागलेले 'कार्यकर्ते'?


अनिल अवचटांच्या एका पुस्तकात त्यांचे स्नेही विनायकराव म्हणतात, 'समाजाच्या ऊर्जेच्या विरेचनासाठी हे आवश्यकच आहे.' ही ऊर्जा 'व्हॅलेंटाइन डे'ला दिसते, तशी आषाढीच्या वारीत दिसते तशीच गणेशोत्सवात. आपल्याला ही ऊर्जा काही विधायक कामात वळवता का येत नसावी. गणपतीच्या निमित्ताने वर्गणी जमवून रस्ते खणण्याऐवजी खड्डे भरण्याचा कार्यक्रम करायचा कुणाच्या मनात कसे येत नाही? (की येते?)


तुम्ही यावेळच्या _सार्वजनिक_ गणेशोत्सवात कसा भाग घेतलात? तुमच्या जवळ कोणी काही विधायक करताना दिसले का? काय काय करता येईल असे तुम्हाला वाटते?


तसेच नकारार्थी प्रश्न म्हणजे, गणेशोत्सव कालबाह्य झाला आहे, विकृत झाला आहे, बंद केला पाहिजे असे कधी तुम्हाला वाटले का? उत्साही कार्यकर्त्यांचे कुठे चुकते असे वाटते?